'पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी ‘अबकी बार चारसो पार’ आवश्यक आहे. त्यासाठी संजय मंडलिक यांना निवडून देऊया.’
म्हाकवे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांत जागतिक स्तरावर भारत बलशाली झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘अब की बार चारशे पार’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खासदार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांना मताधिक्य देऊया,’ असे आवाहन भाजपचे नेते, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनी केले. महायुतीच्या प्रचारार्थ म्हाकवे, केनवडे, बानगे येथे आयोजित केलेल्या प्रचारसभांत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पी. डी. चौगुले होते.
समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली काश्मीरमधील ३७० कलम हटवून तेथील जनतेला दिलासा दिला. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना सर्जिकल स्ट्राईक (Surgical Strike) सारखे उत्तर देऊन जनतेच्या मनात भयमुक्ततेचा विश्वास निर्माण केला. त्यामुळे पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी ‘अबकी बार चारसो पार’ आवश्यक आहे. त्यासाठी संजय मंडलिक यांना निवडून देऊया.’
वीरेंद्र मंडलिक म्हणाले, ‘२०१९ मध्ये सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने विकासासाठी निधीच दिला नाही. नंतर सत्तेवर आलेल्या महायुती सरकारकडून खासदार मंडलिक यांनी विकासासाठी आठशे कोटींचा निधी मतदारसंघात आणला. त्यातून अनेक विकासकामे झाली. म्हणूनच खासदार मंडलिकांना मताधिक्य देऊ’ प्रास्ताविक धनंजय पाटील यांनी केले. डॉ. विजय चौगुले यांनी आभार मानले. यावेळी बी. आर. चौगुले, संदीप पाटील, सुनील देवडकर, प्रदीप पाटील, आणूरचे उपसरपंच ऋषिकेश देवडकर, श्रीपती खोत, भीमराव खोत, तातोबा गोते उपस्थित होते.
कुडित्रे : ‘खासदार संजय मंडलिक यांनी पाच वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यातील रस्ते, पूल, विमानतळ यासारख्या पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून विकासकामे केली आहेत. करवीर मतदारसंघातील जनतेने त्यांना मताधिक्याने विजयी करावे,’ असे आवाहन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले. किसरुळ (ता. पन्हाळा) येथे आयोजित महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचार दौऱ्यात नरके बोलत होते. यावेळी त्यांनी परिसरातील मोताईवाडी, काऊरवाडी, काळजवडे, पोंबरे, पिसात्री, वाशी, कोलीक, मानवाड, मुगडेवाडी, पाटपन्हाळा, पोर्ले तर्फ बोरगाव, बाजारभोगाव आदी गावांत प्रचार सभा घेतल्या.
यावेळी नरके यांनी महायुती सरकारने गेल्या दोन वर्षांत अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्याचे सांगितले. यावेळी कुंभी-कासारी साखर कारखान्याचे संचालक पी. डी. पाटील, सुरेश काटकर, कुंभी बँकेचे संचालक प्रकाश काटकर, पोहाळेचे सरपंच सुरेश पाटील, बाबूराव डेगळे, प्रकाश दाभोळकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.