Hindkesari Bavarya Bailgada sharyat Sakal
महाराष्ट्र बातम्या

हिंदकेसरी 'बावऱ्या'! बैलगाडा शर्यतीतील एक पर्व

बावऱ्यानंतर अनेक बैल आले, हिंदकेसरी झाले. पण बावऱ्या तो बावऱ्याच!

सुरज सकुंडे

बावऱ्या जिथं जिथं गेला, तिथून परतला मानाची ढाल जिंकूनच! त्याचा जन्मच जिंकण्यासाठी झाला होता.

1997 चं वर्ष...पुसेगावमध्ये बैलगाड्यांचा हिंदकेसरी अड्डा भरला होता. फायनल आता सुरुच होणार होती. बैलगाडीप्रेमींनी मैदान खचाखच भरलं होतं. बैलगाड्या पळण्यासाठी तयार होत्या. जॅकी सज्ज होते. सर्वांच्या नजरा बैलगाडींवर रोखल्या होत्या. कोण जिंकणार शर्यत? कोण होणार हिंदकेसरी? हाच सवाल सर्वांच्या मनात होता. उत्सुकतेपोटी बैलगाडाप्रेमी चाकोरीमध्ये झुकून बघत होते. पण आयोजक पोरं ढेकळं मारून मागे त्यांना सारत होती. सर्वांच लक्ष आता झेंड्याकडें होते. सर्व परिसर स्तब्ध झाला होता.

आणि.. आणि झेंडा पडला, धुरळा उडू लागला. चाकोरीमध्ये मातब्बर बैल वाऱ्याच्या वेगाने पळू लागले. जॅकी हातातल्या काठ्यांनी खोंडांवर लाठ्यांचे प्रहार करत होते. बैल सर्व ताकदीनिशी पळू लागले. सगळेच बैल तगडे...कधी ही गाडी पुढे जातीये, कधी ती... तर कधी सर्व गाड्या सोबतच येत होत्या..... “कोण पुढे जाणार? कोण जिंकणार? याचाच विचार सर्वजण करत होते. कोणी म्हणे हा बैल जिंकणार, कोणी म्हणे तो जिंकणार... अर्धे अंतर पार झालं, पण काहीच निश्चित होत नव्हतं....आणि अचानक या मातब्बर बैलांच्या गर्दीत एका लहानशा खोंडांचं तोंड सर्वात पुढे दिसू लागले. जीव लावून ते पळत होतं. (Bailgada Sharyat Hindkesari Bavarya Bull Bullock cart race)

''अरे! हा कुठला खोंड? हा पुढे कसां? सारेच आश्चर्यचकीत झाले होते. लोकांचा उत्साह वाढत होता. खोंड अंतर काटत होता. प्रत्येक सेकंदागणिक त्याची गाडी इतर गाड्यांच्या पुढे सरकत होती. लोक आता स्तब्ध झाले. सारेच जण आ वासून त्या छोट्या खोंडाकडे पाहत होते.

"वाह! क्या बात है! जबरदस्त!" लोकांच्या तोंडून शब्द बाहेर पडत होते. आता सर्वांच्या नजरा फक्त आणि फक्त त्या वासरावर स्थिरावल्या होत्या. काही लोकांना तर अजूनही काय चाललंय कळत नव्हते. नक्की काय होतंय हे समजेपर्यंत त्या इवलाशा खोंडानं मातब्बर बैलाने बरंच मागे सोडलं होते आणि कासऱ्याच्या फरकाने अंतिमरेषा पार केली होती.

कोण आहे हा खोंड?...सगळ्यांनाच आता या वासराचं नाव जाणून घ्यायचं होतं. लोकांची उत्सुकता शिगेला पोचली होती. तेवढ्यात अनाऊंसरने माईक हातात घेतला आणि जाहीर केलं.... "आजच्या हिंदकेसरी मैदानाचा मानकरी आहे, बावऱ्या..."

बावऱ्या आणि हौशानं ही बैलगाडी शर्यत जिंकली होती. ही शर्यत काही साधीसुदी नव्हती, बैलगाडा शर्यतीच्या इतिहासातील सर्वोत्तम शर्यतीपैकी एक होती, कारण याच शर्यतीनंतर बैलगाडा शर्यतीत एक नवं पर्व सुरु झाले होतं, हे पर्व होतं 'हिंदकेसरी बावऱ्या पर्व...'

येथे झाला बावऱ्याचा जन्म :

दुधनवाडीतील धनाजी जाधव कुटूंबीयांचा नाव या बावऱ्यांने खऱ्या अर्थांन राज्यभर पोहोचवलं. पुसेगाव, अकलूज, लिंबूत, कोरेगाव...महाराष्ट्रातील असं एकही उरलं नव्हते जिथं हिंदकेसरी बावऱ्याने विजय मिळवला नाही. सोबतचा बैल कोणताही असो बावऱ्या जिथं जिथं गेला तिथं चॅम्पियनच झाला. केवळ एक वर्षाच्या काळात 100 पेक्षा जास्त मोठ्या शर्यती जिंकल्याचा मान बावऱ्यानं पटकावला. बावऱ्याच्या याच पराक्रमाने बावऱ्यानं त्याचं आणि त्याच्या मालकाचं नाव महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यतीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं. म्हणूनच बावऱ्याचा फोटो कायम त्याच्या मालकांच्या खिशात असतो.

म्हणून नाव ठेवलं 'बावऱ्या'-

विशेष म्हणजे बैलगाडी शर्यतीत पळणारे बैल तापट असतात, परंतु बावऱ्या मात्र दावणीवर खूप शांत असे. लहान पोरांना कधीच शिंग हालवत नसे. परंतु लहान असताना बावऱ्या कायम बावरलेला असायचा. त्यामुळेच त्याचं नाव ‘बावऱ्या’ असं ठेवलं. घरच्याच गायीच्या पोटी जन्मलेला बावऱ्या पुढे जाऊन असे काही करेल, याची कल्पना त्याच्या मालकांनाही नव्हती. कोणताही विशेष खुराक नाही. शर्यतीत पळायचं प्रॅक्टीस नाही. अशा परिस्थितीत बावऱ्या रेसला उतरला होता.

बावऱ्याची पहिलीच शर्यत बैलगाडीप्रेमींसाठी यादगार-

साताऱ्यातील कुमठे येथील बैलगाडी शर्यतीत बावऱ्या पहिल्यांदाच पळाला. या रेसमध्ये त्याच्या सोबतीला त्याचा मोठा भाऊ 'हौशा' होता. दोघे बैल छकड्याला जुंपले. परंतु शर्यत सुरु होताच हौशाचं जोखड सुटलं. पहिल्याच शर्यतीत संपूर्ण गाडीचा भार एकट्या बावऱ्यावर आला. परंतु बावऱ्या थांबला नाही. तो पळत होता. विशेष म्हणजे त्याचा भाऊ हौशापण जू सुटलेलं असतानाही सोबत पळत होता. अशा परिस्थितीत या छोट्याशा वासरानं शर्यत पूर्ण केली. ही निशाणी होती भविष्यातील एका पर्वाची...या शर्यत पाहणाऱ्या शर्यतप्रेमींनी तेव्हाचं भाकीत केलं की, हा खोंड मैदान गाजवणार.....

तो आला, तो पळाला, त्यानं जिंकून घेतलं सारं-

1997, 1998 ही दोन वर्ष बावऱ्यानं गाजवली. बावऱ्या जिथं जिथं गेला, तिथून परतला ते मानाची ढाल जिंकूनच...त्याचा जन्मच जिंकण्यासाठी झाला होता. घरच्या खिलार गाईच्या पोटी जन्मलेला बावऱ्या तसा साधा खिलार बैल. खायलाही वैरणीशिवाय काही नाही. अधूनमधून कधीतरी मका, नाहीतर ऊसाचं वाडं...असा हा खोंड पुढे जाऊन असं काही करेल याची कुणाला कल्पनापण नव्हती. पंरतु तो जिथे जिथे गेला तिथे जिंकूनच आला. मैदान कोणतेही असो, सोबतीचा बैल कुठलाही असो, बावऱ्याने जिंकणं कधीच सोडलं नाही. किन्हई पासून सुरु झालेलं त्याचा एक नंबर कधी सुटलाच नाही. त्यानंतर फलटण , तांदळवाडी, मंगळूर चिंचणी, अकलूज तसेच राज्याबाहेरचीही काही मैदाने बावऱ्यानं मारली. विशेष म्हणजे भाऊ हौशाबरोबर पळताना त्यानं कधीच एक पाऊल पुढे न टाकणारा बावऱ्या दुसरा बैल जोडीला आल्यावर मात्र एक पाऊलही त्याच्यापुढे टाकू देत नसे. बावऱ्याच्या सोबत पळणारे बैलही तितक्याच ताकदीचे आहेत. सुरुवातीला वाईचा बैल नखऱ्या, आनंदा पैलवान यांचा बैल रेठरे असे मातब्बर बैल बावऱ्यासोबत पळत असत. शांत पळणे, कधीही चाकोरी न सोडणे हे बावऱ्याचे विशेष गुण होते. आपल्या मालकाला तसेच सोबतच्या बैलाला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी तो घेत असे. गाडीला जुंपताना आणि सोडताना तो कधीच त्रास देत नसे. म्हणूनच बावऱ्या इतर बैलांपेक्षा वेगळा ठरतो.

काळानं घात केला-

1998 ची ती फायनल बैलगाडा प्रेमी कधीच विसरु शकत नाहीत. कारण हाच दिवस बावऱ्याच्या आयुष्यात काळ बनून आला. तडसर वांगी येथे बैलगाडीचं हिंदकेसरी मैदान भरलं होतं. सेमीफायनलमध्ये गाडीला जुंपताना बावऱ्या लालसर लघवी करत असल्याचं बावऱ्याच्या मालकांच्या लक्षात आलं. हे मैदानही बावऱ्यानं मारलं. परंतु बावऱ्याची तब्बेत बरी नसल्याचे मालकाच्या लक्षात आलं. शर्यत झाल्यानंतर त्याला जास्त प्रवास नको म्हणून त्याला व्यापूर येथील ठेवलं गेलं. तिथंच त्याच्यावर उपचार केले गेले. प्रकृतीत सुधारणा झाल्याचं दिसल्यानंतर व्यापूर येथील बैलाबरोबर पुढच्या शर्यतीसाठी बावऱ्या सज्ज झाला. नेहमीप्रमाणे बावऱ्यानं है मैदानही मारलं, परंतु अंतिम रेषा पार करताच बावऱ्या अचानक खाली बसला. तो उठलाच नाही. बावऱ्याचे मालक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉक्टरांकडून उपचार केले. तांत्रिक, मांत्रिक सारं केलं तरी फरक पडेना. शेवटी बावऱ्याला त्यांनी आपल्या घरी आणले. घरी आणताच ज्या ठिकाणी त्याला ज्या ठिकाणी बांधलं जायचं, त्या ठिकाणी त्याला नेलं आणि थोड्याच वेळात बावऱ्याने आपला देह ठेवला. ज्या ठिकाणी जन्म झाला, ज्याठिकाणी तो वाढला, त्याच ठिकाणी त्यानं जीव सोडला.

बावऱ्याबरोबरच बैलगाडा शर्यतीतील एक पर्व संपले होते. बावऱ्यानंतर अनेक बैल आले, हिंदकेसरी झाले. पण बावऱ्या तो बावऱ्याची त्याची सर कुणालाच नाही. म्हणूनच त्याच्या अंत्यविधीसाठी राज्यभरातील विविध ठिकाणांहून बैलगाडाप्रेमी आले होते. बावऱ्याचे मालक आणि कुटूंबीय, तसेच कुस्तीप्रेमींच्या डोळ्यांतील पाणी थांबता थांबत नव्हते. त्याला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला गेला. अनेक स्थानिक वर्तमानपत्रात बावऱ्याच्या निधनाची बातमी पहिल्या पानावर छापून आली होती. बावऱ्याबरोबरच बैलगाडा शर्यतीतील एक पर्व संपले होते. बावऱ्यानंतर अनेक बैल आले, हिंदकेसरी झाले. पण बावऱ्या तो बावऱ्याच! त्याची सर कुणालाच नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT