राज्यभरातील शाळांमध्ये पायाभूत सुविधांना बळ देण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाचा ५ डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
तसेच महापालिका क्षेत्रात विभाग व राज्यस्तर, तर उर्वरित महाराष्ट्रात तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर विजेती शाळा निवडण्यात येणार आहे. बालभवन येथे आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल उपस्थित होते.
राज्यातील शाळांत पायाभूत सोयी-सुविधा वाढविणे, शाळांमध्ये शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण तयार करणे, विद्यार्थ्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविणे, आरोग्य, पर्यावरण, कौशल्य विकास, आर्थिक साक्षरता या विषयांवर उपक्रम राबविण्यासाठी शाळांना प्रोत्साहित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
यासोबतच दत्तक शाळा योजना, महावाचन उत्सव- महाराष्ट्रातील वाचन चळवळ, माझी शाळा माझी परसबाग, स्वच्छता मॉनिटर टप्पा : २ या उपक्रमांचा शुभारंभही ५ डिसेंबरला राज्यस्तरीय कार्यक्रमात राज भवन येथे करण्यात येणार आहे, असे केसरकर यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल रमेश बैस असणार आहेत; तर उपक्रमांचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील. विशेष अतिथी म्हणून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री धनजंय मुंडे, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत.
माझी शाळा - माझी परसबाग उपक्रमाविषयी माहिती देताना मंत्री केसरकर म्हणाले, या उपक्रमातून शाळांत परसबाग तयार करण्यात येणार आहेत. शाळांमध्ये परसबाग असणे सक्तीचे करण्यात आले आहे, तर स्वच्छता मॉनिटर उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांत स्वच्छतेचा संस्कार रुजत आहे. स्वच्छतेसाठी विद्यार्थी आग्रही होत आहेत.
दोन कोटी मुलांपर्यंत पोहोचणार
मुंबई महापालिका आणि ‘अ’ व ‘ब’ वर्गाच्या महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा आणि उर्वरित महाराष्ट्रातील शाळा अशा स्तरांवर हे अभियान राबवण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रात विभाग व राज्यस्तर, तर उर्वरित महाराष्ट्रात तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर विजेती शाळा निवडण्यात येणार आहे. या अभियानातून दोन कोटी मुलांपर्यंत सुविधा पोहोचवण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी सर्व स्तरांवरील समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
दत्तक शाळा योजनेत उद्योग समूहाच्या सीएसआर निधीतून शाळांत पायाभूत सोयी-सुविधा अद्ययावत करण्यात येणार आहेत. या योजनेतून कुठल्याही प्रकारे शाळांचे खासगीकरण करण्यात येणार नाही. ‘महावाचन उत्सव - महाराष्ट्रातील वाचन चळवळ’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांत वाचन संस्कृती वाढविण्यात येणार आहे. उच्च शिक्षण विभागाच्या राज्यात असलेल्या विविध ग्रंथालयांना या उत्सवासाठी शाळांसोबत संलग्न करण्यात येणार आहे.
- दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.