Shridhar Ketkar Jayanti : मराठी भाषेचा पहिला ज्ञानकोश काढण्याचे श्रेय डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांना जाते, केतकरांचा जन्म २ फेब्रुवारी १८८४ ला रायपूर येथे झाला, त्यांचे शिक्षण अमरावती व विल्सन कॉलेज, मुंबई येथे झाले. इ.स. १९०६ साली ते उच्चशिक्षणासाठी अमेरिकेस गेले. तेथील कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. मिळवली. भारतात परतल्यावर ते कलकत्ता विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
मराठीवरचं प्रेम शांत बसू देत नव्हतं
१९१२ साली भारतात परतल्यावर मराठी ज्ञानकोशाची निर्मिती करण्यासाठी केतकरांनी लिमिटेड कंपनी स्थापन केली. या कोशाला जर्मन आणि फ्रेंच भाषांतरकाराची गरज होती. आणि त्यासाठी डॉ. केतकरांनी आपल्या मैत्रिणीला भारतात नोकरी देऊ केली. म्हणून मिस् कोहन त्यांच्या बोलावण्यावरून आल्या.
१९२१ ते १९२९ या काळात केवळ स्वतःच्या मेहनतीने त्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे २३ खंड प्रकाशित केले. इ.स. १९१५ सालापासून पुढील १४ वर्षे त्यांनी या प्रचंड कामाच्या संशोधन व लिखाणाला वाहिली. एन्सायक्लोपीडिया या इंग्लिश शब्दासाठी केतकरांनी ज्ञानकोश हा मराठी प्रतिशब्द बनवला.
दोन्ही हातांनी लिखाण शिकले
कमीतकमी काळात ज्ञानकोश लिहून व्हावा, म्हणून केतकर यांनी दोन्ही हातांनी लिहायची सवय लावली होती. समीक्षक श्री.के. क्षीरसागर यांच्या मते, युरोपीय विद्वानांच्या मताला सरसकट प्रमाण न धरता राष्ट्रवादी भूमिकेतून केतकरांनी ज्ञानकोशाचे कार्य केले.
पुण्यात उघडली पहिली शाखा
ज्ञानकोशाची पहिली शाखा १ एप्रिल १९१८ रोजी पुण्यात उघडली गेली म्हणून नागपूर सोडून डॉ. केतकर पुण्यात स्थायिक झाले आणि तुळशीबागेत पेंडसे वाडय़ात राहू लागले.
जर्मन ज्यू तरुणीशी रचला विवाह
इंग्लंडला कॉलेजमध्ये भेटलेल्या जर्मन तरुणी मिस कोहन केतकरांना तिथे आवडल्या होत्या, कोहनकडूनही केतकरांसाठी तीच भावना होती, पण दोघेही काहीच बोलले नाही. १९१२ ते १९१९ डॉ. केतकर जरी भारतात होते तरी ते मिस् कोहन यांना पत्रं व भेटी पाठवत असत. त्यात ट्रामच्या तिकिटासह चित्रविचित्र गोष्टी असत. मिस् कोहन यांचं प्रेम शुद्ध, उत्कट आणि स्थिर आहे याची डॉ. केतकरांना खात्री पटली होती. मिस् कोहन त्यांच्या कार्यालयात काम करीत होत्या.
डॉ. केतकरांना मिस् कोहनशी विवाह तर करायचा होता, पण त्यांच्या मनावर असलेला हिंदुत्व अभिमानाचा मुख्य अडसर त्यांना ते करू देत नव्हता. केतकरांवर नितळ प्रेम असल्यामुळे मिस् कोहन यांनी हिंदू धर्माचा स्वीकार करून हिंदू संस्कृतीत मिसळून जायचा निर्णय घेतला आणि केतकरांच्या मनातली आडकाठी दूर झाली.
समाजाकडून होता विरोध
मिस् कोहन यांना हिंदू धर्मात घेण्यासाठी व्रात्यस्तोम विधी करायला कुणी पुरोहित सहजासहजी मिळेना. नंतर ज्ञानकोश संपादक खात्याचे व्यवस्थापक य. रा. दाते यांनी व्रात्यस्तोम विधीचं पौरोहित्य स्वीकारलं. दुसरे संपादक चिं. ग. कर्वे यांनी त्यांना मदत केली. आणि २१ मार्च १९२० रोजी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘व्रात्यस्तोम विधी’ करून हिंदू झालेल्या ईडिथ कोहन यांचं नामकरण ‘शीलवती’ करण्यात आलं.
लो. टिळकांनी दिलेला ईशारा
मिस् कोहन यांनी आपल्या लग्नाबद्दल वडिलांच्या मार्फत लो. टिळकांचा सल्ला विचारला, तेव्हा लो. टिळकांनी तात्त्विकदृष्टय़ा त्यांच्या विवाहास अनुकूल मत दिलं. ‘मात्र डॉ. केतकर हा श्रीमंत मनुष्य नाही. त्याला लेखणीच्या जीवावर उपजीविका करावी लागणार आहे. तेव्हा हे ध्यानात घेऊन वाटल्यास विवाह करावा,’ असा इशाराही दिला.
पण केतकर जसे होते तसेच मिस् कोहन यांना हवे होते. त्यामुळे हिंदू धर्म स्वीकारून विवाह करण्याचं ठरलं. अर्थात लो. टिळकांनी दिलेला इशारा तंतोतंत खरा ठरला. लग्नानंतर काही र्वष सुखात गेली. नंतर मात्र दोघांना अर्धपोटी राहावं लागलं. केतकरांना मृत्यू येण्यापूर्वी वैद्यकीय मदतही नीट मिळाली नाही. या पुढच्या गोष्टी झाल्या.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.