सोलापूर : शाळांमध्ये विद्यादानाचे काम करताना पटसंख्या टिकवू न शकलेल्या शिक्षकांना आता सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर दुसऱ्या शाळेत काम करावे लागणार आहे. २०२०-२१ च्या संचमान्यतेनुसार जिल्ह्यातील मराठी माध्यमाचे ९८ शिक्षक तर उर्दु माध्यमाचे सात शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. त्यात ५० ते ५७ वर्षे वय झालेल्या शिक्षकांची संख्या मोठी आहे.
बदलत्या काळात पालकांना इंग्रजी माध्यमाची गोडी लागली आणि बहुतेक मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकू लागले. या स्पर्धेत मराठी माध्यमांच्या शाळांमधील पटसंख्या घटली. जिल्हा परिषदेच्या ४३ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. यंदा महापालिकेच्या शाळेत जवळपास ४२० तर जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये चार हजार विद्यार्थी वाढले आहेत. मात्र, भविष्यात ही पटसंख्या वाढावी, मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी मराठी माध्यमाच्या शाळांमधील सर्वच शिक्षकांनी प्रयत्न करावे लागतील. जेणेकरून कोणीही अतिरिक्त होणार नाही. १ मे रोजी शाळांना सुटी लागताच अनेक शाळांचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधासाठी गावोगावी प्रवास करतात. मात्र, गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळाल्यास निश्चितपणे पालकदेखील दुसऱ्या शाळेचा विचार करणार नाहीत, हेही तितकेच खरे आहे. स्पर्धेच्या काळात स्वत:मध्ये अपेक्षित बदल करून न घेतल्याने अनेक जुने शिक्षक सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर वयाच्या ५० ते ५७ व्या वर्षी अतिरिक्त झाले आहेत. नवीन शाळांमध्ये आता त्या शिक्षकांना गुणवत्ता व पटसंख्या राखण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.
गुरुवारी ‘नु.म.वि.’त समायोजनाचा कार्यक्रम
शहर-जिल्ह्यातील मराठी व उर्दु माध्यमातील १०५ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाणार आहे. ज्या अनुदानित शाळांमध्ये उपशिक्षकांची पदे रिक्त आहेत, त्याठिकाणी त्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे. गुरुवारी (ता. ११) डफरीन चौक परिसरातील नुतन मराठी विद्यालयात समायोजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व अतिरिक्त शिक्षकांची उपस्थिती बंधनकारक असेल, असे उपशिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी स्पष्ट केले आहे.
नऊ वर्षांतच शिक्षक अतिरिक्त
नवीन उमेदवाराला सुरवातीला तीन वर्षे शिक्षणसेवक म्हणून काम करावे लागते. त्यानंतर उपशिक्षकपदी नियुक्ती मिळते. शिक्षकाची नोकरी करताना गुणवत्ता आणि पटसंख्या टिकवणे खूप महत्त्वाचे आहे. परंतु, त्याकडे वेळोवेळी गांभीर्याने न पाहिल्याने आणि जागोजागी शाळा झाल्याने पटसंख्या कमी झाली. त्यामुळे अवघ्या आठ-नऊ वर्षांतच काही शिक्षक अतिरिक्त झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.