Ashadhi Wari : sakal
महाराष्ट्र बातम्या

Ashadhi Wari : लाखो भाविकांच्या साक्षीने रंगले रिंगण ;माऊलींचा सोहळा माळशिरस मुक्कामी दाखल

टाळ-मृदंगाचा गगनभेदी गजर... वारकऱ्यांचा अखंड सुरू असलेला माऊली-माऊली नामाचा जयघोष... पालखीभोवती फडफडणाऱ्या भगव्या पताका... भाविकांची अलोट गर्दी... काळ्याभोर ढगांची दाटी...

विलास काटे

माळशिरस : टाळ-मृदंगाचा गगनभेदी गजर... वारकऱ्यांचा अखंड सुरू असलेला माऊली-माऊली नामाचा जयघोष... पालखीभोवती फडफडणाऱ्या भगव्या पताका... भाविकांची अलोट गर्दी... काळ्याभोर ढगांची दाटी... अशा वातावरणात माऊलींच्या अश्वाने एक फेरी मारून पुरंदवडे (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील गोल रिंगण झाले. उडीच्या खेळानंतर लाखो भाविक माळशिरस मुक्कामी विसावले. नातेपुते येथे पहाटे सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ यांच्या हस्ते महापूजा झाली. सकाळी सहा वाजता सोहळा मार्गस्थ झाला. सोहळ्यातील पहिले उभे गोल रिंगण असल्याने वारकऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह होता.

सकाळी साडेनऊच्या सुमारास माऊलींची पालखी मांडवी ओढ्याजवळ विसावली. परिसरात दिंड्यांनी भोजन केले. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता रथ माळशिरसच्या दिशेने मार्गस्थ झाला. ‘आम्ही दैवाचे दैवाचे दास विठुरायाचे’ असे अभिमानाने म्हणत वाटचाल सुरू होती. दुपारी तीनच्या सुमारास पुरंदवडेच्या माळरानावर रिंगणासाठी माऊलींचा रथ आला. दरम्यान, वारीसमवेत पुढे चालत आलेले तसेच परिसरातील रिंगण पाहण्यासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने रिंगण भरून गेले होते. अश्वासह दिंड्या रिंगणात येऊ लागल्या. त्यापाठोपाठ माऊलींची पालखीने बाहेरील रिंगणात प्रवेश केला. पताकाधारी आणि तुळशीवाल्यांना प्रवेश दिला. पालखी मधोमध उभारलेल्या मंडपात विराजमान केली.

मानकरी ऊर्जितसिंह शितोळे सरकार, मालक राजाभाऊ आरफळकर, सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ, प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, उद्धव चोपदार आदी रिंगणात होते. अर्जुनसिंह आणि वैष्णवीदेवी मोहिते-पाटील यांनी पालखीचे दर्शन घेतले. भोपळे दिंडीच्या मानकऱ्याने रिंगणाला तीन फेऱ्या पूर्ण केल्या. त्यानंतर स्वाराचा अश्व आणि माऊलींच्या अश्वाने दौड सुरू केली. काही क्षणात दोन्ही अश्वांनी वेगा दौड सुरू केली. धावताना स्वाराचा अश्व अडखळला तरीही अश्‍वांनी एक फेरी पूर्ण केली. दोन्ही अश्वांनी माऊलींचे दर्शन घेतले. रिंगण संपताच अश्वांच्या टापाखालची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. त्यानंतर वारकरी पावली, फुगड्या, खो-खो, मनोरे, हुतूतू आदी खेळ खेळले. तसेच, पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांची पाकिटे, दागिन्यांची चोरी होत असून चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे केली.

स्वाराचा अश्व पडला

गोल रिंगणात माऊलींच्या आणि स्वाराच्या अश्वांची दौड सुरू झाली. माऊलींच्या अश्वाच्या लगामात स्वाराच्या अश्वाचा मागील पाय अडकल्याने तो घसरून पडला. स्वार तुकाराम कोळीही पडले. मात्र, काही क्षणात दोन्ही अश्वांनी उर्वरित फेरी पूर्ण केली.

आज रिंगण अन् धावा

पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण शनिवारी (ता. १३) सकाळी खुडुस फाटा येथे होणार आहे. त्यानंतर वेळापूरजवळ धावा होणार आहे. तेथे पालखीसमोर वारकऱ्यांचे मानाचे भारूड होईल.

अंगावर अश्व पडल्याने छायाचित्रकाराचा मृत्यू

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पुरंदवडे येथील पहिल्या गोल रिंगणात स्वाराचा अश्व अंगावर पडल्याने बंगालमधील एका मुक्त छायाचित्रकाराचा मृत्यू झाला. कल्याण चट्टोपाध्याय (पश्चिम बंगाल) असे मृत्यू झालेल्या छायाचित्रकाराचे नाव आहे. या प्रकरणी अकलूज पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्यू अशी नोंद केली आहे. छायाचित्रकार चटोपाध्याय पश्चिम बंगालमधून छायाचित्र काढण्यासाठी गुरुवारी (ता. ११) आले होते. रिंगण सुरू असताना रिंगण आखलेल्या ठिकाणी ते कडेला बसले होते. रिंगण सुरू असताना माऊलींच्या अश्वाच्या लगामीत स्वाराच्या अश्वाचा पाय अडकला आणि स्वाराचा अश्व रिंगणाच्या कडेला बसलेल्या भाविकांच्या गर्दीत तोल जाऊन पडला. या वेळी चटोपाध्याय अश्वाच्या अंगाखाली आले. गंभीर जखमी झालेल्या चटोपाध्याय यांच्या तोंडातून रक्त आले. घटनास्थळी उपस्थित पोलिस आणि एनएसएसच्या स्वयंसेवकांनी त्यांना अकलूज येथे उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले. तेथील डाॅक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT