बागलाण : नामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री केलेल्या कांदयाचे पैसे शेतकऱ्यांना रोखीने न मिळता त्यांच्या खात्यावर जमा होतात. मात्र याचा फायदा न होता उलट शेतकऱ्यांचा तोटाच होत आहे. बँक ऑफ बडोदा बँकने शेतकऱ्यांचा खात्यावर कांदा विक्रीचा आलेला पैसा संबधित शाखाधिका-यांनी परस्पर कर्ज खात्यात वर्ग करण्याचा सपाटा सुरू केला. बँकेच्या या जुलमी प्रकारामुळे शेतकऱ्यांना विक्री केलेल्या कांद्याचा पैसा मिळत नसल्याने शेती कशी करावी व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवायचा याचे मोठे संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे.
बँक ऑफ बडोदाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
बागलाण तालुक्यातील काकडगाव येथील शेतकरी विजय अहिरे यांनी काही दिवसांपूर्वी कांदा विक्री केला होता सदर कांद्याचे पैसे कांदा व्यापाऱ्यांनी नामपुर येथील बँक ऑफ बडोदा शाखेत अहिरे यांच्या खात्यावर २४ हजार रूपये वर्ग केले होते. बुधवार (ता.१६) रोजी पैसे काढण्यासाठी विजय अहिरे गेले असता बँक मॅनेजरने कांद्याचे पैसे कर्जदार महादू अहिरे यांच्या खात्यात वर्ग केल्याचे सांगितले. अहिरे यांनी मॅनेजरला विनवण्या केल्या की शेतमजुरांचे पैसे वाटप करायचे आहेत. मजूर दाराशी उभे असून मला पैशांची नितांत गरज आहे. पण मॅनेजरने काही ना ऐकता पैसे कर्जात जमा केल्याचे सांगून शेतकऱ्यास बँकेतून हुसकावुन लावले.
शेकडो शेतकऱ्यासह बँकेत ठिय्या आंदोलन
या शेतकऱ्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ. दिकपाल गिरासे यांना सदर बाब सांगितली असता गिरासे यांनी शेकडो शेतकऱ्यासह बँकेत ठिय्या आंदोलन करत बडोदा बँक मॅनेजरला धारेवर धरले. शेतकऱ्यांचा आक्रोश बघता बँक मॅनेजरने शेवटी संबंधित शेतकऱ्याचे २४ हजार रुपये परत केल्याची नामुष्की झाली. यामुळे शेतक-यांनी आंदोलन मागे घेतले. शेतकऱ्यांचा विक्री केलेल्या शेतमालाचे पैसे बँकने परस्पर कर्ज खात्यात वर्ग करण्याचा सपाटा सुरू केल्याने शेतक-यांना पुन्हा आत्महत्येस प्रवृत्त होईल असे मत दिकपाल गिरासे यांनी व्यक्त केले. शासनाने बँकेला शेतमालाचे पैसे कुठल्याही कर्ज खात्यात वर्ग करू नये असा आदेश द्यावा अशी यावेळी शेतकऱ्यांनी मागणी केली.
प्रतिक्रिया
मी शेतकरी सन्मान योजनेत पात्र शेतकरी आहे. विजय अहिरे माझ्या कर्जास जामीन असून त्यांच्या खात्यातून परस्पर पैसे माझ्या कर्ज खात्यात वर्ग केल्याने बँकेने जुलमीपणा बंद करावा. सरकार शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना कर्जमाफी सोंग करत असून बँकेला हाताशी धरून शेतकऱ्यांचे अशाप्रकारे कर्ज वसुली होत आहे.- महादु अहिरे, शेतकरी काकडगाव
महादू अहिरे या शेतकऱ्याने मध्य मुदतीचे पीक कर्ज घेतले आहे. विजय अहिरे व कर्जदार महादू अहिरे यांचा एकत्रित सातबारा असल्याने विजय अहिरे यांच्या खात्यावर आलेले कांद्याचे पैसे बँकेच्या कॉम्प्युटर सिस्टीमकडून ऑटोमॅटिक कर्ज खात्यात वर्ग झालेत. - तुषार सोनवणे, शाखाधिकारी बैंक ऑफ़ बडोदा नामपुर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.