भाजपच्या साडेतीन नेत्यांना लवकरच जेलची हवा खावी लागणार आहे, असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला होता.
सातारा : साताऱ्याचे दोन्ही राजे (Udayanraje Bhosale-Shivendraraje Bhosale) आमचेच आहेत. त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत (Satara Municipal Election) ते आमनेसामने असतीलच, असे नाही. त्याबाबत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) निर्णय घेतील, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. सातारा शहराची हद्दवाढ होऊनही अद्यापपर्यंत राज्य सरकारने एका दमडीचाही निधी दिलेला नाही, तसेच अवकाळीने उद्ध्वस्त शेतकऱ्यांनाही मदत दिलेली नाही, याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा येणाऱ्या अधिवेशनात पर्दाफाश करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) धनदांडगे, वाइन उद्योग, बारवाल्यांसाठी काम करत आहे. एका बाजूला मंदिरे, शाळा बंद, तर दुसरीकडे मॉलमध्ये वाइन विक्री हे सरकार करत आहे. त्याचा शेतकऱ्यांना काहीही फायदा नसून शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन हा उद्योग सुरू आहे, अशी टीका करून श्री. दरेकर म्हणाले, ‘‘साखर कारखानदारीस राज्य सरकारकडून कोणतेही पॅकेज मिळालेले नाही, ही दुर्दैवी बाब असून, केंद्रातील मोदी सरकारने साखर उद्योगांसाठी पाच हजार ३६१ कोटींचे पॅकेज दिले. इथेनॉल निर्मितीला प्राधान्य दिल्यामुळे १५ हजार कोटींचा महसूल मिळत आहे.’’ सातारा शहराच्या हद्दवाढीचा निर्णय सरकारने घेतला; पण अजून एक दमडीचाही निधी मिळालेला नाही. अवकाळीत उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांनाही मदत मिळालेली नाही. केवळ हजारो कोटीच्या घोषणा होत आहेत. त्याकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा येत्या अधिवेशनात याचा पर्दाफाश आम्ही करू, असा इशारा श्री. दरेकर यांनी दिला.
साताऱ्याचे दोन्ही राजे भाजपमध्ये असूनही पालिकेच्या निवडणुकीत दोघे आमनेसामने आहेत, याविषयी विचारले असता प्रवीण दरेकर म्हणाले, ‘‘साताऱ्याचे दोन्ही राजे आमचेच आहेत. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीत ते आमनेसामने असतीलच, असे नाही. त्याबाबत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील.’’ एसटी विलीनीकरणाबाबत सरकारची भूमिका स्पष्ट नाही. समितीने अहवाल काय दिलाय हे समजत नाही. मुळात वाटाघाटी करून मार्ग काढता येतो; पण त्यांना हा विषय झुलवत ठेवायचा असून, हे सरकार बेफिकीर व गेंड्याच्या कातडीचे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
भाजपच्या साडेतीन नेत्यांना लवकरच जेलची हवा खावी लागणार आहे, असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला होता. याविषयी विचारले असता श्री. दरेकर म्हणाले, ‘‘राऊत हे नेहमीच गौप्यस्फोट करतात. ते साडेतीन नेते कोण ते त्यांनाच विचारा. कारण, त्यांचा गौप्यस्फोट फुसका बार निघणार आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.