मुंबई : शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील सत्तास्थापनेचा पेच कायम असताना आता भाजपनेही शिवसेनेशिवाय सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून आज (ता.7) भाजप नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे, हेच शिष्टमंडळ सत्तास्थापनेचा दावा करू शकते. शिवसेनेच्या वाघांचीही आज महत्त्वाची बैठक होणार असून, यामध्ये भाजपला पाठिंबा देण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आज राज्यात युतीनेच सरकार स्थापन करावे आघाडीला विरोधात बसण्याचा जनादेश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजपविरहित सरकार स्थापन होणार; हालचालींना वेग
शिवसेनेसोबत मागच्या दाराने चर्चा सुरू ठेवत भाजपने सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, मागील चौदा दिवसांपासून उभय पक्षांमध्ये सुरू असलेले चर्चेचे गुऱ्हाळ लवकरच थांबू शकते. सत्तास्थापनेच्या अनुषंगाने भाजपच्या कोअर समितीच्या बैठका सुरू असून मंगळवारी झालेल्या बैठकीतही शिवसेनेला चर्चेसाठी आवाहन करताना देवेंद्र फडणवीस हेच भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. आज झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेणार आहेत. या भेटीत हे दोन्ही नेते भाजपकडून सत्ता स्थापनेचे दावा करणारे निवेदन देणार आहेत. नेत्यांचे हे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेईपर्यंत भाजपकडून शिवसेनेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, शिवसेनेला सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी आग्रह केला जाणार आहे, असे भाजपकडून सांगण्यात येत आहे. शिवसेनेने सरकार स्थापन करण्यासाठी भाजपसोबत पुढाकार नाही घेतला, तर भाजप स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहे.
नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
आजच्या बैठकीत सरकार स्थापन करण्याबरोबर प्रदेशाध्यक्ष बदलावर चर्चा झाली. सध्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून शपथ घेतील. त्यामुळे प्रदेशाध्यक्षासह कार्यकारिणी बदलाबाबतदेखील या बैठकीत मंथन करण्यात आले आहे. 31 डिसेंबरपर्यंत नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड होऊ शकते. यानंतर माध्यमाशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, शिवसेनेसह महायुतीचे सरकार नक्कीच स्थापन होईल. राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने जनादेश दिला आहे.
शिवसेनेचे पालकमंत्री उपस्थित
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पालकमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेनेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, दीपक केसरकर, रामदास कदम आदी उपस्थित होते. यानंतर माध्यमांशी बोलताना रामदास कदम म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी या बैठकीला उपस्थित होतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून आम्ही आलो आहे.
शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम असून, आता ठरले तसेच होईल. नवीन प्रस्तावावर चर्चा होणार नाही. राज्यातील जनता आणि कॉंग्रेसलाही शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा, असे वाटते.
संजय राऊत, नेते, शिवसेना
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कोणत्याही स्थितीमध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ देणार नाही. राज्यात भाजपचे सरकार येऊ नये म्हणून शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी चर्चा करून मार्ग काढायला हवा. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे गरजेचे आहे.
हुसेन दलवाई, नेते, कॉंग्रेस
वाघ कुठलाही असो, कुणाचाही असो; त्याचे संवर्धन आणि संरक्षण होणारच. सत्तास्थापनेचा तिढा सुटून लवकरच सर्वांना आनंदाची बातमी मिळेल.
सुधीर मुनगंटीवर, नेते, भाजप
शिवसेनेसमोर आता पर्याय राहिलेला नसून त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करावे. मुख्यमंत्रिपदाचादेखील त्यांनी हट्ट सोडावा. शिवसेनेमुळे राज्यात सरकार स्थापन करण्यास विलंब होतो आहे.
रामदास आठवले, केंद्रीय मंत्री, रिपाइंचे अध्यक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.