डोंबिवलीः गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांवर काळाने घाला घातला आहे. डोंबिवलीहून राजापूरला जाणाऱ्या एसटी बसला एका डपंरने धडक दिल्याने हा अपघात घडला असून यात डोंबिवलीमधील काही भाविक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
सरोवर नगर परिसरात राहणारे विनोद तारले (वय 38) यांचा या अपघातात मृत्यू झाला असून त्यांची पत्नी वैष्णवी व 15 वर्षीय मुलगा अथर्व हे जखमी आहेत. त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
गणेशोत्सवसाठी कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी चाकरमानी शनिवारी, रविवारी रवाना झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या वतीने गणेशभक्तांना कोकणात जाता यावे यासाठी मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी कल्याण लोकसभा मतदार संघातून अनेक बस कोकणाच्या दिशेने रवाना झाल्या.
डोंबिवली पश्चिमेतील बावनचाळ परिसरातील रेल्वे मैदान येथून या एसटी बसेस शनिवारी संध्याकाळी कोकणात जाण्यासाठी रवाना झाल्या. यातीलच एक एमएच- 14, बिटी- 2665 या नंबरची बस राजापूर येथे घेऊन जाणाऱ्या चाकरमान्यांना घेऊन निघाली. पहाटेच्या सुमारास माणगाव येथे एका डंपरची जोरदार धडक बसल्याने बसला अपघात झाला.
या बस मध्ये डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा, सरोवर नगर, गरीबाचा वाडा परिसरातील बहुसंख्य प्रवासी होते. तसेच ठाणे, धारावी, राजापूर या भागातील नातेवाईकांकडे आलेले प्रवासी होते अशी माहिती समोर आली आहे. बसमध्ये एकूण 26 प्रवासी त्यात 9 महिला, 9 पुरुष व 8 लहान मुलांचा समावेश होता.
राजापूर येथे निघालेले तारले कुटुंब या बसमध्ये होते. अपघातात विनोद तारले यांचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी व मुलगा यात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. डोंबिवली येथे सध्या त्यांचे कोणी नातेवाईक नसून गणपतीसाठी सर्व गावी निघाले असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे डोंबिवली पश्चिम भागात शोककळा पसरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.