जयंतरावांशी भाजपचे वरिष्ठ नेते व काही हायप्रोफाईल उद्योजक चर्चा करीत असल्याची माहिती समाज माध्यमातून समोर आली.
सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या शिलेदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने (Ajit Pawar) साद घातल्याचे समजते. सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांसह पहिल्या-दुसऱ्या फळीतील नेत्यांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक (Mansingrao Naik) यांच्याशी त्यांनी तीनवेळा संपर्क केला आहे. आमदार नाईक यांनी मुंबईत आल्यानंतर भेटू, असे स्पष्ट केल्याची माहिती आहे. पुढील आठवडा जिल्ह्याच्या राजकारणात मोठा उलटफेर करणारा ठरू शकतो. त्यामुळे जयंत पाटील यांना आपला गट शाबूत ठेवण्याच्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राज्यात खळबळ माजली. त्यातच आता शरद पवार यांचे विश्वासू मानले जाणारे अनेक जण अजित पवार यांच्याबरोबर गेलेत. सांगली जिल्ह्यातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अन्य नेते शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे राहिले.
त्यात शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक, तासगाव-कवठेमहांकाळच्या सुमनताई पाटील, विधान परिषद सदस्य अरुण लाड यांच्यासह सर्वच फळी शरद पवार यांच्यामागे राहिली. अजित पवार यांना जिल्ह्यातून सर्वप्रथम माजी महापौर इद्रीस नायकवडी व त्यानंतर नगरसेवक वीरेंद्र थोरात यांनी पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांना सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी भेटून आले.
त्याबाबत प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी दुसऱ्या दिवशी अजित पवार माझे मामा असल्यामुळे भेट घेतल्याचे स्पष्टीकरण दिले. मी शरद पवार व जयंत पाटील यांच्यासोबत असल्याचे त्यांनी जाहीर केले. आजचा दिवस मात्र जयंत पाटील यांच्याविषयी वेगवेगळ्या चर्चांना धुमारे फोडणारा ठरला. जयंतरावांशी भाजपचे वरिष्ठ नेते व काही हायप्रोफाईल उद्योजक चर्चा करीत असल्याची माहिती समाज माध्यमातून समोर आली.
जयंतरावांनी तूर्त यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्याचवेळी त्यांच्या निकटवर्तीयांना अजित पवार गटाकडून संपर्क साधला जात आहे. आमदार मानसिंगराव नाईक यांचे नाव त्यात आघाडीवर आहे. त्यांनी स्वतः पत्रकारांशी बोलताना अजित पवार गटाकडून माझ्याशी संपर्क साधल्याचे स्पष्ट केले.
आमदार नाईक जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आहेत. जिल्हा बॅंकेच्या गेल्या संचालक मंडळ काळातील कारभारावर गंभीर ताशेरे ओढणारा चौकशी अहवाल सहकार आयुक्तांकडे सादर झाला आहे. त्याकडेही राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. याबाबत आमदार नाईक यांनी बॅंकेसारख्या किरकोळ बाबींमध्ये उपमुख्यमंत्री लक्ष देणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.