औरंगजेबाबरोबरच कधी अफजल खान तर कधी टिपू सुलतान निमित्त ठरतो आहे. ‘‘अचानक औरंग्याच्या एवढ्या औलादी कुठून पैदा झाल्या?’’
गेल्या वर्षी जून महिन्यात उद्धव ठाकरे सरकारची उलट गणती सुरू झाली होती. त्यावेळी राजकीय वर्तुळात एकच चर्चा केंद्रस्थानी होती, एवढे सारे विधिमंडळ सदस्य मंत्र्यांसह राज्याबाहेर जात असताना याची माहिती मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना कशी नव्हती?
सूरतच्या दिशेने जाणाऱ्या विधिमंडळ सदस्य व मंत्र्यांना‘वर्षा’वर परत आणा, असा आदेश दिल्यावरही ही वाहने निघून कशी गेली. या चर्चेचा रोख आपसूकच पोलिस विभागाकडे होता.
ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे (मविआ) सरकार जाऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना बंडखोर गट व भाजप यांचे सरकार सत्तेवर येत असताना आणि आता हे सरकार वर्षपूर्ती करत असताना कायदा-सुव्यवस्था आणि पोलिसांची कामगिरी हे विषय राजकारण आणि समाजकारणाच्या केंद्रस्थानीच आहेत.
हे वातावरण गेले वर्षभर या न त्या कारणाने धुमसताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात किमान आठेक ठिकाणी चिंताजनक परिस्थिती पोलिसांना हाताळावी लागलेली आहे. याला निमित्त ठरते आहे ते औरंगजेबाचे तथाकथित उदात्तीकरण!
औरंगजेबाबरोबरच कधी अफजल खान तर कधी टिपू सुलतान निमित्त ठरतो आहे. ‘‘अचानक औरंग्याच्या एवढ्या औलादी कुठून पैदा झाल्या?’’ हे गृह खात्याचा कारभार सांभाळणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानही तेवढ्याच जोरात घुमते आहे. त्याचे प्रतिध्वनी विविध स्तरांवर उमटताना दिसत आहेत.
राज्यात दोन स्तरांवर पोलिस कसरत सुरू असल्याचे दिसते आहे. एक राजकीय स्तरावर आणि दुसरी सामाजिक स्तरावर.
हिंदू आक्रोश मोर्चे, औरंगजेब उदात्तीकरणाच्या आरोपांवरील प्रतिक्रिया, ठाकरे गटाचे अधिकृत-अनधिकृत हे वाद रस्त्यांवर दिसत असताना सत्तेच्या सारीपाटावर विशेष चौकशी पथक (एसआयटी), इतर चौकशा सुरू आहेत.
केंद्रीय तपास यंत्रणांबरोबरच राज्य पोलिस दलालाही विशेष जबाबदारी पार पाडावी लागत आहे. ठाकरे यांचे काही निकटवर्तीय चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता मुंबईतील राजकीय वातावरण तापवते आहे.
मुंबईतील घटनांचे पडसाद राज्यभरात उमटत असतात. यावर आता तत्काळ प्रतिक्रिया म्हणून शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे काढला जाणारा मोर्चा कसा निघेल आणि त्यातून कायदा व सुवव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही ना. तसेच उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाला कसा प्रतिसाद मिळेल, याकडे लक्ष असणार आहे.
राजकीय वातावरण तंगच
एक जुलै रोजी शिवसेनेतर्फे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) बृहन्मुंबई महापालिकेवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याचा मार्ग कोणता असावा, यासाठी ठाकरे गट मुंबई पोलिसांशी चर्चा करत आहे. त्याआधी या शिवसेनेची एक शाखा अनधिकृत आहे, असे सांगत महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून ती तोडण्यात आल्यानंतर एका अभियंत्यावर हल्ला झाला. राजकीय वातावरणाबरोबरच कायदा व सुव्यवस्थेचे वातावरणही तप्त आहे.
- रविकिरण देशमुख, राजकीय विश्लेषक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.