अहिल्यादेवी होळकरांची आज जयंती. आपल्या पराक्रमाने आणि समाजकार्याने संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या अहिल्यादेवींचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी झाला. त्या मराठा साम्राज्याचे सरदार मल्हारराव होळकर यांच्या सून. त्यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गाव होते. स्त्रीशिक्षण त्यावेळी फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवलं. त्यानंतर पुढे त्या सरदार मल्हारराव होळकर यांच्या सून झाल्या. पण त्यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी या गावाबद्दल आपल्याला माहिती आहे का?
चौंडी. भारताच्या जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेले गाव. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान. कर्जत जामखेड रोडवर चौंडी हे ठिकाण आहे. याच महामार्गावरून जाताना आपल्याला उंच पुतळा नजरेस पडतो. तो पुतळा आहे अहिल्यादेवी होळकर यांचा. पुतळ्याच्या बाजूला असलेल्या बागेत आपल्याला राशीचक्राचे माहितीफलक आणि १२ राशींचे प्रतिकात्मक पुतळे दिसतात. येथील अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यावर नतमस्तक होण्यासाठी आणि प्रेरणा घेण्यासाठी अनेक अनुयायी येत असतात. या पुतळ्याच्या मागच्या बाजूस त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे शिल्प कोरले आहे. चौंडीतून वाहणाऱ्या सिना नदीने गावची शान वाढवलीये.
ज्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला आहे ते ठिकाण चौंडीकरांनी वारसास्थळ म्हणून जतन केलेले आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मदिनी ज्या वाड्यात त्यांचा जन्म झाला त्या पवित्र आणि प्रेरणादायी वास्तूचे दर्शन घेण्यासाठी त्यांचे अनुयायी येत असतात. चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मस्थळाचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमांतून राज्य सरकारकडून 1995 सालापासून विकास केला जात आहे.
चौंडी हे गाव देशाच्या पर्यटन नकाशावर यावे यासाठी राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत. चौंडीतून वाहणाऱ्या सिना नदीचे सुशोभिकरण केल्यास पर्यटनात वाढ होण्यास मदत होणार आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यांचा विकास झाल्यावर पर्यटनाला चालना मिळणार आहे.
या गावी जन्मलेल्या अहिल्याबाई होळकर यांनी पुढे आपल्या कार्याने इतिहासात आपले नाव कोरले आहे. त्या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी पूर्ण भारतात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्र, धर्मशाळांचे बांधकामही केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.