Due to the strike of fuel transporters, queues formed at petrol pumps in the city after Monday evening. esakal
महाराष्ट्र बातम्या

Truck Driver Strike Nashik : इंधनासाठी चारही दिशांना धावाधाव!

टँकर, ट्रकचालकांनी पुकारलेल्‍या संपामुळे शहरातील पेट्रोलपंपांना सोमवारी (ता. १) इंधनाचा पुरवठा होऊ शकला नाही.

सकाळ वृत्तसेवा

Truck Driver Strike Nashik : टँकर, ट्रकचालकांनी पुकारलेल्‍या संपामुळे शहरातील पेट्रोलपंपांना सोमवारी (ता. १) इंधनाचा पुरवठा होऊ शकला नाही. त्‍यातच संपाची माहिती कळाल्‍यानंतर वाहनचालकांनी इंधन भरण्यासाठी पंपांवर गर्दी केली होती.

यामुळे सायंकाळनंतर शहरात पंपांबाहेर वाहनांच्‍या लांबलचक रांगा लागल्‍या होत्‍या.(citizen Running in all directions for fuel due to strike of fuel transporters in nashik news)

नववर्षाच्‍या पहिल्‍याच दिवशी नाशिककरांना इंधनासाठी चारही दिशांना धावाधाव करायला लागली. दरम्‍यान, परिस्‍थिती सुरळीत करण्यासाठी प्रयत्‍न सुरू असून, लवकरच तोडगा काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्‍न सुरू असल्‍याचे जिल्‍हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले. केंद्र शासनाच्‍या प्रस्‍तावित अपघातविषयक कायद्यातील तरतुदींना विरोध दर्शविण्यासाठी टँकरचालकांसह ट्रान्स्पोर्ट व्‍यावसायिकांनी बंद पुकारला होता.

यामुळे सोमवारी मनमाडच्‍या पानेवाडी येथून इंधनाचे ट्रँकर निघू शकले नाहीत. उशिरापर्यंत संप मिटलेला नसताना दुसरीकडे इंधन पुरवठा विस्कळीत झाल्‍याची बातमी शहरभर पसरल्‍याने वाहनचालकांनी इंधन भरण्यासाठी पंपांकडे धाव घेतली होती. यामुळे सायंकाळपासून पेट्रोल पंपांबाहेर रांगा लागल्‍या होत्‍या.

दुपारपर्यंत साधारणतः दहा ते बारा पंपांवरील इंधन संपलेले असताना रात्री उशिरापर्यंत सुमारे पन्नास पंपांवरील पेट्रोल संपायला आले होते. शहरातील बहुतांश पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्‍याची स्‍थिती सायंकाळी उशिरा बघायला मिळत होती.

त्र्यंबक चौकात वाहतूक कोंडी

शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्‍या त्र्यंबक नाका सिग्‍नल चौक परिसरात चार पेट्रोलपंप आहेत. शहरातील वाहनचालकांनी येथे इंधन भरण्यासाठी धाव घेतल्‍याने पंपांबाहेर वाहनांच्‍या रांगा लागल्‍या होत्‍या. त्‍यातच चारचाकी वाहनांची रांग थेट सिग्‍नलवरील चौकापर्यंत पोहोचल्‍याने रस्‍त्‍याने जाणाऱ्या इतर वाहनांना अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी झाली होती.

गंगापूर रोडला गर्दी

गंगापूर रोडला आनंदव‍ली भागातही काही पेट्रोलपंप असून, या ठिकाणीही वाहनांची गर्दी झाली होती. मोठ्या रांगा पाहून अनेक चालक पुन्‍हा माघारी फिरत असल्‍याचेही चित्र बघायला मिळाले.

पेट्रोल संपल्‍याने झाले हाल

अनेक चाकरमान्‍यांचे दुचाकीचे पेट्रोल संपल्‍याने घरी परतण्यासाठी हाल झाल्‍याचे बघायला मिळाले. काहींनी मित्र, नातेवाइकांना बोलवत त्‍यांच्‍या वाहनातून पेट्रोल घेताना सध्याची वेळ धकविली.

इंधन न मिळल्‍यास पंप पडतील ‘ड्राय’

शहरात सुमारे ११० पेट्रोलपंप असून, यापैकी बहुतांश पंपांवरील इंधन सोमवारी संपुष्टात येण्याच्‍या मार्गावर होते. त्यातच मंगळवारी (ता.२) संप मिटला नाही, तर बहुतांश पेट्रोलपंप ‘ड्राय’ पडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

शासनाचे प्रशासनाला पत्र

दरम्‍यान, यासंदर्भात राज्‍य शासनातर्फे जिल्‍हा प्रशासन, पोलिस विभागाला पत्र पाठवत सतर्कता बाळगण्याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. टँकरचालकांना सुरक्षा पुरविण्यासह कायदा सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न उद्‌भवणार नाही, याची खबरदारी घेण्याच्‍या सूचना दिल्या या आहेत. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेताना तेल कंपन्‍यांना आवश्‍यक सहकार्य करण्याच्‍या सूचनादेखील दिल्‍या आहेत.

'ट्रान्स्पोर्ट असोसिएशनसोबत आमचे बोलणे सुरू आहे. यातून लवकरच योग्‍य तोडगा काढून परिस्‍थिती पूर्ववत करण्यासाठी आमचे प्रयत्‍न सुरू आहेत. लोकांनी घाबरून जाण्यासारखी कुठलीही परिस्‍थिती नाही.''- जलज शर्मा, जिल्‍हाधिकारी

आज भूमिका होणार निश्‍चित

यासंदर्भात मुंबई येथे मंगळवारी (ता.२) बैठक होणार असून, यानंतर संपात सहभागाबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका नाशिक ट्रान्‍सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष नाना फड यांनी मांडली. त्‍यामुळे सोमवारी या संपात नाशिकचे ट्रान्‍सपोर्टचालक सहभागी झालेले नसल्‍याचेही स्‍पष्ट केले.

''सर्व चालकांनी शासनाशी चर्चा करुन, त्‍यावर उपाय न निघाल्‍यावरच संपासारखे हत्‍यार उपसायला हवे. त्‍यामुळे ग्राहकांना वेठीस न धरता, यावर तोडगा निघायला हवा असे वाटते.''- विजय ठाकरे, उपाध्यक्ष, फामपेडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT