सोलापूर : चार दिवसाआड पाणी सोडूनही अनेकजण पाच-सात दिवसाआड पाणी येत असल्याच्या तक्रारी करीत आहेत. राजकीय पक्षांकडूनही त्याच मुद्द्यांवर आंदोलने केली जात आहेत. त्यामुळे आता प्रत्येक झोनमध्ये पाणी पोचले की नाही, याचे फोटो टाकण्याचे आदेश तेथील अभियंत्यांना दिले आहेत. विस्कळित पाणी पुरवठ्याला संबंधित अभियंत्याला जबाबदार धरून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
सोलापूर शहराचा विस्तार झाला, लोकसंख्याही ११ लाखांवर पोचली, पण पाणी पुरवठ्याचा विषय सुटलेला नाही. भाजप असो वा काँग्रेससह इतर पक्षांना मागील २५ ते ३० वर्षांत सोलापूर शहरातील नागरिकांना नियमित पाणी देता आलेले नाही. आता उन्हाळ्यापूर्वी नियोजनासंदर्भात चर्चा करण्याऐवजी ऐन उन्हाळ्यात आंदोलने केली जात आहेत हे विशेष.
सद्य:स्थितीत अनेक नवीन नगरांमध्ये पिण्याची पाइपलाइन पोचलेली नाही. दुसरीकडे सार्वजनिक नळ बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात अनेकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी संपूर्ण शहराला चार दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेतला. तरीपण, पाच ते सात दिवसाआड पाणी मिळत असल्याच्या तक्रारी सुरुच आहेत.
त्यामुळे वस्तुस्थिती नेमकी काय, हे समजावे म्हणून प्रत्येक झोनमधील तीन अभियंत्यांनी त्यांच्या परिसरातील नागरिकांना पाणी मिळत असल्याचे तथा पाणी सुरळीत पोचत असल्याचे फोटो टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतरही तक्रारी आल्यास किंवा त्या तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधित अभियंत्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
बाष्पीभवनाने संपले उजनीतील २ टीएमसी पाणी
उन्हाची दाहकता दिवसेंदिवस वाढू लागली असून उजनी धरण सध्या प्लस पाच टीएमसीपर्यंत (१० टक्के) खाली आले आहे. एप्रिलअखेरीस धरण मायनसमध्ये जाईल, अशी सद्य:स्थिती आहे. बाष्पीभवनामुळे उजनी धरणातील तब्बल दोन टीएमसी पाणी मागील ५० दिवसांत संपले आहे. आता शहरासाठी भीमा नदीतून एक आवर्तन सोडल्यानंतर शेतीसाठी कॅनॉल व बोगद्यातून पाणी सोडता येणार नाही.
उजनीतून पाणी सोडण्यासाठी पत्र व्यवहार
औज बंधाऱ्यावर सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याची भिस्त अवलंबून आहे. सध्या औज बंधाऱ्यात १० मेपर्यंतच पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिकेने जलसंपदा (लाभक्षेत्र विकास प्राधिकरण) विभागाला पत्र पाठवले असून १५ मेपर्यंत औजमध्ये पाणी पोचेल, अशा नियोजनाने उजनीतून पाणी सोडण्याची मागणी त्यातून करण्यात आली आहे. ते पाणी साधारणतः: ४५ दिवस पुरणार आहे. पाऊस लांबल्यास पुन्हा एकदा उजनीतून पाणी सोडण्याची वेळ येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.