सोलापूर : अकरावीच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली असून, आता २७ जूनला दुसरी, ५ जुलैला तिसरी प्रवेश यादी व ९ जुलैला विशेष फेरी होईल. त्यानंतर १५ जुलैपासून अकरावीचे वर्ग सुरू होतील, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली. विद्यापीठाच्या नियोजनानुसार अभियांत्रिकीचे प्रथम वर्ष वगळता १ जुलैपासून अभियांत्रिकी, तांत्रिक, आर्किटेक्चर, फार्मसी, ‘एमबीए’चे वर्ग सुरू होणार आहेत.
यंदापासून विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाले आहे. त्यानुसार आता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, १२ जूनपासून कला, वाणिज्य, विज्ञान, सामाजिकशास्त्रे, एमएसडब्ल्यू, विधी, शिक्षणशास्त्र याचे वर्ग देखील १२ जूनपासूनच सुरू झाले आहेत.
यंदा दहावी- बारावीच्या परीक्षा सीसीटीव्हीच्या निगराणीत होणार असून परीक्षेसाठी सरमिसळ पद्धती असणार आहे. दुसरीकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने देखील आता सरमिसळ पद्धतीचाच अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. एकापाठोपाठ बसणारे विद्यार्थी एकाच अभ्यासक्रमांचे नसणार आहेत. दरम्यान, जेईई, सीईटीचा निकाल जाहीर होऊनही अद्याप अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाचे प्रवेश सुरू झालेले नाहीत. पुढील आठवड्यात प्रवेशाला सुरवात होईल, असे सूत्रांनी सांगितले.
विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्रांचे नियोजन
कला, वाणिज्य, विज्ञान, सामाजिकशास्त्रे (पदवी व पदव्युत्तर संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ परिसरातील संकुले), एमएसडब्ल्यू या अभ्यासक्रमांचे पहिले सत्र १२ जूनपासून सुरू झाले आहे. १२ जून ते २६ ऑक्टोबर असा या पहिल्या सत्राचा कालावधी असणार आहे. तर १६ नोव्हेंबरपासून दुसरे सत्र सुरू होऊन ते ३० एप्रिल रोजी संपेल.
विधी व शिक्षणशास्त्र (बीएड, बीपीएड), एमएड, एमपीएड, एम. ए. एज्युकेशन या अभ्यासक्रमांचे पहिले सत्र १२ जूनला सुरू होऊन २६ ऑक्टोबर रोजी संपेल. त्यानंतर परीक्षा होतील आणि १६ नोव्हेंबर ते ३० एप्रिल या काळात द्वितीय सत्र सुरू राहणार आहे.
अभियांत्रिकी, तांत्रिक, आर्किटेक्चर, फार्मसी, व्यवस्थापन व अभ्यासक्रम एम. बी. ए. या अभ्यासक्रमांची सुरवात १ जुलैपासून होणार आहे. १ जुलै ते ३० नोव्हेंबरपर्यंत या अभ्यासक्रमाचे पहिले सत्र असेल. त्यानंतर १ जानेवारी २०२५ ते ३१ मे २०२५ पर्यंत द्वितीय सत्र संपणार आहे.
विद्यार्थी हिताच्या निर्णयालाच प्राधान्य
विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र सुरू झाले असून प्रथम व द्वितीय सत्राचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यात महाविद्यालयांना कोणताही बदल करता येणार नाही. कोरोनानंतर विस्कळित झालेल्या वेळापत्रकाची घडी आता कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली बसविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यादृष्टीने त्याचे नियोजन केले आहे.
- डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
‘एसईबीसी’च्या प्रवेशाबाबत स्पष्टता नाही
राज्य सरकारने आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास मराठा समाजाला १० टक्के आरक्षण (एसईबीसी) देण्याचा निर्णय घेतला. पण, ‘एसईबीसी’तील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीला प्रवेश देताना कशा पद्धतीने द्यायचे आहे, त्यांच्याकडून शुल्क कसे आकारले जाईल, यासंदर्भात ‘सीईटी’ सेल व ‘डीईटी’कडून कोणताही आदेश किंवा माहितीपत्रक महाविद्यालयांना प्राप्त झालेले नाही. त्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालये देखील संभ्रमात असल्याचे काही प्राचार्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.