Ashadhi wari sakal
महाराष्ट्र बातम्या

Ashadhi Wari 2024 : पंढरपुरा नेईन गुढी !

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त, आळंदी देवस्थान

पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोकजीवनाचा संस्कार प्रवाह आहे. भक्तीची अनुभूती घेऊन सदाचारी जीवनाची वाटचाल घडविणारे ते नैतिकतेचे चालते बोलते विद्यापीठ आहे. पंढरपूरची वारी हा एक आनंद प्रवाह आहे. नैतिकता, सामाजिक समता, मानवता आणि शुद्ध भक्ती या विचार तत्त्वांचा आधार घेत विवेकबुद्धीने समृद्ध ध्येयाकडे झेपावत जाणारा हा लोकप्रवाह खरंच एक वेगळा आदर्श निर्माण करतो.

जगाच्या पाठीवर अशा खूप कमी जागा असतील जिथे एका तत्त्वाने, एका विचाराने आणि एका ध्येयाने कसलेही आमंत्रण, निमंत्रण न देता लोक गोळा होतात आणि सात्विकतेचे प्रतिनिधित्व प्रस्थापित करतात. त्यामध्ये वारी हे एक मोठे आणि महत्त्वाचे व्यासपीठ आहे, असे मला वाटते. दोन माणसे जरी एकत्र आली, तरी त्यांचे स्वभाव भिन्न असतात. त्यांच्या आवडी-निवडी वेगवेगळ्या असतात, त्यांचे आचार वेगवेगळे असतात.

या भिन्नतेमुळे त्यांच्यात ऐक्य प्रस्थापित होणे तसे दुरापास्तच असते, हे आपण अनुभवतो. मतभेद ठायी ठायी निर्माण होताना दिसतात. त्यातून कलह आणि मग वेगळेपण हे साहजिकच. पण, पंढरपूरच्या वारीमध्ये विविध प्रांतातून विविध सांस्कृतिक प्रवाहातून, विविध विचार पीठातून लाखो लोक एकत्र येतात आणि मूळ भगवत तत्त्वाशी कशी एकरूप होतात. हे एक मोठे कोडे आहे. नदी सागराला मिळते आणि सागररूप होते. तशीच ही विठ्ठलरूप भक्तीची गंगा पंढरपूरच्या विठ्ठलाशी एकरूप होते, ती पालखी दिंडीच्या स्वरुपात.

अंतिम ध्येयात जीवनाचे सार

मानवी जीवनातील अपूर्णता, दोषमयता, मनुष्याची सदाचाराकडे धावणारी स्वाभाविक प्रवृत्ती या व्यापक जनविश्वातील आपल्या थिटेपणाची जाणीव, विश्वाची विशालता आणि नियमबद्धता यांचा जिज्ञासू भूमिकेतून अर्थ शोधल्याशिवाय परमार्थाची वाट सापडत नाही. माउली म्हणतात,

पाठी महर्षि येणे आले।

साधकाचे सिद्ध झाले।

आत्मविद थोरावले।

येणेचि पंथे।।

याच मार्गावरून महर्षि आले, साधक सिद्धावस्थेत गेले. हा मार्ग स्वच्छ आहे, निर्मळ आहे. वारकऱ्यांसाठी हा वारीचाच मार्ग आहे. म्हणूनच वाटचालीत कितीही त्रास झाला, परिश्रम पडले तरी देखील अंतिम ध्येय हे सत्य आहे आणि तेच जीवनाचे खरे सार आहे. हे वारकरी जाणून असतो. त्यामुळेच तो त्याच्या शारीरिक असहजतेकडे दुर्लक्ष करून या आनंद प्रवाहात एकरूप होतो.

ज्ञानभक्ती समचरणावर विठाई

विठाईच्या दर्शनातच सर्व सुख मानणाऱ्या सकल संतांनी विठ्ठलाला माउली रुपात पाहिले आणि प्रेम-वात्सल्याची मूर्ती म्हणून विठ्ठलाला माउली रुपातच अनुभवले. ज्ञानभक्तीच्या समचरणावर उभी राहिलेली ही विठाई माउली आपल्या साऱ्या भक्तांना माहेरपण देत आहे. भक्तांच्याच प्रेमळ भक्तीला भारावून ही विठाई माउली साऱ्या संतांच्या भक्तिसुखाचे आगर होऊन बसली. म्हणूनच सकल संतांनी जीवनाच्या वास्तवाला सागर मानून विठ्ठलाच्या ठायी माहेर अनुभवावे हे स्वाभाविक आहे. त्यांनी विठ्ठल आणि पंढरपूरच्या ठायी आपले भावनिक नाते जोडले आहे.

वारकऱ्यांची नाती पंढरपुरात

माझे माहेर पंढरी । आहे भीवरेच्या तीरी ।।

बाप आणि आई । माझी विठ्ठल रखुमाई ।।

भीवरेच्या तीरी, पंढरपुरी माझा माय-बाप वास्तव्य करतोय. पुंडलिकाच्या रुपात भाऊ तर चंद्रभागेच्या रुपात बहीण ही सारी जिवाभावाची नाती पंढरपुरात नांदतायत. म्हणून या प्रेमसुखाच्या माहेराला जाण्यासाठी प्रतिवर्षी संतांची मांदियाळी वैष्णवांसह निघते ती वारीच्या रुपात. वाटचालीतला आनंद साठवीत ती आनंदरुपी पंढरपुरी जाऊन पोचते. डोळे भरून विठ्ठलाला पाहते. जनता जनार्दनाच्या रुपात विठ्ठलाला अनुभवते आणि भक्तिभावाने सुखावते.

अद्वैताच्या चिंतनाचा अनुभव

होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ।।

काय करावी साधने । फळ अवघेचि येणे ।।

अभिमान नुरे । कोड अवघेचि पुरे ।।

तुका म्हणे डोळा । विठो बैसला सावळा ।।

अभिमान जावा, द्वैतभाव संपावा आणि केवळ भक्तिभाव उरावा हा अनुभव वारीत येतो. अद्वैताचे चिंतन तत्त्ववेत्ते करतात. पण, त्याचा अनुभव मात्र वारकरी घेतात. अद्वैताचा सामाजिक स्तरावर सामूहिक अनुभव घ्यायचा असेल, तर एकदा तरी वारी करावीच.

भक्तीच्या भक्कम अधिष्ठानाने बदल

भक्ती, नीती आणि कृती यांचा समन्वय साधून पुरुषार्थ प्रधान परमार्थ घडविणारी जीवन प्रणाली म्हणजे वारी होय, असे डॉ. रामचंद्र देखणे यांनी एके ठिकाणी म्हटले आहे. समाज व्यवस्थेवर आधारित पण भक्तीचे भक्कम अधिष्ठान प्राप्त झालेला हा प्रवाह अनेकांच्या जीवनात बदल घडवून आणत आहे. महर्षी याज्ञवल्‍क्य ऋषींनी म्हटल्याप्रमाणे स्वतः विषयीच्या प्रेमापासून आपली मुक्ती झाली की, त्यालाच संन्यास असे म्हणतात. वारकरी जेव्हा विठ्ठलाला भेटण्यासाठी शरीर सुखाचा त्याग करतो, म्हणजेच स्वतः विषयीच्या प्रेमाचा त्याग करतो आणि संन्यस्त वृत्ती धारण करतो तो कृतीतून संन्यास काय असतो? याची जगाला शिकवण देत असतो. सर्वस्वाचा त्याग करणे हे श्रेष्ठ संन्यस्त जीवन पण, स्वारस्याचा त्याग करणे हे त्यापेक्षाही अवघड असते. आणि हे वारकरी करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT