नाशिक : वाईन विक्रीबद्दल (Wine Selling) लोकांना विचारुन निर्णय घ्या असे म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी शेतकऱ्यांसोबत असल्याची ग्वाही आज दिली. श्री. हजारे यांची राळेगणसिद्धी येथे महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघाच्या पदाधिकाऱ्यांसह सांगली, सोलापूर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेतली. वाईन व्यवसाय द्राक्ष शेतीशी जोडला गेला असल्याने शेती विरोधात भूमिका घेतली जाऊ नये, अशी विनंती त्यांना करण्यात आली असल्याची माहिती संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी दिली.
मद्यासोबत वाईनची तुलना करणे अयोग्य...
राज्य सरकारने वाईन सुपर मार्केट, मॉलमध्ये विक्रीसंबंधी काही नियम घालून परवानगी दिली आहे. त्याचे संघाने समर्थन केले आहे, असे सांगून श्री. भोसले म्हणाले, की राज्यात दरवर्षी देशी मद्य ३६ कोटी लिटर, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य २२ कोटी लिटर, बिअर ३० कोटी लिटर अशी एकुण ८८ कोटी लिटरची विक्री होते. वाईनची विक्री मात्र ७५ लाख लिटर इतकी आहे. शिवाय देशी मद्य ४० ते ५० रुपयांना आणि वाइन ४०० ते ५०० रुपयांना विकत मिळत असल्याने देशी मद्यपी हे वाईन विकत घेऊ शकत नाहीत. त्याचवेळी मर्यादित व नियमित वाईन सेवनचे आरोग्यदायी असल्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात. त्यामुळे मद्याची आणि वाईनची तुलना करणे अयोग्य आहे. वाइन उत्पादन हे द्राक्षांपासून प्रक्रिया करुन होते. केंद्र सरकार प्रक्रिया उद्योगांसाठी सबसिडी देते. या साऱ्या बाबींचे निवेदन श्री. हजारे यांना संघातर्फे देण्यात आले आहे. याखेरीज श्री. हजारे यांनी ९० दिवसांचा दिलेला वेळ स्वागतार्ह्य आहे.
...तर राळेगणसिद्धीमध्ये आंदोलन
संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र निमसे, मानद सचिव बाळासाहेब गडाख, माजी अध्यक्ष रवींद्र बोराडे, रावसाहेब रायते, विजय घुमरे, राजेंद्र सोनवणे, शेखर होळकर आदी उपस्थित होते. वाईन विक्रीबाबत शेतकरी आग्रही आहे. त्याअनुषंगाने पुन्हा आंदोलनाचा निर्णय घेतला गेल्यास द्राक्ष उत्पादक राळेगणसिद्धीमध्ये आंदोलन करतील, असा इशारा श्री. भोसले यांनी दिला आहे. श्री. भोसले म्हणाले, की जगामध्ये इसवी सन पूर्व ६ हजार पासून इटली, फ्रान्स, अमेरिका, अर्जेन्टिना वाईन उत्पादनात अग्रेसर आहे. वाईन ‘फर्मेन्टेशन'ने तयार होत असल्याने फळाचे पोषणमूल्य आणि औषधी गुण टिकून राहतात. त्यामुळे वाईन हे अन्न आणि औषधी आहे. रेड वाईनमुळे पचनशक्ती मजबूत होते. पोटातील बॅक्टेरियाचा नायनाट होतो. पोटातील अल्सर कमी होण्यास मदत होते. रेड वाईन रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या समस्येवर गुणकारी आहे. वाईन पाक प्रक्रियेत आणि स्वयंपाकात चवीसाठी वापरली जाते असे अनेक फायदे सांगता येतील.
वाइन उद्योग ५ हजार कोटींवर नेण्याचा मानस
देशात फळांवर १० टक्क्यांच्या आत प्रक्रिया होते. परदेशात हे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत आहे. राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या धोरणामुळे शेतमालाचे मूल्यवर्धन होऊन ग्रामविकासाला चालना मिळेल. रोजगार निर्मिती आणि पर्यटनाला मदत होईल. देशातील वाईन उद्योग १ हजार कोटींवरुन ५ हजार कोटींपर्यंत नेण्याचा मानस आहे, असे सांगून श्री. भोसले म्हणाले, की गोवा आणि मध्यप्रदेशात बेरी फळाच्या वाइन उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘मागेल त्याला होमडिलीव्हरी‘ सेवा दिली जात आहे. ही सारी परिस्थिती पाहता, महाराष्ट्र मद्यराष्ट्र होईल, असा आरोप करणे चुकीचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.