Maharashtra Politics Explained Marathi News : जवळपास ३८ वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी पंजाची साथ सोडली आहे. १२ फेब्रुवारीला काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. १३ फेब्रुवारीच्या दुपारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत अशोक चव्हाणांनी भाजपात पक्षप्रवेश केला. त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे अमर राजापूरकर यांनीही भाजपात पक्षप्रवेश केला.
पण अशोक चव्हाणांचा पक्षप्रवेश होत असताना महाविकास आघाडीतही घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस प्रभारी रमेश चैन्नीथला यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. याशिवाय चैन्नीथला यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांचं शिष्टमंडळ शरद पवारांनाही जाऊन भेटलं. पण या सगळ्यात चव्हाणांचा भाजपप्रवेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना महागात पडू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. बाळासाहेब थोरातांना मात्र पुन्हा जबाबदारी मिळणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे पटोलेंचा गेम होऊन थोरातांचं प्रमोशन होणार असल्याचं दिसतंय. त्यासंदर्भात ३ मुद्द्यांमध्ये समजून घेऊयात...
खरंतर दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद, काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद राखलेल्या अशोक चव्हाणांनी पक्ष सोडल्यानं काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. मराठवाड्यात काँग्रेसला मोठा फटका बसेल अशी चर्चा आहे. तर तिकडे काँग्रेसकडून मात्र हालचालींना वेग आला आहे. अशातच चव्हाणांनी पक्ष सोडला पण गेम पटोलेंचा होणार? असं बोललं जातंय. असं का हेच आपण समजून घेणार आहोत.
१. पटोलेंच्या भूमिकेवर शंका अन् काँग्रेस नेत्यांची नाराजी
नाना पटोले हे काँग्रेसमध्ये राहून भाजपचे काम करतात का? काँग्रेसचे अनेक स्ट्राँग कार्यकर्ते जसे की, सचिन सावंत, विश्वजीत तांबेंना साईडलाईन करून टाकलं. त्यामुळे काँग्रेसमधील अनेक लोक अस्वस्थ आहेत. त्यामुळे भाजपने हा गेम केलाय का? अशी शंका येते. असं म्हटलंय. दुसरीकडे पटोलेंना चव्हाणांच्या पक्षप्रवेशाविषयी विचारलं असता त्यांनी 'आम्हीच त्यांना तिथे पाठवलं' असं गंमतीशीर उत्तर दिलं.
याशिवाय दमानियांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या ट्विटचाही उल्लेख केला आहे. ज्यात त्यांनी २५ पंजे पोस्ट केलेत. त्यामुळे काँग्रेसचे जवळपास २५ आमदार भाजपात जाण्याची शक्यता आहे, असं त्यांना म्हणायचं असेल असंही दमानियांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय.
त्यामुळे पटोलेंच्या नेतृत्वावर अन् भूमिकेवरच अंजली दमानियांनी सवाल उपस्थित केलेत. कारण, भाजपला नेमकं करायचं काय? लोकसभा जिंकायची आहे की फडणवीसांना खाली आणायचे? की विरोधी पक्ष संपवायचा? असं म्हणत दमानियांनी पटोलेंसोबत फडणवीसांवरही निशाणा साधला.
२. संजय निरुपमांचा स्वकीयांनाच घरचा आहेर
खरंतर अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यानंतर अनेकांची नावं समोर आली. पण त्यातील विश्वजीत कदम, अस्लम शेख, यशोमती ठाकूर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. दुसरीकडे काँग्रेस नेते संजय निरुपमांनी मात्र अशोक चव्हाणांच्या भूमिकेची पाठराखण करत स्वकीयांनाच घरचा आहेर देणारी पोस्ट टाकली. यावेळी आपल्या पोस्टमध्ये संजय निरुपम म्हणालेत,
अशोक चव्हाण खऱ्या अर्थानं पक्षासाठी एसेट होते. कुणी त्यांच्यावरील दायित्वामुळे गेल्याचं म्हणतंय, कुणी ईडीला जबाबदार धरतंय. या सगळ्या घाईगडबडीत दिल्या गेलेल्या प्रतिक्रिया आहेत. खऱ्या अर्थानं ते महाराष्ट्रातील एका नेत्याच्या कार्यशैलीला वैतागले होते. याविषयी त्यांनी वरिष्ठांना वेळोवेळी सूचितही केलं होतं. जर त्यांच्या तक्रारींना वेळीच गांभीर्यतेनं घेतलं गेलं असतं तर ही वेळच आली नसती. अशोक चव्हाण साधनसंपन्न, कुशल संघटक, तळागाळातल्या कार्यकर्त्याशी पक्की पकड असेलेल आणि एक गंभीर नेते आहेत. गेल्या वर्षी जेव्हा भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये ५ दिवसांसाठी होती, त्यावेळी संपूर्ण नेतृत्वानं त्यांची क्षमता प्रत्यक्षात पाहिली होती. त्यांनी काँग्रेस सोडल्याने आमचं मोठं नुकसान झाले आहे. त्याची भरपाई कोणीही करू शकणार नाही. त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी आमचीच होती.
अशी पोस्ट टाकून संजय निरुपमांनी एकप्रकारे नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख पटोलेंकडे असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली. आणि त्यामुळेच पटोलेंविरुद्धचा काँग्रेस पक्षातला रोष वाढताना दिसतोय.
३. पटोलेंची उचलबांगडी?, थोरातांना जबाबदारी?
एकीकडे भाजपातून काँग्रेसमध्ये आलेल्या नाना पटोलेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष केल्यानं आधीच नाराजवीरांचा एक गट होता. पण अशोक चव्हाणांनी थेट काँग्रेस पक्ष सोडल्यानं पटोलेंना मात्र हे प्रकरण जड जाणार असल्याचं बोललं जातंय. कारण काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि के. सी. वेणूगोपाल यांनी थेट थोरातांना फोन करुन पक्षाचं डॅमेज कंट्रोल रोखण्याचं आणि संघटनेच्या पुनर्बांधणीकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्याचं कळतंय. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांना राज्यसभा निवडणुका आणि सध्याची पक्षसंघटना बांधण्याची जबाबदारी मिळणार असल्याचंही कळतंय.
दुसरीकडे पटोलेंविरुद्ध वाढलेल्या नाराजीवरही आता दिल्ली हायकमांडकडून सारवासारवीचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे आता पटोलेंचं प्रदेशाध्यक्षपद जाणार की राहणार याबद्दल अजून तरी स्पष्टता नाही. पण काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरातांची जबाबदारी वाढवलेली दिसतेय. त्यामुळे आता चव्हाणांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेस नेतृत्व आणि राज्यातले नेतेही खडबडून जागे झालेले दिसताहेत. आणि येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल पाहायला मिळू शकतात अशी चर्चा सुरु झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.