पंढरपूर - आषाढी यात्रेच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील विविध भागांसह कर्नाटक व तेलंगणमधून भाविकांचे पंढरीत आगमन होत आहे. नवमीच्या दिवशी मंगळवारी (ता. २७) सुमारे अडीच लाखाहून अधिक भाविक विठ्ठलनगरीमध्ये दाखल झाले होते.
दरम्यान, श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग दहा नंबर पत्राशेडच्या पुढे गेली असून ‘श्रीं’च्या दर्शनासाठी पंधरा ते सतरा तासांचा अवधी लागत आहे.
आषाढी एकादशीच्या सोहळ्यामध्ये सामील होण्यासाठी निघालेल्या सर्व मानाच्या पालख्यांचे मंगळवारी पंढरपूर समीप असलेल्या वाखरी पालखीतळावर आगमन झाले आहे. पालख्यांसमवेत असलेल्या दिंडीतील बहुतांश वारकरी आपापल्या मठांमध्ये दाखल झाले आहेत.
याशिवाय रेल्वे, एसटी व आपल्या खासगी वाहनांतून आलेल्या लाखो भाविकांच्या आगमनाने पंढरपूरमधील गर्दी वाढली आहे. श्री विठ्ठल मंदिर परिसर, भक्ती सागर (६५ एकर), प्रदक्षिणामार्ग, चंद्रभागा नदीचे वाळवंट, पत्राशेड दर्शनरांग आदी परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.
पंढरीतील सर्व मठ, लॉज, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे भक्तनिवास हाउसफुल्ल झाले आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग दहा नंबर पत्राशेडच्या पुढे गेली आहे. दर्शनरांगेतील भाविकांना आज मंदिर समितीच्या वतीने तांदळाच्या खिचडीचे वाटप करण्यात आले.
आज नवमी दिवशी श्री विठ्ठल मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आलेले भाविक शंकर आबाशेठ तंगे (रा. हसनाबाद, जि. जालना) म्हणाले, आम्ही सोमवारी सायंकाळी सहा वाजता दहा नंबरच्या पत्रा शेडमधील दर्शन रांगेत उभे होतो.
जवळपास सतरा तासांनंतर सकाळी अकरा वाजता श्री विठ्ठलाचे पददर्शन प्राप्त झाले. दर्शनरांगेत काही प्रमाणात घुसखोरी होत असल्याने दर्शनासाठी वेळ लागत आहे. प्रशासनाने दर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना करावी. श्री विठ्ठलाच्या मुखदर्शनासाठी दीड ते दोन तास लागत आहेत.
श्री विठ्ठलाचे मुखदर्शन घेतलेले वृद्ध भाविक शंकर प्रल्हाद येऊल म्हणाले, श्री विठ्ठलाचे पददर्शन घेण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागते, ते या वयात शक्य नाही म्हणून मुखदर्शनावरच समाधान मानावे लागले. दरम्यान, आषाढी एकादशीच्या श्री विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बुधवारी (ता. २८) पंढरीत आगमन होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.