मुंबई - महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडवत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत संधान साधलं. भाजपने देखील शिंदे यांनी कमी आमदार असताना मुख्यमंत्रीपद दिलं. त्यामुळे भाजपला मुख्यमंत्री पदापेक्षा मुंबई महत्त्वाची हे स्पष्ट झालं होतं. तर दुसरीकडे ४० आमदार गेल्याने शिवसेनेची पुरती वाताहत झाली. मात्र सामान्य शिवसैनिक अजुनही शिवसेनेसोबत असल्याचा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेसह इतर नेते करत आहेत. त्यातच केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जमीन दाखवा म्हणत आक्रमकता दाखवली. मात्र त्यांची ही आक्रमकता मुंबईकरांना आणि मराठी माणसाला रुचणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Amit Shah and Uddhav Thackeray news in Marathi)
मुंबईत भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या मेळाव्यात अमित शहा यांनी आक्रमक पावित्रा घेत शिवसेनेला जमिनीवर आणण्याचं आवाहन केलं. वास्तविक पाहता, शिवसेनेची स्थिती आताच बिकट आहे. अर्थात शिवसेना संपविण्याचं आवाहन अमित शहा यांनी केलं का, अशी शंका उपस्थित होतेय.
अमित शहा आपल्या भाषणात म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना जमीन दाखवा. त्यांनी आपल्याला धोका दिला आहे. राजकारणात काहीही करा पण धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईवर केवळ भाजपचे वर्चस्व राहिले पाहिजे, असही शहा म्हणाले. मात्र अमित शाह यांच्या आक्रमक विधाने मुंबईकरांना कितपत रुचणार हेही महत्त्वाचं आहे. याचं कारण म्हणजे २०१९ विधानसभा निवडणूक आहे.
२०१९ विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची चहुबाजुने कोडीं केली होती. अनेक नेते पक्ष सोडून भाजपमध्ये सामील झाले होते. मात्र साताऱ्यातील शरद पवारांच्या सभेने राष्ट्रवादी काँग्रेसला कमबॅक करून दिलं होतं. तेव्हा शरद पवारांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्याचा फायदा राष्ट्रवादीला मिळाला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून ५० जागाही जिंकू शकणार नाही, असा अंदाज वर्तविण्यात आलेला असताना दोन्ही पक्षांनी मिळावून ९६ जागांपर्यंत मजल मारली होती. त्यात राष्ट्रवादीने ५४ जागा जिंकल्या होत्या.
दरम्यान मुंबई आणि महाराष्ट्रात शिवसेनेसह उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच अमित शहा यांनी केलेलं भाषण बाळासाहेबांना मानणाऱ्या मराठी माणसाला आणि शिवसैनिकांना जिव्हारी लागू शकतं. मात्र अमित शहा यांचं मुंबईतील भाषण शिवसेनेच्या पथ्यवर पडतं की, भाजपला अडचणीत आणणारं ठरेल हे येणाऱ्या काळातच समोर येणार आहे. मात्र अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला की, महाराष्ट्रातील मतदार त्या पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या पाठिशी उभे राहतात, हे इतिहास सांगतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.