Anandacha Shidha : शासनाने दिवाळीनिमित्त पात्र लाभार्थ्यांना चारऐवजी सहा शिधावस्तूंचा संच देण्याचा सकारात्मक निर्णय घेतल्याने अनेक गोरगरिबांना दिलासा मिळाला आहे, हा निर्णय स्वागतार्ह आहे.
मात्र, दोन वस्तूंत वाढ करताना शासनाने चार वस्तूंचे वजन एक किलोवरून अर्धा किलोवर घटविल्याने आश्चर्यही व्यक्त होते. दरम्यान, जिल्ह्यात अंत्योदय व प्राधान्य यादीतील सात लाख ९५ हजार ४३६ शिधापत्रिकाधारकांना हे संच १०० रुपयांत मिळणार असून, ऐन दुष्काळात त्यांची दिवाळी गोड होणार आहे.
मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यावर सर्वप्रथम गेल्या वर्षी दिवाळीनिमित्त तसेच गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हा आनंदाचा शिधा दिला. (100 rupees anandacha shida to beneficiaries on Diwali nashik news)
शासनाने नुकत्याच पार पडलेल्या गौरी-गणपतीतही शिधापत्रिकाधारकांना एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर व एक लिटर खाद्यतेल या चार शिधाजिन्नसांचा प्रतिशिधापत्रिका ई-पॉस प्रणालीद्वारे प्रतिसंच १०० रुपये या दराने दिला होता.
आता दिवाळीनिमित्त पुन्हा अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबाला (बीपीएल, पिवळे, प्राधान्य केसरी शिधापत्रिका) सहा वस्तूंचा संच देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील एक कोटी ५८ लाखांवर शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा मिळेल. शासनाने यापूर्वीच दिवाळीनिमित्त शिधाच्या संचात सहा वस्तू देण्याचे जाहीर केले आहे.
या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागतही झाले; मात्र प्रत्यक्षात वस्तू मिळताना या आनंदावर काहीसे विरजणही पडणार आहे. कारण, दिवाळी सणानिमित्त लाभार्थ्यांना एक किलो साखर व एक लिटर खाद्यतेल पूर्वीप्रमाणेच मिळेल; परंतु रवा, चणाडाळ, मैदा व पोहे या वस्तू मात्र अर्धा किलोच्या वजनातच मिळणार असल्याने वजनात मोठी घट झाली आहे.
काही कुटुंबात पाच ते दहाच्या दरम्यान सदस्य असून, त्यांना या अर्धा किलोच्या वस्तू किती पुरणार, हा प्रश्न उपस्थित होतो. नाशिक जिल्ह्यासाठी जस्ट किचन कंपनी पुरवठा करणार असून, २५ ते ३० ऑक्टोबर या कालावधीतच लाभार्थ्यांना हा संच वितरित करण्याच्या सूचना रास्त भाव दुकानदारांना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात अंत्योदय लाभार्थ्यांची संख्या एक लाख ७४ हजार ९०३, तर प्राधान्य शिधापत्रिकाधारकांची संख्या सहा लाख ४२ हजार ९४६ अशी आठ लाख १७ हजार ८४९ इतकी आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने मागणी केल्यानुसार अन्न व नागरी पुरवठा विभागाने सात लाख ९५ हजार ४३६ शिधा संच जिल्ह्यासाठी मंजूर केले आहेत.
दुष्काळात दिवाळी होणार गोड!
जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता आहे. खरीप पूर्ण वाया गेला असून, रब्बीची कुठलीही शाश्वतता नाही. पिके तर वाया गेलीच, हातालाही काम नसल्याने येणारी दिवाळी कशी जाणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. विशेषत: गोरगरिबांपुढे दिवाळी सण साजरा करण्याचा मोठा प्रश्न आहे. त्या पार्श्वभूमीवर एका शिधापत्रिकेला एक संच मिळणार असून, या वस्तूंचा दिवाळी साजरा करण्यासाठी नक्कीच सर्वसामान्यांना आधार मिळून गोरगरिबांची दिवाळी काहीशी गोड होईल. मात्र, दुष्काळाची तीव्रता पाहता वस्तूंचे वजन सरसकट एक किलो ठेवावे, अशी मागणीही होत आहे.
"सर्वसामान्य परिस्थिती असलेल्या अंत्योदय व प्राधान्य शिधापत्रिकाधारकांना नियमित रेशन मिळते. त्याबरोबरच दिवाळीनिमित्त मिळणारा शिधा संच नक्कीच उपयुक्त व आधार देणारा ठरेल. मात्र, दुष्काळाची परिस्थिती गंभीर असल्याने ग्रामीण भागात अनेक कुटुंबीयांपुढे दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळग्रस्त भागात मोफत शिधा संच वाटावे, तसेच सर्व वस्तूंचे वजन एक किलो ठेवून आधार द्यावा." - विजय गोसावी, सामाजिक कार्यकर्ते, येवला
लाभार्थी
- अंत्योदय शिधापत्रिका- १,७४,९०३
- प्राधान्य शिधापत्रिका- ६,४२,९४६
- एकूण शिधापत्रिका- ८,१७,८४९
- वाटप होणारे संच- ७,९५,४३६
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.