Success Story 
महाराष्ट्र बातम्या

Success Story: जिद्द असावी तर अशी! मिळेल ते काम करून केला अभ्यास, अन् शेतकऱ्याची चार मुलं झाली पोलिस

सकाळ डिजिटल टीम

हिंगोली: ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे’ या उक्तीप्रमाणे जिद्द, चिकाटी आणि कोणत्याही परिस्थितीत परिश्रम करण्याची तयारी असेल तर कोणत्याही यशाला गवसणी घालता येते. याचीच प्रचिती एका शेतकऱ्याच्या चार मुलांनी दिली आहे. चौघेही पोलिस दलात असून एकापाठोपाठ दाखल झाले आहेत.

हिंगोली तालुक्यातील वऱ्हाडी येथील गरीब शेतकरी कुटुंबातील ही कथा आहे. वऱ्हाडी हे इसापूर धरणाने चोहो बाजूंनी वेढलेले शेवटचे टोक. अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात वसलेले जेमतेम शंभर सव्वाशे घरांचे हे छोटेसे गाव.

येथील मुख्य व्यवसाय शेती व मजुरी आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ हे शिक्षण, सरकारी नोकरीपासून काहीसे दूर आहेत. मात्र येथील अल्पभूधारक शेतकरी बळीराम ठोके यांनी घरची स्थिती बेताची असताना मोलमजुरी करीत घरप्रपंच चालवून आपल्या मुलांना शिक्षण दिले. चंद्रमुनी, राहुल, दिगंबर, लक्ष्मण अशी ही या मुलांची नावे.

घरची बेताची स्थिती असतानाही वडिलांनी कष्टाने आपल्याला शिकवल्याची जाण ठेवून चौघांनी पुढील वाटचाल केली. त्यांनीही कठोर परिश्रमाच्या बळावर एकापाठोपाठ पोलिस खात्यात भरती होण्याची देदीप्यमान कामगिरी करून दाखवली आहे.

परिस्थितीची जाणीव ठेवून जिद्दीला कष्टाची जोड दिल्यास कुठलीही गोष्ट साध्य करणे शक्य आहे, हेच ग्रामीण भागातील या चौघांनी दाखवून दिले आहे.

मिळेल ते काम करून केला अभ्यास

वऱ्हाडी या छोट्या गावातील चंद्रमुनी, राहुल, दिगंबर, लक्ष्मण ठोके या भावंडांनी प्रतिकूल परिस्थितीत हिंगोली येथील महात्मा ज्योतिबा फुले वसतिगृहात राहून शिक्षण घेतले. वेळप्रसंगी मिळेल ते काम करून कुठल्याही शिकवणीशिवाय परिस्थितीची जाणीव ठेवत अभ्यास केला.

यानंतर एकापाठोपाठ एक पोलिस खात्यात भरती होऊन यश मिळवत राहिले. यामध्ये लक्ष्मण व राहुल नवी मुंबई तर दिगंबर व चंद्रमुनी हे दोघे रत्नागिरीत कार्यरत आहेत.

शेती कमी असल्याने वेळप्रसंगी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रोजंदारीवर मजुरी करावी लागत असे. ही वेळ मुलांवर येवू नये यासाठी त्यांना शिक्षण द्यायचे व मोठे अधिकारी करायचे असे स्वप्न बाळगले. त्यानुसार पोटाला पिळ देत मुलांना शिकविले.

मुलांनीही तितक्याच जिद्दीने शिक्षण घेतले, शाळेतील सर्व कार्यक्रमांत सहभाग घेत त्यात यश मिळवत गेले. खेळातही चौघेही तरबेज होते. कुठलीही शिकवणी न घेता त्यांनी पोलिस भरतीची प्रक्रिया पूर्ण केली. मोठा मुलगा चंद्रमुनी यात यशस्वी झाल्यावर तशीच तयारी करीत अन्य तिघांनीही झेप घेतली. त्यांच्यासाठी केलेल्या कामाचे चीज झाले.

- बळिराम ठोके, अल्पभूधारक शेतकरी, वऱ्हाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: मुख्यमंत्र्यांच्या ‘एसआयटी’ला केराची टोपली, अहवालाकडे दुर्लक्ष करत ‘आरटीओ’ अधिकाऱ्याची बदली

खबरदार..! आता शिव्या द्याल तर, राज्यातील सहा विद्यापीठांत...

केजरीवालांचा सापळा

हे गणराया, भक्‍तांना बुद्धी दे !

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 सप्टेंबर 2024

SCROLL FOR NEXT