सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आता राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्व्हे करण्याची तयारी सुरू केली आहे. पुढील आठवड्यात मराठा आरक्षणाच्या दृष्टीने सर्व्हे सुरू होणार असून त्याअंतर्गत १५४ मुख्य प्रश्न तर सर्वात शेवटी १५ उपप्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यात कौटुंबिक परिस्थिती, व्यवसाय, शिक्षण, संपत्ती, नोकरी अशा जवळपास ५० बाबींवर प्रश्न विचारण्यात आले आहेत.
सर्वेक्षणात कुटुंबाच्या उत्पन्नस्रोतासंबंधी ३४ प्रश्न आहेत. त्यात कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, आयकर भरता का, क्रिमीलेअर प्रवर्गात आहात का, आर्थिक बचत कोणती व कशात आहे, कुटुंबातील सदस्यांना विमा संरक्षण आहे का, दारिद्र्यरेषेखाली आहात का, रेशनकार्ड कोणत्या रंगाचे, शेती कोणत्या प्रकल्पात गेली व मोबदला मिळाला का, शेतमजूर कोणी आहे का, इतर मजुरी कोण करते का, ‘रोहयो’चे जॉबकार्ड आहे का, डबेवाले कोणी आहे का, घरात माथाडी कामगार, ऊसतोड, वीटभट्टी, धुणीभांडी, झाडलोट, स्वयंपाकी, रखवाली, चौकीदार, गुरे चारणे, वाहन चालक कोणी आहेत का, कुटुंब स्थलांतरित झाले आहे का, कशामुळे स्थलांतर असे प्रश्न आहेत. दरम्यान, हे सर्वेक्षण २० जानेवारीपूर्वी पूर्ण केले जाणार आहे. सर्वेक्षणातील माहिती संकलित करून त्याआधारे मराठा समाजाच्या आरक्षणावर अंतिम फैसला होईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
ठळक बाबी...
- सर्वेक्षणात सुरवातीला १४ प्रश्न वैयक्तिक माहितीवर आधारित आहेत.
- कौटुंबिक २० प्रश्न असून त्यात घर कोणत्या प्रकारचे, कुटुंब विभक्त की एकत्र, व्यवसाय, नोकरी, राजकीय प्रतिनिधी, पूर्वजांचा निवास, गावाला रस्ता आहे का, असे प्रश्न आहेत.
- आर्थिक बाबींवर २३ प्रश्न असून त्यात उत्पन्नाचे स्त्रोत, घराचे क्षेत्रफळ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची सोय, स्नानगृह, स्वयंपाकगृह, जमीन, शेतीसाठी पाणी, वीज, शेतीपूरक व्यवसाय, पिके यावरील प्रश्न आहेत.
- कर्ज व आर्थिक बांधिलकीवर १५ प्रश्न असून त्यात १५ वर्षांत कृषी कर्ज घेतले का, सध्या कोणते कर्ज आहे, कर्जाचे कारण, नियमित परतफेड आहे का, थकीत कर्जाचे कारण, कर्जापोटी तारण काय, १५ वर्षांत स्थावर मालमत्ता घेतलीय का, काही मालमत्ता विकलीय का, का विकली याबद्दल विचारणा केली आहे.
- कुटुंबातील मालमत्तेविषयी तीन प्रश्न असून त्यात वीज कनेक्शन, दुचाकी, एसी, कार, जीप, ट्रॅक्टर, फ्रिज, रंगीत टीव्ही, ब्रॉडबॅण्ड कनेक्शन, जमिनीची मालकी, पशुधन यावर माहिती विचारली आहे.
- कुटुंबाच्या आरोग्यासंबंधी ११ प्रश्न असून त्यात घरात आतापर्यंत कोणाचा बालमृत्यू, मातामृत्यू झालाय का, गरजेला आरोग्यसुविधा मिळते का, काविळ झाल्यावर किंवा साप, विंचू चावल्यावर उपचार कोठे घेता, बाळंतपण कोठे झाले (घरी की दवाखान्यात), शासकीय दवाखान्यात का उपचार घेत नाहीत असे प्रश्न आहेत.
सामाजिक प्रश्नांची उत्तरे महत्त्वाची ठरणार
कुटुंबाच्या सामाजिक बाबींवर ३२ प्रश्न असून त्यात सरकारी योजनेचा लाभ झाला का, विवाहात हुंडा पद्धत आहे का, विधवा महिलांना कपाळाला कुंकू लावण्यास परवानगी आहे का, विधवा मंगळसूत्र घालू शकतात का, औक्षण करण्याचा त्यांना अधिकार आहे का, विधूर पुरुष पुनर्विवाह करतात का, विधवांचे पुनर्विवाह होतात का, विधवांना पूजापाठ व धार्मिक कार्यास परवानगी आहे का, विवाहितांना डोक्यावर पदर घेण्याचे बंधन आहे का, घरातील निर्णय कोण घेतो, सार्वजनिक कार्यक्रमात महिलांना समान संधी आहे का, मुलीचा विवाह कोणत्या वयात होतात, उशिरा विवाह कशामुळे, मुलीच्या विवाहाचा निर्णय कोण घेतात, आंतरजातीय विवाह झालाय का, पहिले अपत्य मुलगाच हवा अशी प्रथा आहे का, जागरण गोंधळ किंवा धार्मिक कार्यासाठी कोंबडा, बकरा कापण्याची पद्धत आहे का, कुटुंबातील सदस्य आजारी पडल्यावर दृष्ट काढणे, अंगारा लावणे, मांत्रिकाकडून गंडा बांधणे असे प्रकार आहेत का, समाजाच्या बरोबरीने शिक्षण व आर्थिक विकासात समान संधी मिळते का, तुमची पोटजात दुय्यम-कनिष्ट समजतात का, असे प्रश्न आहेत. आरक्षणासाठी या प्रश्नांची उत्तरे खूप महत्त्वाची ठरणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.