पुणे : आकाशवाणीच्या जिल्हा केंद्रांवरील कार्यक्रम बंद करून मुंबई केंद्राचेच कार्यक्रम सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान प्रक्षेपित करण्याचा आदेश प्रसार भारतीने दिला आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. स्थानिक निवेदक, कलाकारांकडून त्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. (Akashvani Local Program Stop)
राज्यात आकाशवाणीची जिल्हास्तरावर २८ केंद्र आहेत. पुणे, नागपूर, औरंगाबाद, नागपूर, जळगाव, परभणी, कोल्हापूर, सांगली आणि रत्नागिरी ही मोठी केंद्र आहेत. या केंद्रांवरून स्थानिक कार्यक्रमांचेही प्रक्षेपण होत असे. त्यामुळे स्थानिक निवेदक, कलाकार यांना संधी मिळत. तसेच स्थानिक कार्यक्रमांनाही तेथे व्यासपीठ उपलब्ध होत असे. त्यातून प्रत्येक शहराची आणि शहरातल्या कलाकारांची तसेच परिसराची माहिती श्रोत्यांना घरबसल्या मिळत.
परंतु, प्रसार भारतीच्या नव्या आदेशामुळे पहिल्या टप्प्यात सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रक्षेपित होणारे कार्यक्रमच स्थानिक केंद्रांनी प्रक्षेपित करायचे आहेत. एक राज्य, एक प्रायमरी चॅनेल किंवा एकच मुख्य वाहिनी, या धोरणानुसार प्रसार भारतीने प्रमुख केंद्रांना नव्या आदेशाचे पत्र १९ जानेवारीला पाठविले आहे. प्रसार भारतीच्या अतिरिक्त महासंचालकांतर्फे कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष जाधव यांची त्यावर स्वाक्षरी आहे. पुढच्या टप्प्यात ‘आकाशवाणी महाराष्ट्र’ या एकाच केंद्रावरून राज्यात कार्यक्रम प्रक्षेपित करण्याचा प्रसार भारतीचा मानस असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
प्रत्येक जिल्हा केंद्राची स्वतःची ओळख असते आणि कार्यक्रम असतात, ते हळूहळू संपुष्टात येणार आहेत. आकाशवाणीने या पूर्वी अनेक कलावंत घडवले आहेत. तरीही स्थानिक कलाकार, कार्यक्रमांच्या वैविध्यावर आणि स्थानिक निवेदकांवरही प्रसार भारतीच्या नव्या आदेशामुळे गदा येणार आहे. त्यामुळे स्थानिक कार्यक्रमांमध्ये आरोग्य, पर्यावरण किंवा शेती विषयक असे कार्यक्रम, बालविभाग, संगीत विभाग, महिला विभाग असतात.
ते राज्यपातळीवर एकाच पद्धतीने सादर होणार आहेत. राज्यातील सर्व निवेदकांपासून ते आकाशवाणीत विविध विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आणि असंख्य श्रोत्यांनी या बदलाला विरोध दर्शवला आहे. या बाबत आकाशवाणी पुणे केंद्राशी संपर्क साधला, असता प्रसार भारतीच्या दिल्ली कार्यालयाने या बाबत निर्णय घेतला आहे. माहिती म्हणून राज्यातील विविध केंद्रांना आदेशच पाठविला आहे. त्यामुळे या बाबतच्या निर्णयावर आम्ही बोलू शकत नाही, असे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रसार भारतीला आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या स्वायतत्ता देण्यात आली. मात्र, आता केंद्रीकरण करण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यांची स्वतंत्र ओळख पुसली जाणार आहे. तसेच जिल्हा-जिल्ह्यातील मराठी निवेदक, कलाकार आर्थिकदृष्ट्या अडचणीत येणार आहेत. त्यामुळे प्रसार भारतीने स्थानिक केंद्रांचे स्वातंत्र्य अबाधित राखावे.
- एक वृत्तनिवेदक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.