शिंदे- भाजपा सरकारच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित शपथविधी गुरुवारी चाळीस दिवसांनी पार पडला असून १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, यानंतर बच्चू कडू आणि अन्य इच्छुक आमदार नाराज असून मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा कधी पार पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सूचक विधान केलंय. तसंच राज्याच्या सर्वाधिक आमदार असूनही भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद का दिले या प्रश्नाचं शिंदेंनी ‘परिस्थिती’ असं एका शब्दात उत्तर दिले. ठाण्यातील १७५ संस्थाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जनगौरव सोहळा करण्यात आला. या सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार उदय निर्गुडकर यांनी शिंदेंची मुलाखत घेतली.
या मुलाखतीत एकनाथ शिंदेंना ज्याचे सर्वाधिक आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री असा प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, परिस्थिती. परिस्थितीनुसार सगळी गणितं बदलत असतात. पूर्वी काही लोकं सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू असं म्हणायचे. पण त्यांना जे जमलं नाही ते भाजपाने करून दाखवलं असा टोला शिंदे यांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.
मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा कधी?
मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब का झाला यावर शिंदे म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नाराजी नव्हती. सरकार कोणत्या परिस्थितीत स्थापन झालंय याची सर्वांना कल्पना आहे. गणित/समीकरणं असतात. विस्ताराचा दुसरा टप्पा पितृपक्षापूर्वी होईल का असा प्रश्नावर ते म्हणाले, ऐवढ्या लगेच. सध्या ऑगस्ट महिना सुरूये. किमान सप्टेंबरपर्यंत तरी वेळ दिला पाहिजे.
शाहांनी उद्धव ठाकरेंना शब्द दिलेला का?
अमित शाहांनी CM पदासाठी अडीच- अडीच वर्षांसाठी फॉर्म्युला ठरलेला का, यावर शिंदे म्हणतात, मी स्वत: मोदी आणि अमित शाहांना विचारलं. शाहा म्हणालेले की आम्ही कमी आमदार असूनही नितीश कुमारांना मुख्यमंत्री करु शकतो तर मग आम्ही उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द फिरवला असता का. भाजपा सत्तेसाठी राजकारण करतंय असा आरोप होतो. पण मला मुख्यमंत्रीपद देत मोदी, शाहा, नड्डा यांनी सर्वांची तोंड बंद केलीत, असंही शिंदेंनी आवर्जून सांगितले.
फडणवीसांमधील आवडणारे गुण कोणते?
मी काम करणाऱ्या माणसावर प्रेम करतो. ते मेहनती असून अभ्यासपूर्ण बोलतात. मुख्यमंत्री असताना त्यांचा कामाचा झपाटा बघितला होता. समृद्धी महामार्गाची जबाबदारी फडणवीस यांनी माझ्याकडे सोपवली. राज्याचा चेहरा बदलणारा हा प्रकल्प आहे.परिस्थितीनुसार गणित बदलत असतात. मला CM पद देणं फडणवीस यांचा मोठेपणा आहे, असं शिंदेंनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.