सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडे देशमुखांचे सुपुत्र सलील देशमुख आणि सून रिद्धी देशमुख यांच्या अटकेचा वॉरंट असल्याची माहिती आहे.
नागपूर : शंभर कोटी वसुली प्रकरणी आरोप असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh Case) यांच्या घरी आज सीबीआयने छापेमारी (CBI Raid) केली आहे. सकाळी आठ वाजताच सीबीआयचे सात अधिकारी घरी पोहोचले असून देशमुखांचा मुलगा आणि सुनेला अटक होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप सीबीआयने कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
सीबीआयचे अधिकारी आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास अनिल देशमुखांच्या घरी पोहोचले. त्यांच्याकडे देशमुखांचे सुपुत्र सलील देशमुख आणि सून रिद्धी देशमुख यांच्या अटकेचा वॉरन्ट आहे. त्यामुळे देशमुखांच्या मुलाला आणि सूनेला अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पण, देशमुख कुटुंबीय कुठे आहे? याबाबत अद्याप कोणालाही माहिती नाही.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुखांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून केंद्रीय तपास यंत्रणा देशमुखांच्या मागे लागल्या आहेत. देशमुखांच्या घरी आतापर्यंत ईडीने सहावेळा, सीबीआयने तीनवेळा आणि आयकर विभागाने छापेमारी केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी देशमुखांच्या संबंधित साई शिक्षण संस्थेच्या खात्यात चार कोटी रुपये जमा झाल्याने ते आणखीनच अडचणीत आले आहेत. तसेच वारंवार नोटीस देऊन उपस्थित राहत नसल्याने देशमुख यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे. सुमारे महिनाभरापासून ते अज्ञात स्थळी आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या जात असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, न्यायालयाने देखील त्यांना समन्स जारी करून ईडीच्या चौकशीसाठी का हजर राहत नाही? याबाबत विचारणा केली होती. मात्र, अद्यापही अनिल देशमुख नेमके कुठे आहेत? याचा थांगपत्ता लागलेला नाही. आता सीबीआयचे अधिकारी थेट त्यांच्या मुलाला आणि सूनेला अटक करण्यासाठी पोहोचल्याची माहिती आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.