पिंपरी चिंचवडः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पिंपरीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी 'चांद्रयान ३'च्या यशस्वी लँडिंगबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रोच्या वैज्ञानिकांचं कौतुक केलं. तसंच त्यांनी त्या दिवशी झालेल्या चुकीबद्दल खुलासा केला.
पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, आम्ही २ जुलै रोजी राज्याच्या मंत्रिमंडळात सहभागी झालो. त्यानंतर एकदा या शहरात आलो होतो. मधल्या काळात अधिवेशन होतं, इतर कामं होती, व्यस्तता होती. विकासकामात लक्ष घालायला आणि प्रश्न सोडवायला मला आवडतं. त्यामुळे पिंपरी चिंचवडमधील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे.
अजित पवार पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होत आहे. चांगली कामं सुरु आहेत. चांद्रयान ३ मोहिमेमुळे जगाच्या पाठीवर आपलं कौतुक होत आहे. मी त्या दिवशी चांद्रयान तीनबद्दल बोलत असतांना चुकून माझा शब्द चंद्रकांत गेला. त्यानंतर माझ्या मित्रांनी खिल्ली उडवली.. यावेळी अजित पवारांनी हाहाहा... असं करत हसून दाखवलं.
''माझ्याकडून चूक झाली. प्रत्येक शब्द आम्ही तोलून मापून बोलायला पाहिजे. परंतु त्याबद्दल मी माफी मागतो. दोनच दिवसांपूर्वी चांद्रयान ३चं यशस्वी लँडिंग झालं आहे. जे काम शास्त्रज्ञांनी, तंत्रज्ञांनी केलं, ते कौतुकास्पद आहे. नागरिकांनी या मोहिमेला त्याला मनापासून पाठिंबा दिला होता. देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल, असा हा प्रसंग आहे'' असं पवार म्हणाले.
अजित पवार पुढे बोलले की, लँडरमधून रोव्हर बाहेर पडलेलं आहे. तिथे बर्फासारखंही काही आढळून आलेलं आहे. जगभरातल्या वैज्ञानिकांना भविष्यातील अभ्यासासाठी फायदा होणार आहे. सगळ्याच वैज्ञानिकांना संशोधन करणं सोपं जाणार आहे. १४० कोटी जनतेलादेखील खूप मोठा फायदा होणार असून या मोहिमेमुळे भारत जगातल्या मोठ्या देशांच्या रांगेत जावून बसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.