सोलापूर : जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांची पटसंख्या दहा किंवा त्यापेक्षा कमी आहे, त्या शाळांवर आता प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षक नेमला जाणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या जवळपास ९६ शाळांचा पट दहापेक्षा कमी असून त्याठिकाणी कंत्राटी शिक्षक नेमले जाणार आहेत. पण, विधानसभा निवडणुकीनंतर त्याची कार्यवाही होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक भरतीनंतरही सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांना अजूनही ६०० शिक्षक (मराठी, उर्दु, कन्नड माध्यम) कमी आहेत. शाळांना पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षक नसल्याने जिल्ह्यातील जवळपास ५०० शाळांमधील पदे समानीकरणात अडकली आहेत. ‘आरटीई’नुसार ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असावा, असा नियम आहे. पण, त्यानुसार सर्वच शाळांमध्ये कार्यवाही झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर पूर्वी २० पेक्षा कमी पटाच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक नेमण्याचा निर्णय झाला. या निर्णयात पुन्हा बदल करण्यात आला आणि आता नवीन निर्णयानुसार १० पेक्षा कमी पटाच्या शाळांवर डीएड- बीएडधारक सुशिक्षित बेरोजगार तरूणांना कंत्राटी पद्धतीने नेमले जाणार आहे. त्यांची नियुक्ती पहिल्यांदा एकाच वर्षासाठी असणार असून त्यानंतर त्यांना पुढे संधी द्यायची की नाही याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी घेणार आहेत.
निवडणुकीमुळे हे शक्य नसल्याने डिसेंबरमध्ये त्याची कार्यवाही होईल
जिल्हा परिषदेच्या ज्या शाळांची पटसंख्या दहा किंवा त्याहून कमी आहे, त्या शाळांमधील सध्याची पटसंख्या मागविली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार त्या शाळांवर प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षक नेमला जाणार आहे. तत्पूर्वी, त्या शाळांवरील नियमित दोनपैकी एका शिक्षकाची दुसऱ्या शाळेवर बदली करावी लागणार आहे. आता विधानसभा निवडणुकीमुळे हे शक्य नसल्याने डिसेंबरमध्ये त्याची कार्यवाही होईल.
- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
‘या’ निर्णयामुळे कमी होतील ‘अतिरिक्त’
२०२३-२४ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता करताना आधारव्हॅलिड पटसंख्याच ग्राह्य धरावी, असे शालेय शिक्षण विभागाचे आदेश होते. पण, शिक्षक संघटनांच्या मागणीनंतर या निर्णयातून सवलत देत आधारव्हॅलिड पटावरील १० टक्के विद्यार्थी शाळेत आहेत पण त्यांचे आधारकार्ड नाही, त्यांचाही विचार केला जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे पटसंख्येअभावी अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण कमी होणार आहे. पण, हा निर्णय कायमचा नसून यापुढे आधारव्हॅलिड पटसंख्याच ग्राह्य धरली जाईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.