Akola: पश्चिम विदर्भात रविवारी (ता.२६) रात्री आलेला वादळी वारा, जोरदार पावसाने खरीपातील पिके तसेच भाजीपालावर्गीय पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हा पाऊस रब्बी पिकांसाठी दिलासा देणारा मानल्या जात आहे. अनेक मंडलांमध्ये अतिवृष्टीचीही नोंद झाली आहे. बाळापूर तालुक्यात २० मेंढ्या दगावल्यात.
रविवारी रात्री विजांच्या कडकडासह वादळी पावसाने धुमाकूळ घातला. अकोला, बुलढाणा, वाशीम जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची कमी-अधिक प्रमाणात हजेरी लागली. सोमवारी (ता.२७) सुद्धा अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. हवामान खात्याने या भागात २६ ते २८ नोव्हेंबर या काळात पाऊस, गारपिटीचा इशारा आधीच दिला होता.
रविवारी दुपारपासूनच पावसाचे वातावरण तयार झाले होते. सायंकाळच्या सुमारास काही ठिकाणी पाऊस आला. रात्री १० नंतर बहुतांश भागात पावसाने जोर धरला. विजांचा मोठा कडकडाट झाला. शिवाय वादळही घोंघावले. यामुळे टोमॅटो, मिरची, वेलवर्गीय फळभाज्यांचे नुकसान झाले. काही भागात वादळामुळे ही पिके जमिनदोस्त झाली.
सध्या खरीपातील कपाशी, तसेच तुरीचे पीक उभे आहे. वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने अनेक शेतांमध्ये कपाशीच्या झाडांवर कापूस होता. हा कापूस पावसाने ओला झाला. कापूस आता लोंबकळला आहे. ओला झाल्याने हा कापूस आता पिवळा पडून दर्जा खालावण्याची चिंता आहे. वाशीम जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे. कपाशीच्या पिकात पाणी साचले.
रब्बीसाठी फायदेशीर
रविवारी रात्री झालेला पाऊस प्रामुख्याने रब्बीसाठी फायदेशीर ठरणार आहे. परतीचा पाऊस न झाल्याने रब्बी लागवड रखडत चालली होती. सिंचनाची सुविधा असलेल्या क्षेत्रात पेरणी सुरू होती. ज्यांनी थोड्या ओलीच्या आधारे पेरणी केली अशा शेतातील उगवण झालेल्या हरभऱ्याला हा पाऊस नवसंजीवनी देणारा ठरेल. सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने रखडलेल्या रब्बी पेरण्यासुद्धा आता वेग घेतली. काही प्रमाणात कोरडवाहू कपाशी पिकालाही याचा फायदा होईल.
अतिवृष्टी झालेली मंडळे
बुलडाणा जिल्हा ः जळगाव जामोद ७६.८, आसलगाव ७६.८, म्हसला ७७, देऊळगावराजा शहर ९०, देऊळगावराजा ग्रामीण ८६.३, तुळजापूर १०१, मेहुणाराजा ८७, मेहकर ७६.५, जानेफळ ६५.३, शेलगाव देशमुख ६५.३, डोणगाव ६७.५, देऊळगावमाळी ८३.५, लोणी ७१.३, कल्याणा १००, सिंदखेडराजा ९८.८, किनगावराजा ८६.३, सोनोशी ७९.५, शेंदुर्जन ८१, साखरखेर्डा ७७.३, बिबी ६८.३, सुलतानपूर ७२.४, टिटवी ७७, अंजनी खुर्द ६५, शेगाव ६५.५, जवळा ६५.५.
वाशीम जिल्हा ः रिसोड ९४.३, भरजहाँगीर ८८.८, पार्डी आसारे ७०, वाकद ७१.३, मोप ६२.५, शिरपूर ६६.३, करंजी ६३ मिलिमीटर.
२० मेंढ्या दगावल्या
अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात उरळ बुद्रूक जवळील टाकळी गावात गारपीट व पावसामुळे मेंढ्या दगावल्याची माहिती मिळाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील लाखनवाडा येथील शालिग्राम तुकाराम बिचकुले हे या भागात शेळ्यामेंढया चराईसाठी आलेले आहेत. रविवारच्या पावसामुळे त्यांच्या २० मेंढ्या दगावल्या असून, पाच ते सहा मेंढ्या गंभीर जखमी आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.