मुंबई : लोकसभेच्या रिंगणात भारतीय जनता पक्षाकडून तीन सनदी अधिकारी उतरणार असल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून होती. संबंधित अधिकाऱ्यांनीही त्यासाठी मोर्चेबांधणी आणि संबंधित मतदारसंघांत संपर्क अभियान सुरू केले होते. परंतु महायुतीच्या राजकारणात जागांवरून संघर्ष इतक्या विकोपाला गेला की, या अधिकाऱ्यांची दावेदारी म्हणजे ‘घरचे झाले थोडे...’ असे म्हणण्याची पाळी भाजपवर आली. भाजपने तिघांनाही ठेंगा दाखवला असताना वंचित बहुजन आघाडीने मात्र धुळ्यातून अब्दुल रहमान या निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याला उमेदवारी दिली .
उस्मानाबाद मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) वाट्याला गेला आणि तिथून राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली. त्यामुळे त्याठिकाणी भाजपकडून लढण्यासाठी इच्छुक असलेल्या प्रवीणसिंह परदेशी यांचा पत्ता कट झाला. त्याचबरोबर सनदी अधिका-यांना उमेदवारी मिळण्याच्या उरल्यासुरल्या आशेवर पाणी पडले. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात चर्चेत असलेले आणि नंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त झालेले प्रवीणसिंह परदेशी यांचे नाव उस्मानाबाद मतदारसंघातून चर्चेत होते.
राज्य सरकारच्या मित्र या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या परदेशी यांनी संस्थेच्या माध्यमातून उस्मानाबाद मतदार संघात विविध उपक्रमांचा धडाका लावला होता. होळीच्या काळात बंजारा समाजासोबत त्यांनी केलेले नृत्य लक्षवेधी ठरले होते. त्यांनी किल्लारी भूकंपाच्या काळात केलेल्या कामाच्या आधारे खासगी सर्वेक्षण संस्थांकडून चाचपणीही करण्यात येत होती. समृद्धी महामार्गामुळे चर्चेत असलेले आणि अनेक मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले राधेश्याम मोपलवार हे हिंगोली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त होत होती.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून दूर केल्यानंतर मोपलवार यांच्याकडे मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुमची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मेट्रो, सागरी सेतू, उड्डाणपूल, रस्ते आदी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी या वॉर रूमची स्थापना केली होती. काही महिन्यांपूर्वी मोपलवार यांनी मुख्यमंत्री वॉर रूमचा अचानक राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा होती. परंतु प्रत्यक्षात त्यांना उमेदवारी मिळू शकलेली नाही. आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर यांचे नाव गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत असून राजकीय वर्तुळातील त्यांचा वावरही वाढला होता. भाजपकडून धुळे मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती आणि त्यादृष्टीने त्यांनी मोर्चेबांधणी चालवली होती. मात्र सुभाष भामरे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांचेही राजकारण प्रवेशाचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.
रहमान होते राज्य मानवाधिकारचे महानिरीक्षक
दरम्यान वंचित बहुजन आघाडीने आपल्या दुसऱ्या यादीत धुळे मतदारसंघातून सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांना उमेदवारी जाहीर केली आहे. रहमान यांनी डिसेंबर २०१९ मध्ये राजीनामा दिला. त्यावेळी ते राज्य मानवाधिकार आयोगाचे महानिरीक्षक होते. महाराष्ट्र केडर मिळाल्यानंतर विविध पदांवर त्यांनी सेवा बजावली. ‘एब्सेंट इन पॉलिटिक्स ॲण्ड पावर, पॉलिटिकल एक्सक्लूज़न ऑफ इंडियन मुस्लिम्स’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.