Ashadhi Wari 2024 sakal
महाराष्ट्र बातम्या

Ashadhi Wari 2024 : माणसा माणसांत विठुरायाचे दर्शन

आषाढी वारीत सर्वांना येण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य आहे. पंढरपूरला किंवा कीर्तनाला येण्याचा हक्क आहे. कोणी देव मानतो किंवा मानत नाही. देव मानणारा देवाचे दर्शन घेतो.

सकाळ वृत्तसेवा

- सचिन महाराज पवार, प्रसिद्ध कीर्तनकार

आषाढी वारीत सर्वांना येण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य आहे. पंढरपूरला किंवा कीर्तनाला येण्याचा हक्क आहे. कोणी देव मानतो किंवा मानत नाही. देव मानणारा देवाचे दर्शन घेतो. पण, देव न मानणाऱ्याने वारीतील समाज पाहायला यावे. वारकरी नास्तिक माणसाचा द्वेष करत नाहीत आणि देव मानणाऱ्याला डोक्यावरही घेत नाहीत. देव मानणे न मानणे, हा ज्याचा त्याचा मुद्दा आहे. परंतु, ‘तुझ्या जागी विठुराय दिसतो म्हणून अहंकार बाजूला ठेवून मी तुझ्यावर प्रेम करतो’, ही भूमिका वारकऱ्यांच्या ठायी दिसते. माणसा माणसांत त्याला विठुरायाचे दर्शन होते.

आपण माणूस म्हणून उन्नत होत जातो. त्यावेळेस समोरचा माणूस माझ्या विचारांचा नसेल. त्याचे कपडे माझ्यासारखे नसतील. तो आपल्याप्रमाणे अन्नग्रहण करत नसेल. त्याची उपासना पद्धती निराळी असेल. तरीही तो माझा, आपलासा वाटायला लागणे, एवढीच वारकरी संप्रदायाची उदात्त उपासना पद्धत आहे, असाच विचार संतांनी केला आहे. संत चोखोबा म्हणतात,

‘खटनट यावे। शुद्ध होऊनी जावे।

दवंडी पिटीभावे। चोखामेळी ।।

संतांचे आवाहनच सर्वांना सोबत घेण्याचे आहे. म्हणूनच सर्व भाषिक लोक वारीत सहभागी होऊ शकतात. कर्नाटक, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्र, गुजरात आणि गोव्यामधूनही लोक येतात. भाषावार लोक येतात. महाराष्ट्रातील प्रत्येक बोलीभाषेचा प्रतिनिधी वारीत असतो. वारीत जात विचारली जात नाही. बरं, धर्माचे काय? तर...,

कबीर लतिफ मोमीन मुसलमान ।

सेना नाव्ही जान विष्णुदास ।।

हे संतांचे वचन आहे. लतीफ महाराज, कबीर महाराज, मोमीन महाराज हे सर्व मुस्लीम होते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे समकालीन श्रीगोंद्याचे शेख मोहमंद महाराज यांची पालखी पंढरपूरला येते. ते वारकरी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे त्यांना गुरुस्थानी मानत.

सर्वधर्म समभाव

रिंगणात महिला डोक्यावर तुळस घेऊन धावतात. मध्ययुगीन पुरुषी मानसिकतेचा आपण विचार केला, तर महिलेने सर्वांसमोरून धावणे, कोणी सहन करतील? शक्यच नाही. मात्र, लाखोंचा समाज बसलेला आहे आणि काही वारकरी महिला डोक्यावर तुळस घेऊन आनंदाने धावतात. तरूण धावतात. तरुणी धावतात. अश्‍वही धावतात. इथे केवळ माणसांनाच महत्त्व नाही. तर तुकाराम महाराज यांच्या सोहळ्यात मेंढ्यांचे रिंगण होते. रथाच्या बैलांचा सन्मान करतात.

वारीत अगदी पशुंचाही सहभाग दिसतो. वारीत सर्व जात, धर्म, पंथ सर्वांचा सहभाग दिसतो. पण, समाज म्हणून सध्या भिती वाटण्याचा काळ आला आहे. मला कीर्तनकार म्हणून समाज दोन गटांत विभागला गेल्याचे दिसतो. धर्म मानतात. परंतु ते प्रचंड धर्मांध झाले आहेत आणि दुसऱ्या बाजूला नास्तिक, कोरडे बुद्धिवादी आणि आत्मकेंद्रीत लोक दिसतात. देव, धर्म मानायचे आणि खूप स्वतःपुरते जगायचे. या दोन्हींचाही विवेक वारीत साधला जातो. वारीतील ही सर्वसमावेशकता आहे. फक्त वारी उघड्या डोळ्यांनी पाहिली पाहिजे.

संतांवर विश्‍वास हवा

आस्तिक- नास्तिक असणे या गोष्टीला चुकीच्या अर्थाने टोकदार करू नका. भारतीय राज्यघटनेने आपल्या सर्वांना उपासनेचे स्वातंत्र्य दिले आहे. तुम्हाला आपल्याला सर्वांना उपासनेचे स्वातंत्र्य दिले आहे. जोपर्यंत माझी उपासना, माझी श्रद्धा आणि माझा विश्‍वास दुसऱ्याला हानी पोचवत नाही, तोपर्यंत तो माझा संवैधानिक अधिकार आहे. एखादा नास्तिक असेल, परंतु तो उपद्रवी नसेल तर चालेल.

परंतु, देव-धर्म असल्याचे भासवून उपद्रवी असेल तर तो राक्षसच म्हणावा लागेल. नीतीमत्ता मानणे ही मोठी गोष्ट आहे. वारी ही सर्वांचे स्वागत करते. उलट, काठावर बसून शेरेबाजी करण्यापेक्षा किंवा टिका करण्यापेक्षा उदार बुद्धिवादाचे प्रदर्शन करून, ‘आपण खूप तळागाळापर्यंत काम करतो’ असे म्हणायचे आणि सेंद्रीय विचार, भक्तीच्या परंपरांना विरोध करतो, त्याला वारीत महत्त्व नाही. त्याला वारकरी जुमानतही नाहीत.

आपण सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून आपल्याला जे काही शिकायचे आहे, ते उघड्या डोळ्यांनी शोधायला आले पाहिजे आणि मनमोकळेपणाने व्यक्त झाले पाहिजे. तुम्हाला प्रश्‍न पडले पाहिजेत आणि ते तुम्ही समजदार लोकांना विचारले पाहिजेत. संतांवर विश्‍वास ठेवून वारीत आले पाहिजे.

किमान गरजांत जगण्याचा रियाज

आपण जिथे असू तिथे स्वच्छता पाळली पाहिजे. देवा-धर्माच्या आड लपण्याची गरज नाही. वारकरीसुद्धा काही तरी जिंकण्यासाठीच निघालेला असतो. परंतु, त्याने जे मिळविले आहे ते न दिसणारे आहे. ३६५ दिवसांपैकी १५-२० दिवस स्वतःच्या शोधात बाहेर पडणे, हे आपल्या व्यक्तिमत्त्वातच अतिरिक्त जोड आहे. सध्या मोबाईलशिवाय एखादा तासही राहता येत नाही. आपल्या सर्वांच्या प्रतिष्ठा या वस्तु संग्रहावरून, त्यांच्या ब्रॅण्डवरून झाल्या आहेत. वस्तु बाजूला ठेवून सुद्धा समाधानाने जगता येते. हे दाखविणारी वारी आहे. कमीत कमी गरजांमध्ये आपण उत्तम जगू शकतो, याचा रियाज होण्यासाठी आपण वारीला गेले पाहिजे.

निष्ठेची अनूभुती जागोजागी

पेरले की लगेच उगवत नाही. मध्यंतरी थोडा संभ्रमाचा काळ असतो. तेव्हा, संयम लागतो. पेरल्यावर नेमके उगवेपर्यंत महाराष्ट्र काय करतो, तर संभ्रमित होण्यापेक्षा वारीला जाऊन येतो. संयमाचे शिक्षण वारीत मिळते. निष्ठा म्हणाल तर शेकडो उदाहरणे दिसतात. माउली, तुकाबोरायांची पालखी विशिष्ट तिथीला पंढरपूरला निघते. परंतु, अनेक वारकरी असे आहेत की, ते घरून पायी वारीला निघतात.

ते माउलींसमवेत चालत पंढरपूरला जातात. पंढरपूरवरून परत माउलींसमवेत आळंदीला येतात आणि मग, गावी पायीच परततात. निष्ठा म्हणाल तर दररोज देवासमोर भजन करायला सकाळी उभे राहतात. पालखी टेकवत नाही, तोपर्यंत खाली बसत नाहीत किंवा पाणीही पीत नाहीत. विसावा हा संतांसाठी नव्हे, तर त्यांनीच तो भक्तांसाठी घेतला आहे. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा बाळगत नाहीत.

तरीसुद्धा वारकरी भजन करत असतात. निष्ठेची अनेक रुपे वारीत दिसतात. या निष्ठावंत लोकांनीच वारीचे महात्म्य टिकवले आहे. दहा-वीस महिला एकत्र येत दीड-दोन हजार लोकांच्या भाकरी थापतात, ही पण निष्ठाच आहे. टाळ वाजवणे, तंबू ठोकणे, स्वयंपाक करणे हे देखील भजनच आहे.

अभंग हेचि प्रमाण

आपला समाज हा गाणारा आहे. शेतात मोट चालते, काम करताना महिला गात असतात. पेरणी होताना, लग्नात काही ठिकाणी दुःखात देखील गायले जाते. हे सर्व भौतिक दृष्टीने गायले जाते. मात्र, परमार्थिक दृष्टीने गायन करणे हे वारकऱ्यांमध्ये घडते. त्यांच्यात कर्मकांड महत्त्वाचे आहे का? तर नाही. अभंग, भजन हेच प्रमाण आहेत.

तुका म्हणे येथें भजन प्रमाण।

काय थोरपण जाळावें तें ॥

वारकरी संतांच्या रचना गात चालत जातात. मानवी आयुष्य उन्नत करताना ‘आडात’ संत विचार हवेत आणि ‘पोहऱ्यात’ कृती पाहिजे. तो विचार संतांच्या अभंगांत आहे. जगण्याकडे पाहण्याचा उत्तम दृष्टिकोन स्विकारत, अनावश्यक गोष्टी सोडून जगण्याचे सार काय? या प्रश्‍नाचा पाठलाग करत, प्रेम करत, स्वच्छ मनाने पांडुरंगाकडे जात राहायला हवे.

देव हवा तर, चित्त शुद्ध ठेवा

निष्कामबुद्धीने कौशल्यपूर्ण कर्म करण्याविषयी संत आग्रही आहेत. त्याचे ठळक तत्त्वज्ञान अभंगामध्ये आहे. चालता चालता गात गात याच तत्त्वज्ञानाचा रियाज होत राहतो. कर्मकांडांच्या नादी लागण्यापेक्षा विठोबाच्या नावाबद्दल प्रेम निर्माण होते. परमार्थाचा मार्ग हा भजनामधून निर्माण झालेला दिसतो. भजनाचा क्रम ठरलेला आहे. त्यात काकडा, नाट, हरिपाठ, नियमांची भजने होतात. बाळक्रीडा होते. वारानुसारही अभंग होतात.

विशिष्ट स्थानावर विशिष्ट प्रकारचे अभंग म्हटले जातात. जेजुरी, शिखर शिंगणापूर किंवा पंढरपूरच्या मंदिराचा कळस दिसला की ते-ते अभंग म्हटले जातात. भजनाच्या स्वरातही व्यापकता आहे. स्वर नसणाऱ्यालाही मोकळ्या मनानं गाता येतं. भजनामधूनच भावभक्तीची समाधी लागते. चांगला वारकरी भजनाशिवाय राहत नाही. तुम्हाला देव हवा, तर भाव ठेवून गा! परंतु, त्याला शुद्ध चित्त करण्याची अट आहे.

कर्तव्याची स्वच्छ दृष्टी

संतांचा सगळा व्यवहार हा समाजाला तोडून नाही. त्यांचे म्हणणे काय तर पारमार्थिक जीवन सुद्धा उन्नत झाले पाहिजे आणि भौतिक जीवनातही कर्तव्याची स्वच्छ दृष्टी प्राप्त झाली पाहिजे. त्या संदर्भाने संतांचे शेकडो उपदेश अभंगात दिसतात. प्रपंच आणि परमार्थही समानतेने चालवायच्या असतात. प्रपंच गचाळ करायचा, हे संतांना मान्य नाही. त्या त्या काळातील गोष्टींना संतांनी प्रतिसाद दिल्याचे आपल्याला दिसते. आपल्यालाही आपल्या समकालाचा अन्वयार्थ संत विचारातून लावता आला पाहिजे.

स्वराज्य लढ्याची प्रेरणा

तुकोबारायांच्या कीर्तनाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनात वैराग्य निर्माण झाले. ते स्वाभाविकच आहे. तुम्ही संत तुकाराम महाराज यांना वाचले आणि अस्वस्थ झाला नाही, असे होणार नाही. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना काय सांगितले, तर सर्वसामान्य प्रजेचे रक्षण करणे आणि जे प्रजेला त्रास देतात. त्यांचा नायनाट करणे म्हणजे खरी दया आहे.

दया तिचें नांव भूतांचें पाळण।

अणीक निर्दळण कंटकांचें॥१॥

धर्म नीतीचा हा ऐकावा वेव्हार।

निवडिले सार असार तें ॥धृ.॥

पाप त्याचें नांव न विचारितां नीत।

भलतें चि उन्मत्त करी सदा॥२॥

तुका म्हणे धर्म रक्षावया साठीं।

देवासही आटी जन्म घेणें ॥३॥

राजा, तू धर्माचे रक्षण केले नाही, तर देवाला त्यासाठी अवतार घ्यावा लागेल. असे अनेक प्रमाणं आहेत. जिथे तुकाराम महाराज यांनी व्यापक अर्थाने उपदेश केलेला दिसतो. स्वराज्याचा लढा पुढे नेण्याची तात्विक पायाभरणी संतानी केली असल्याचेच यातून सिद्ध होते. त्यामुळे संतांचे विचार आजही तारक आहेत आणि उद्याही तारक असतील, यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT