मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाणारे शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांच्या एका विधानामुळे शिंदेंनी त्यांच्या प्रवेशाला नकार दिला होता. खुद्द एकनाथ शिंदेंनीच ठाण्यातील मुलाखतीमध्ये याचा उलगडा केलाय. जालना सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर माझ्या अडचणींमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली. अडचणीत असलेला माणूस हा स्वतःसह कुटुंबाला सुरक्षित करण्याचा प्रयत्न करेल, असं विधान अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा जाहीर करताना केलं होतं. जालन्यातील रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी खोतकर यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. त्यांची ईडी चौकशीही सुरू असून या पार्श्वभूमीवर खोतकरांनी केलेले विधान चर्चेचा विषय ठरले होते. ईडीचा धाक दाखवत भाजपाने शिवसेनेचे ४० आमदार गळाला लावले, असा आरोपही विरोधकांनी केला होता.
ठाण्यातील मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदेंना ‘ईडी’बाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर शिंदे म्हणाले, ईडीच्या भीतीमुळे शिंदे गटात जातोय, असं विधान अर्जुन खोतकरांनी केलं होतं. यानंतर मी गेल्या गेल्या अर्जुन खोतकरांना सांगितलं होतं. तुमचा प्रवेश मी घेणार नाही. जिथे आहे तिथे थांब. शेवटी अर्जुन खोतकर यांनी माझ्या विधानाचा विपर्यास केला, असं सांगितल होतं.
खोतकरांनी केलेली सारवासारव
कुणाच्या दबावापोटी शिंदे गटात आलो नाही. आता कॅप्टन चांगला लाभला आहे. शिंदे पर्व विकासाचे पर्व असणार आहे. शिंदे मुख्यमंत्री झाले याचा आनंद आहे. राज्याला २० तास काम करणारा मुख्यमंत्री मिळाल्याचे खोतकरांनी सांगितलं होतं.
ठाण्यातील मुलाखतीत शिंदेंची फटकेबाजी
ठाण्यातील १७५ संस्थाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जनगौरव सोहळा करण्यात आला. याप्रसंगी उदय निर्गुडकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. महाराष्ट्रात नवीन ‘ईडी’ आली आहे ती म्हणजे एकनाथ- देवेंद्र (Eknath Shinde – Devendra Fadnavis) या ‘ईडी’ची कोणाला भीती वाटायला पाहिजे, यावर शिंदेंनी जे चुकीचं काम करतील त्यांना या ईडीची भीती वाटायला हवी, असे उत्तर दिले.
अजित पवारांना शिंदेंसारखे का जमले नाही?
अजित पवारांना शिंदेसारखे का जमले नाही, याबाबत शिंदेंनी हसत उत्तर दिले. ते म्हणाले, त्यांनी आधी एकदा प्रयत्न केलेला.
मोदी, शाहा, फडणवीस नसते तर उठाव यशस्वी झाला असता का?
उठाव करताना सर्व गोष्टी समजून घेऊनच उठाव करायचा असतो, असं उत्तर शिंदेंनी देताच सभागृहात हशा पिकला. मी मुख्यमंत्रिपदासाठी हे पाऊल उचललेच नाही, असंही शिंदेंनी स्पष्ट केले.
भाजपाला सोडून पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत जाणार?
आम्ही जो मार्ग स्वीकारलाय तो बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपले मित्र होऊ शकत नाही, असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं. पण अशी वेळ आल्यावर शिवसेनेचं काम बंद करू, असे ते म्हणालेले. मग आम्ही काय चुकलो. आम्ही त्यांचे विचार पुढे नेले. ज्या भाजपाशी शिवसेनेने युती करून निवडणूक लढवली त्यांच्याच सोबत आम्ही युती केलीये, असं शिंदेंनी सांगितले.
शहाजीबापूंमुळे तणाव कमी झाला
बंडाच्या वेळी चेहऱ्यावर तणाव होता, याकडे लक्ष वेधले असता शिंदे म्हणाले, ५० आमदारांची जबाबदारी माझ्याकडे. तुम्हीच विचार करा माझी काय अवस्था असावी. शहाजीबापूंनी आमचा खूप टाईमपास केला. ते आमचं टेंशन कमी करायचे, असं त्यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.