Sakal Exclusive : शासनाच्या विविध विभागांमध्ये रिक्त असलेल्या जागांवर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरतीप्रक्रिया राबविली जाते आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०२२ व २०२३ च्या परीक्षांतून एकूण एक हजार ७२१ अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी मुख्य परीक्षा, मुलाखत कार्यक्रम आखला आहे.
ही प्रक्रिया पूर्ण होण्यास २०२४ उजाडणार असल्याने नवीन वर्षातच शासकीय सेवेत सतराशेहून अधिक अधिकारी दाखल होतील. दरम्यान, २०२३ च्या पूर्वपरीक्षांतील पात्रताधारक उमेदवारांना मुख्य परीक्षेचा अर्ज भरण्याची मंगळवारी (ता. २१) अंतिम मुदत असेल. (1700 officers in government service in new year news)
कोरोना महामारीपासून स्पर्धा परीक्षा रेंगाळलेल्या असून, २०२२ च्या अनेक परीक्षांचे अंतिम निकाल अद्यापपर्यंत जाहीर करण्यात आलेले नाहीत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ही प्रक्रिया गतिशील केली जात आहे. याअंतर्गत पूर्व परीक्षांचे निकाल जाहीर केल्यानंतर मुख्य परीक्षांसाठीची प्रक्रिया राबविली जाते आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२३ यातून विविध पदांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेला सामोरे जाण्याची संधी मिळणार आहे.
त्यासाठी संबंधितांनी मुख्य परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरणे अनिवार्य असून, त्यासाठी मंगळवार (ता. २१)पर्यंत मुदत असणार आहे. याच दिवशी ऑनलाइन शुल्क अदा करावे लागेल. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये शुल्क भरण्याकरिता चलन प्राप्त करून घेण्याची मुदत २३ नोव्हेंबरपर्यंत असून, चलनाद्वारे शुल्क भरण्याची मुदत २४ नोव्हेंबरपर्यंत असेल.
दरम्यान, परीक्षांचे अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर उपजिल्हाधिकारी, तहसीलदार या प्रशासकीय पदांप्रमाणे शासनाच्या विविध विभागांतील रिक्त जागांकरिता अधिकारी प्राप्त होणार आहेत. मात्र त्यासाठी नवीन वर्षाची वाट पाहावी लागणार आहे.
राज्यसेवा २०२२ च्या मुलाखतीची ३० नोव्हेंबरपासून प्रक्रिया
राज्यसेवा (मुख्य) २०२२ या परीक्षेचा निकाल ४ नोव्हेंबर २०२२ ला जाहीर केला होता. निवड प्रक्रियेतील महत्त्वाचा मुलाखतीचा टप्पा मात्र पूर्ण झालेला नव्हता. आयोगाने मुलाखतीचे सविस्तर वेळापत्रक जारी केले आहे. त्यानुसार ३० नोव्हेंबरपासून १२ जानेवारी २०२४ पर्यंत नवी मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या ठिकाणी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर १३ ते १५ जानेवारीदरम्यान अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
निवड प्रक्रियेतील जागांची संख्या अशी -
- राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ ----- ६२३ जागा
- राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ ------ ३०३ जागा
- महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी २०२३ ---- ४९५ जागा
- महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी २०२३ ----- १५ जागा
- निरीक्षक वैद्यमान गट-ब ------------------ ८३ जागा
- अन्न व औषध प्रशासन सेवा ------------- २०२ जागा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.