यंदाच्या ऊस गाळप हंगामात राज्यातील 153 साखर कारखान्यांना गाळप परवाना मिळाला असून, 1 नोव्हेंबरअखेर त्यापैकी 54 कारखाने सुरू झाले आहेत.
माळीनगर (सोलापूर) : यंदाच्या ऊस गाळप हंगामात राज्यातील 153 साखर कारखान्यांना (Sugar Mills) गाळप परवाना मिळाला असून, 1 नोव्हेंबरअखेर त्यापैकी 54 कारखाने सुरू झाले आहेत. राज्यातील 43 कारखाने अद्यापही गाळप परवान्याच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये राज्यातील नेत्यांच्या अधिपत्याखालील साखर कारखान्यांचाही समावेश आहे.
2021-22 च्या हंगामासाठी राज्यातील 196 साखर कारखान्यांनी गाळप परवाना मिळण्यासाठी साखर आयुक्तालयाकडे अर्ज दाखल केले होते. यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास मंत्री समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. गाळप परवाना मिळालेल्या साखर कारखान्यांपैकी सुमारे 100 कारखाने अजून चालू झाले नाहीत. यापैकी अनेक कारखान्यांनी बॉयलर पूजन करून ऊसमोळी गव्हाणीत टाकून गाळपाचा शुभारंभ केला आहे. गाळप परवाना न मिळालेल्या काही कारखान्यांनी मोळी पूजन करून ठेवल्याचे चित्र आहे. मागील अथवा त्याअगोदरच्या हंगामातील एफआरपी थकीत असल्याने 43 कारखान्यांना अद्यापही गाळप परवाना मिळू शकला नाही. 100 टक्के एफआरपीची थकबाकी दिल्यावरच गाळप परवाना देण्याचे साखर आयुक्तालयाचे धोरण आहे. साखर आयुक्त यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे.
यंदाच्या हंगामात आतापर्यंत 31 सहकारी व 23 खासगी कारखाने सुरू झाले आहेत. दरम्यान, चालू हंगामात 1 नोव्हेंबरअखेर राज्यात गाळप हंगाम सुरू केलेल्या 54 साखर कारखान्यांनी 18.35 लाख टन उसाचे गाळप केले असून 7.76 टक्के सरासरी साखर उताऱ्याने 13.32 लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. कोल्हापूर विभाग गाळप व साखर उत्पादनात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. नागपूर विभागातील एकही कारखाना अद्याप सुरू झालेला नाही. साखर कारखान्यांकडे नोंदी असलेल्या माहितीनुसार यंदा राज्यात जवळपास 1095 लाख टन ऊस गाळपास उपलब्ध होईल, असा अंदाज आहे.
1 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील 77 सहकारी व 76 खासगी मिळून 153 साखर कारखान्यांना गाळप परवाना देण्यात आला आहे. थकीत एफआरपीमुळे 43 साखर कारखान्यांचे गाळप परवाने अद्याप पेंडिंग आहेत.
- शेखर गायकवाड, साखर आयुक्त
1 नोव्हेंबर 2021 अखेरचा ऊस गाळप अहवाल (ऊस गाळप लाख टन, साखर उत्पादन लाख क्विंटल व साखर उतारा टक्क्यांमध्ये)
विभाग : कारखाने सुरू : ऊस गाळप : साखर उत्पादन : साखर उतारा
कोल्हापूर : 16 : 6.41 : 5.03 : 7.85
पुणे : 14 : 5.14 : 3.91 : 7.58
सोलापूर : 12 : 4.61 : 3.20 : 6.94
नगर : 6 : 1.51 : 0.89 : 5.89
औरंगाबाद : 2 : 0.18 : 0.08 : 4.44
नांदेड : 3 : 0.31 : 0.11 : 3.55
अमरावती : 1 : 0.17 : 0.10 : 5.88
एकूण : 54 : 18.35 : 13.32 : 7.76
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.