Kolhapur Lok Sabha Sadashivarao Mandalik vs Sharad Pawar esakal
लोकसभा २०२४

माझं वय झालं म्हणता, मग तुम्ही तर कशाला मैदानात उतरता? मंडलिकांचा पवारांना थेट सवाल अन् 2009 निवडणुकीत वय ठरलं कळीचा मुद्दा!

कोल्हापुरातून त्यावेळी तत्कालिन खासदार (कै.) सदाशिवराव मंडलिक (Sadashivarao Mandalik), विद्यमान खासदार धनंजय महाडिक व संभाजीराजे छत्रपती असे तिघेजण इच्छुक होते.

निवास चौगले

माझे वय झाले म्हणता मग तुम्ही तर कशाला मैदानात उतरता? असा थेट सवाल मंडलिक यांनी श्री. पवार यांना केला. त्यावरून जी ठिणगी पडली तिचा पुढे वणवा झाला.

Kolhapur Lok Sabha : राज्यात लोकसभेची २००९ ची निवडणूक दोन्ही काँग्रेसने (Congress) एकत्रित येऊन लढवली. २००४ च्या निवडणुकीत ज्या पक्षांनी ज्या जागा जिंकल्या त्या जागा त्या त्या पक्षाला द्यायच्या हा फॉर्म्युला निश्‍चित झाला. त्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही जागा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वाट्याला गेल्या. हातकणंगलेतून अपेक्षेप्रमाणे तत्कालीन खासदार श्रीमती निवेदिता माने (Nivedita Mane) यांची उमेदवारी निश्‍चित झाली; पण कोल्हापुरात उमेदवारी द्यायची कोणाला, हा मोठा प्रश्‍न होता.

कोल्हापुरातून त्यावेळी तत्कालिन खासदार (कै.) सदाशिवराव मंडलिक (Sadashivarao Mandalik), विद्यमान खासदार धनंजय महाडिक व संभाजीराजे छत्रपती असे तिघेजण इच्छुक होते. या निवडणुकीपूर्वीच जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावरून हसन मुश्रीफ व मंडलिक यांच्यातील वादाने टोक गाठले होते. या वादानंतर झालेल्या हमीदवाडा कारखान्याच्या निवडणुकीत हे दोघे आमने-सामने आले. त्यात मंडलिक यांनी बाजी मारताना कारखान्याच्या सर्व जागा जिंकल्या. त्यामुळे मुश्रीफ इर्षेला पेटले होते.

त्यातून हा वाद विकोपाला गेल्याने साहजिकच मुश्रीफ यांनी मंडलिक यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला. कोणत्याही परिस्थितीत मंडलिक यांना उमेदवारी मिळणार नाही, यासाठी त्यांनी चंग बांधला. तत्पूर्वी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी देशात पाठिंबा देण्याबाबत चुकीची भूमिका जाहीर केली होती, त्याला मंडलिक यांनी जाहीरपणे विरोध केला होता. त्यामुळे श्री. पवार यांचीही मंडलिक यांच्याविषयी नाराजी होती. त्यामुळे पक्षांतर्गत एकूणच वातावरण मंडलिक यांच्या विरोधात होते.

या सर्वांवर मार्ग काढण्यासाठी सर्व इच्छुकांच्या मुलाखती श्री. पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत ठेवल्या होत्या. पक्षाच्या कार्यालयात सायंकाळी मुलाखती झाल्या. सुरुवातीला इतर इच्छुकांच्या मुलाखती झाल्यानंतर सर्वात शेवटी मंडलिक यांना श्री. पवार यांनी केबिनमध्ये बोलवले. थोडा वेळ गप्पा झाल्यानंतर आता वय झाले आहे, तुम्ही कशाला रिंगणात उतरता, तुम्ही एखादे नाव सुचवा त्याला उमेदवारी देऊ, असे श्री. पवार यांनी मंडलिक यांना सुचवले. त्यावर मंडलिक संतप्त झाले, त्याच निवडणुकीत श्री. पवार माढा लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरण्याच्या तयारीत होते.

माझे वय झाले म्हणता मग तुम्ही तर कशाला मैदानात उतरता? असा थेट सवाल मंडलिक यांनी श्री. पवार यांना केला. त्यावरून जी ठिणगी पडली तिचा पुढे वणवा झाला. मंडलिक यांच्या प्रश्‍नाने संतप्त झालेल्या श्री. पवार यांनी उभे राहूनच मंडलिक यांना नमस्कार केला आणि तुम्ही तुमचा मार्ग निवडण्याचे आवाहन केले. या प्रकाराने संतप्त झालेले मंडलिक थेट केबिनबाहेर आले आणि त्यांनी बाहेरचा रस्ता धरला. एकमेकांच्या वयाचा मुद्दा निघाला आणि तोच या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरला. मंडलिक यांच्याकडूनच एखाद्या उमेदवाराचे नाव घेतले असते, तर ही निवडणूक राष्ट्रवादीला सोपी गेली असती.

त्यावेळी मंडलिक हे संसदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे उपनेते होते. बैठकीतून रागाने बाहरे पडलेले मंडलिक यांनी थेट दिल्ली गाठली. दुसऱ्या दिवशी खासदार म्हणून दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असतानाच खासदारकीसह उपनेते पदाचाही राजीनामा त्यांनी दिला. बंगल्यातील सर्व साहित्य चारचाकीत भरले आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांनी थेट कोल्हापूर गाठले. आयुष्यभर प्रत्येक टप्प्यावर संघर्ष बघितलेल्या मंडलिक यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचे जाहीर केले. त्यांची समजूत काढण्यासाठी पक्षाचे स्थानिक नेते त्यांच्या भेटीला गेले; पण ‘मला माझे तरी मत पडेल का नाही’ असे सांगत त्यांनी या नेत्यांना परत पाठवले.

तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर त्यांची समजूत काढण्याची जबाबदारी सोपवली. त्यासाठी (कै.) पाटील हे कोल्हापूरला यायला निघाले; पण त्यांना कोणीतरी सांगितले की, मंडलिक यांना बूथवर उभा राहायलाही लोक मिळणार नाहीत. कशाला येता ? त्यामुळे (कै.) पाटील हे येता येता थांबले. दुसरीकडे मंडलिक यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने युवराज संभाजीराजे यांना उमेदवारी दिली. पहिल्या टप्प्यात उमेदवार बघता, दोन्ही काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची ताकद बघता निवडणूक एकतर्फी वाटत होती; पण जाहीर सभेत मंडलिक यांच्या वयावरून टीकेची झोड उठवली.

मतदानाला दोन दिवसांचा अवधी असताना श्री. पवार यांच्या उपस्थितीत महाराणा प्रताप चौकात झालेल्या सभेत श्री. पवार यांनीच ‘बैल म्हातारा झाला की त्याला बदलावा लागतो’ अशा शब्दात मंडलिक यांच्यावर टीकेची झोड उठवली. ही टीका मंडलिक यांच्यासह त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांच्या जिव्हारी लागली. त्यातून जे वातावरण फिरले त्यात मंडलिक यांनी बाजी मारत ही निवडणूक तब्बल ४३ हजार मतांनी जिंकली.

सांगलीतील निवडणुकीचे कोल्हापुरात पडसाद

(कै.) मंडलिक विरुद्ध श्री. पवार अशीच ही लढत झाली, त्यात कोल्हापूरकरांनी इतिहास घडविताना एखाद्याला गृहीत धरून घेतलेला निर्णय चालत नाही याची चुणूक दाखवली. (कै.) मंडलिक यांच्या वयाचा मुद्दाच या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरला. त्यात सांगलीत काँग्रेसच्या उमेदवाराला अडचणीत आणण्याच्या झालेल्या प्रयत्नांचे पडसादही उमटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

सुबोध-तेजश्रीचे जुळले सूर ; बहुप्रतीक्षित हॅशटॅग तदैव लग्नम सिनेमाचा पहिला टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

Dev Diwali 2024: देव दिवाळी का साजरी केली जाते? वाचा इतिहास अन् धार्मिक महत्व

Supriya Sule In Nashik : कांद्याला हमीभाव मिळवून देणार; खासदार सुप्रिया सुळे यांची चांदवडच्या सभेत ग्वाही

SCROLL FOR NEXT