मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरयात्रेकरिता वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. २५ जुन ते ५ जुलै या दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी २७ जुन रोजी २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये एसटी महामंडळातील बसेसची संख्या घटली आहे.
परिणामी नादुरुस्त भंगार गाड्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. त्यामुळे एकूणच पंढरपूर आषाढी यात्रेसाठी जादा बस वाहतुकीचे नियोजन करताना एसटी प्रशासनाची कसरत करावी लागणार आहे.
पंढरपूर आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. यामध्ये एसटीच्या प्रवाशी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे. याकाळात एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रवाशांना वारकऱ्यांना दिल्या जाव्यात.
भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर पर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटी प्रशासनावर असते. त्यामुळे आषाढी यात्रेसाठी देण्यात येणारी प्रवासी सुविधा अधिक सुरक्षित व्हावी यासाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न सुरू आहे.
आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशातून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.यात्रेसाठी सुमारे ५००० गाड्या सोडण्याचे नियोजन एसटी तर्फे करण्यात आले आहे. औरंगाबाद प्रदेशातून १२००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १००० तर अमरावती येथून ७०० अशाप्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
चार तात्पूरर्ती बस स्थानके उभारणार
पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून बसेस सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत.
दरम्यान,यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय,संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.