'विकासामध्ये पाचव्या क्रमांकावर पोहोचलेला आपला देश तिसऱ्या क्रमांकाची महासत्ता बनवण्यासाठी मोदींना पंतप्रधान करणे गरजेचे आहे.’
कुडित्रे : ‘ही निवडणूक देश कुणाच्या हातात द्यायचा यासाठी आहे. निवडणूक (Kolhapur Lok Sabha) लोकसभेसाठीची नाही, तर देशाच्या विकासाची निवडणूक आहे. महायुतीत एकजूट ठेवा, मान गादीला पण मत मोदींना द्या,’ असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले. ‘पृथ्वीवरील कोणतीच शक्ती मंडलिक (Sanjay Mandlik) यांचा विजय रोखू शकत नाही,’ असेही ते म्हणाले.
वाकरे फाटा (ता. करवीर) येथील विठाई-चंद्राई हॉलमधील करवीर विधानसभा (Karveer Assembly) मतदारसंघातील महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, महायुतीचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्याचे आयोजन माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केले. कुंभी बँकेचे चेअरमन अजित नरके यांनी स्वागत केले.
मुश्रीफ म्हणाले, ‘राज घराण्याने निवडणूक लढवू नये यासाठी मी प्रयत्न केले. काँग्रेसने त्यांना सन्मानाने राज्यसभेवर घ्यायला पाहिजे होते.’ खासदार महाडिक म्हणाले, ‘ही निवडणूक सोपी असली तरी गांभीर्याने उतरावे लागेल. काँग्रेस ऐनवेळी भावनिक कारण समोर आणील, कारण त्यांचा अजेंडा तयार असतो. काँग्रेसमध्ये भ्रष्टाचाराची मालिका पहिली, परंतु मोदींच्या काळात नया पैशाचाही घोटाळा नाही.'
माजी आमदार नरके म्हणाले, ‘२०१४ पासून विकासाचा रथ झपाट्याने चालला. विकासामध्ये पाचव्या क्रमांकावर पोहोचलेला आपला देश तिसऱ्या क्रमांकाची महासत्ता बनवण्यासाठी मोदींना पंतप्रधान करणे गरजेचे आहे.’ खासदार मंडलिक म्हणाले, ‘राजवाड्यात जन्माला आला तरी मताचा अधिकार एकच आणि झोपडीत जन्माला आला तरी मताचा अधिकार एकच. केंद्रात निवड चुकीची झाली तर त्याला माफी नाही.’
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, ‘केडीसीसी’चे माजी संचालक पी. जी. शिंदे, भाजपचे करवीर विधानसभा अध्यक्ष हंबीरराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी के. एस. चौगले, एस. आर. पाटील, डॉ. के. एन. पाटील, डॉ. आनंद गुरव, नवनाथ पोवार, देवराज नरके, राजवीर नरके आदी उपस्थित होते.
चंद्रदीप नरके म्हणाले, ‘आमचं ठरलंय, आपलं ठरलंय’ हे मी ऐकतच आलोय. पण, माझ्या बाबतीत असं काय घडतंय? लोकांचं ठरतंय आणि त्यांचा आशीर्वाद मिळाला तरी मी नौका पार करतोय. एकट्यानं लढायचं हेच शिकलोय.’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.