महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील नाराजी समोर आली आहे. एका जाहीर सभेत बोलताना यशोमती ठाकूर यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवली. विशेष म्हणजे यावेळी काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात मंचावर उपस्थित होते. अकोला येथे एका कार्यक्रमात बोलताना यशोमती ठाकूर यांनी अजित पवार यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. बालसंगोपन निधी अनुदानात वाढ करण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) साथ देत नसल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
अकोला जिल्ह्यातील बालापूर तालुक्यामधील पारसफाटा येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात यशोमती ठाकूर बोलत होत्या. यावेळी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहून म्हणाल्या की, बालसंगोपनाचे पैसे कित्येक वर्षांपासून वाढलेले नव्हते. 450 रुपये मिळत होते. आपण काही काळापूर्वी एक हजार 125 रुपये केलेले आहेत. पण माझी अशी इच्छा आहे की कमीतकमी दोन हजार 500 रुपये त्या लेकरांना द्यायला हवे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे. पण उपमुख्यमंत्री आम्हाला पाहिजे तेवढी साथ देत नाहीत. तुम्ही जर बोललात तर साथ मिळेल,” असं यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं आहे.
केंद्रातील सरकार हिंदू विरोधी सरकार आहे, असं वक्तव्य यशोमती ठाकूर यांनी मोदी सरकारवरही टीका करताना केलं. शनिवारी यशोमती ठाकूर यांनी बाळापुर रोडवरील हॉटेल मराठा येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. हॉटेलचे संचालक मुरलीधर राऊत यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना केलेली मदत सुपुर्द केली तसेच यावेळी शेतकऱ्यांना प्रशासकीय कामात येणाऱ्या अडचणी, भूसंपादन मोबदला आणि इतर काही प्रश्न जाणून घेतले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.