यड्रावकर-शिंदे यांच्यात तब्बल दोन तासांहून अधिक काळ चर्चा केल्यानंतर पावणे सहाच्या सुमारास त्यांचे आगमन कोल्हापूर विमानतळावर झाले.
कोल्हापूर : जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा (Kolhapur Lok Sabha) मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांचा आढावा घेण्यासाठी ता. १३ रोजी कोल्हापुरात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रात्रभर जिल्ह्यातील विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या भेटीगाठीमुळे रात्री दहा वाजता मुंबईला जाणारे मुख्यमंत्री शिंदे हे सकाळी सव्वा सहा वाजता मुंबईला विमानाने रवाना झाले.
दरम्यान, या भेटीत मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘जनसुराज्य’चे आमदार डॉ. विनय कोरे (Dr. Vinay Kore), शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह काही नेत्यांच्या घरी भेट देऊन चर्चा केली. यड्रावकर यांच्या घरी तर ते पहाटे तीन वाजता गेले होते. क्षणभरही विश्रांती न घेता त्यांनी घेतलेल्या या भेटीगाठी चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
मुख्यमंत्री शिंदे नागपूरहून काल दुपारी तीन वाजता कोल्हापुरात दाखल झाले. हॉटेल पॅव्हेलियनमध्ये त्यांनी तब्बल सहा तास ठिय्या मांडून जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांतील महायुतीच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ते आठ वाजता माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या घरी तर तेथून विश्वपंढरीत जाणार होते. विश्वपंढरीतील मेळाव्यानंतर रात्री दहा वाजता ते विमानाने मुंबईला रवाना होणार होते.
पण, ऐनवेळी त्यांनी कार्यक्रमात बदल केला. रात्री नऊ वाजता ते क्षीरसागर यांच्या घरी गेले. तेथून बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून विश्वपंढरीत दाखल झाले. विश्वपंढरीतील मेळाव्यानंतर ते थेट वारणानगर येथे डॉ. कोरे यांच्या निवासस्थानी गेले. तिथे जेवण झाल्यानंतर बाराच्या सुमारास त्यांनी कणेरी मठावरील अदृश्य काडसिध्देश्वर महाराज यांची भेट घेतली.
यावेळी मठावर ते मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत होते. तेथून त्यांच्या वाहनांचा ताफा थेट नरंदे (ता. शिरोळ) येथील माजी मंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्या निवासस्थानी गेला. यड्रावकर-शिंदे यांच्यात तब्बल दोन तासांहून अधिक काळ चर्चा केल्यानंतर पावणे सहाच्या सुमारास त्यांचे आगमन कोल्हापूर विमानतळावर झाले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार धैर्यशील माने शेवटपर्यंत होते. पहाटे सव्वा सहाच्या सुमारास त्यांना घेऊन जाणारे विमान मुंबईला झेपावले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.