नवी दिल्ली : देशभरातील लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या पोलिस महासंचालकांसोबतच सात राज्यांच्या गृहसचिवांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये गुजरात, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचलप्रदेश आणि उत्तराखंड आदी राज्यांचा समावेश आहे.
आता बंगालच्या पोलिस महासंचालकपदाची सूत्रे ही राजीवकुमार यांच्याकडून काढून घेत ती विवेक सहाय यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांचीही बदली करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुका या निपक्ष वातावरणात व्हाव्यात यासाठी अधिकाऱ्यांना हटविण्याचे अधिकार आयोगाकडे आहेत. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना हटविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
मिझोराम आणि हिमाचल प्रदेशच्या सामान्य प्रशासन खात्याच्या सचिवांनाही पदावरून हटविण्यात आले आहे. मागील वेळेस बंगालमध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीआधी पोलिस महासंचालकांना हटविण्यात आले होते. एका ठिकाणी तीन वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा बजावलेल्या आणि स्वतःच्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, असे आदेश आयोगाने सर्व राज्यांना दिले आहेत. साधारणपणे ज्या अधिकाऱ्यांकडे दुहेरी जबाबदारी होती त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारवर नामुष्की
तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने फेब्रुवारी अखेरीस दिले होते. मात्र या आदेशाची अंमलबजावणी न करता राज्याचे तत्कालीन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचीच उचलबांगडी राज्य सरकारने केली होती. आता मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच पदावर असणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिल्याने राज्य सरकारवर नामुष्की ओढवली आहे.
मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली होऊ नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील होते. आता केंद्रीय निवडणूक आयोगानेच मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांना पदावरून हटविले आहे. या आदेशामुळे चहल यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या सरकारला कराव्या लागणार आहेत.
थेट निवडणूक प्रक्रियेत सहभागी नसल्याने आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांना आदेशातून वगळावे, अशी विनंती करणारे पत्र राज्य सरकारने निवडणूक आयोगाला पाठविले होते. मात्र आयोगाने सरकारची ही विनंती फेटाळून लावली होती. त्यानंतरही राज्य सरकारने कोणतीही कार्यवाही न केल्याने निवडणूक आयोगाने इक्बाल चहल यांना पदावरून हटविले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.