सोलापूर : कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपर्यंत असलेल्या सर्वच मुलींना उच्चशिक्षण यावर्षीपासून मोफत मिळणार आहे. त्याचबरोबर एकूण प्रवेश क्षमतेच्या पाच टक्के गुणवत्ताधारक मुलांनाही ‘शिक्षण शुल्क माफी योजने’तून (टीएफडब्ल्यूएस) अभियांत्रिकीचे शिक्षण मोफत मिळणार आहे. पण, त्यासाठी त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज व महाविद्यालये आणि तेथील ब्रॅंचेसची निवड अचूक करावी लागणार आहे.
अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेला सध्या सुरुवात झाली असून २८ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. २९ जुलैपर्यंत भरलेल्या अर्ज व कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. ऑफलाइन व ऑनलाइन अशा दोन प्रकारे कागदपत्रांची पडताळणी होते. त्यानंतर ३१ जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. १ ते ३ ऑगस्टपर्यंत ऑप्शन भरता येतील आणि त्यानंतर ६ ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर प्रवेशाचे तीन राऊंड होतील. सोलापूर जिल्ह्यातील १४ अभियांत्रिकी महाविद्यालयांची जवळपास साडेपाच हजार प्रवेश क्षमता आहे.
विद्यार्थ्यांनी प्रवेशावेळी घ्यावी खबरदारी
राज्य शासनाच्या निर्णयानुसार आता आठ लाखांपर्यंत कुटुंबाचे उत्पन्न असलेल्या सर्वच मुलींना अभियांत्रिकीचे शिक्षण मोफत मिळणार आहे. दुसरीकडे ‘टीएफडब्ल्यूएस’अंतर्गत प्रवेश क्षमतेच्या ५ टक्के गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनाही मोफत शिक्षण घेता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना तो पर्याय निवडावा लागेल. प्रवेश प्रक्रियेच्या फेऱ्या सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑप्शन फॉर्मनुसार पसंतीचे कॉलेज किंवा ब्रॅंच मिळाल्यास ती सीट स्वीकारून तो विद्यार्थी प्रवेश निश्चित करू शकतो किंवा पुढील फेरीसाठी जाऊ शकतो.
- डॉ. शंकर नवले, प्राचार्य, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव, सोलापूर
विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवाव्यात ‘या’ बाबी
अभियांत्रिकी प्रवेशाची तात्पुरती मेरिट यादी जाहीर झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एक ते ३०० ऑप्शन भरण्याची मुभा असते. पहिल्या क्रमांकाचे ऑप्शन मिळाल्यास त्या विद्यार्थ्याला त्याच ठिकाणी प्रवेश घेणे क्रमप्राप्त असते. तो पुढील टप्प्यासाठी जाऊ शकत नाही.
तात्पुरती मेरिट लिस्ट जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांनी अर्जातील त्रुटींची पूर्तता करावी. आपल्या जात प्रवर्गासाठी किती जागा आहेत, त्यासाठी कितीजण इच्छुक आहेत, आपला नंबर त्या महाविद्यालयात किंवा ब्रॅंचला लागू शकतो का, याचा अंदाज घेऊनच ऑप्शन भरणे आवश्यक आहे.
प्रवेशाच्या कोणत्याही राउंडमध्ये विद्यार्थ्यास पहिल्या क्रमांकाचे ऑप्शन मिळाल्यास त्याचा प्रवेश तेव्हाच निश्चित होतो. त्यावेळी त्याने ती जागा स्वीकारून प्रवेश निश्चित करणे तथा अर्ज फ्रिज करणे बंधनकारक आहे, अन्यथा तो विद्यार्थी संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतून आपोआप बाहेर पडू शकतो.
विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑप्शननुसार पाहिजे ते कॉलेज किंवा ब्रॅंच मिळाल्यावर ती सीट ॲक्सेप्ट करावी. एखाद्या विद्यार्थ्याला वाटले, आपल्याला दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश हवाय, तो निश्चित केलेले चार्जेस भरून पुढील टप्प्यात (बेटरमेंट) प्रयत्न करू शकतो. शेवटी त्याला जरी ते कॉलेज नाही मिळाले तरी जी सीट त्याने ॲक्सेप्ट केलीय त्याठिकाणी त्याला प्रवेश घेता येतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.