नाशिक : महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर अनेक बंडखोर आमदारांनी उद्धव ठाकरे यांना का सोडलं याचं कारण देताना राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांचं (NCP Chhagan Bhujbal) नाव घेतलं आहे. छगन भुजबळांमुळे बाळासाहेबांना अटक झाली आणि तुम्ही त्यांच्याबरोबर जाऊन कसे बसता? बंडखोरांच्या या आरोपावर भुजबळांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे.
(NCP Chhagan Bhujbal on Shivsena MLA's)
दरम्यान बंडखोरांच्या आरोपावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, १९९९ साली काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार सत्तेत आलं त्याच्याआधी आम्ही शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत जनतेला शब्द दिला होता की, १९९२-९३ सालच्या दंगलीत श्रीकृष्ण आयोगाने ज्यांना आरोपी म्हणून जाहीर केले आहे त्यांच्यावर आम्ही खटले चालवू. त्यानंतर सरकार स्थापन झालं आणि मी गृहमंत्री, उपमुख्यमंत्री झालो आणि ही फाईल माझ्याकडे आली. या फाईलीतील माहितीत बाळासाहेबांना अटक केली पाहिजे असं कायद्यानुसार सांगण्यात आलं आणि मी त्या फाईलीवर सही केली.
मग बाळासाहेबांना अटक होण्याच्या चर्चा होऊ लागल्या. त्यानंतर मी पोलिस आयुक्तांना सांगितलं की, बाळासाहेबांना कसलाही त्रास झाला नाही पाहिजे, त्यांना पोलिस कोठडी द्यायची नाही, त्यांना आपल्याला त्रास द्यायचा नाही असं मी तात्कालीन पोलिस आयुक्तांना सांगितलं होतं. त्यानंतर त्यांना अटक झाली आणि काही तासांतच जामीन झाला. यानंतर मी त्यांना कोर्टात नेलं आणि ते या प्रकरणातून सुटले अशी माहिती भुजबळ यांनी दिली आहे.
दरम्यान रमाबाई कांड प्रकरणात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली गेली आणि झालेल्या आंदोलनात ११ जणांचा गोळीबारात जीव गेला होता. त्यावेळी मी काँग्रेसचा विरोधीपक्षनेता होतो आणि या प्रकरणात मी आरोप केला की शिवसेना भाजप सरकार खुनी आहे. यानंतर माझ्यावर हल्ला झाला आणि सामना या वृत्तपत्रात माझ्याविरोधात हेडलाईन असलेली एक बातमी छापून आली होती. त्या बातमी वर मी बाळासाहेबांवर अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर हे प्रकरण २००७-०८ च्या दरम्यान कोर्टात गेलं त्यावेळी मी ही केस मागे घेतली होती आणि बाळासाहेब त्यातून सुटले. मग मला बाळासाहेबांनी चहासाठी घरी बोलावलं होतं. या प्रकरणानंतर त्यांचे आणि माझे अगदी चांगले संबंध राहिले होते. आमचे कौटुंबिक संबंध होते. आम्ही सहकुटुंब मातोश्रीवर त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो.
त्यानंतर आमचं पहिल्यासारखंच प्रेम राहिलं. आणि ज्यावेळी बाळासाहेब ज्यावेळी प्रचंड आजारी होते त्यावेळी फक्त तीन लोक त्यांना भेटायला गेले होते त्यामध्ये मी एक होतो असं आमचं प्रेम होतं. हेच मला या आरोप करणाऱ्या बंडखोर आमदारांना सांगायचं आहे.
असं सविस्तर प्रकरण सांगत त्यांनी बाळासाहेबांना भुजबळांमुळे अटक झाली असा आरोप करणाऱ्या बंडखोरांना त्यांच्यातील संबंध कसे होते हे सांगितलं आहे. तर जनतेला दिलेल्या शब्दामुळे आमच्या सरकारला ही फाईल काढावी लागली आणि त्यातून बाळासाहेबांना अटक करण्यात आली आणि तेही काही तासांत त्यांना जामीन झाला, यामागे मला त्यांना अटक करण्याचा काही हेतू नव्हता असं त्यांनी सांगितलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.