पुणे - राज्यात पुणे, नागपूर आणि ठाण्यासह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. हे पूर्णपणे गृहमंत्रालयाचे अपयश आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रिपद आल्यापासून गुन्हे वाढले आहेत असे माध्यमेही सांगतात. त्यामुळे महाराष्ट्रात काय सुरु आहे याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी व केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेऊन फडणवीस यांच्या कामाचे ऑडिट करावे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. सुळे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.
सुळे म्हणाल्या, देशाला पूर्णवेळ कृषीमंत्री नसल्याने या सरकारला धोरण लकवा झालेला आहे. इथेनॉल, कांदा, ऊस यामध्ये सातत्याने धोरण बदलल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. काद्यांवरील निर्यात उठविण्यासाठी आम्ही संसदेत व रस्त्यावरील लढाई केली. ही निर्यातबंदी उठविल्याने आमच्या लढ्याला यश आले आहे.
निवडणूक आली की भाजपला शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर आठवतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिवजयंतीनिमित्तचा कार्यक्रम का रद्द झाला हे माहिती नाही. अरबी समुद्रातील स्मारकाचे भूमिपूजन केले, पण त्याचे पुढे काहीच झाले नाही. या सरकारला कोणत्याही समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सोडविता आलेला नाही.
जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत त्या म्हणाल्या, सध्या माझ्यासह रोहित पवार, आव्हाड हे सुद्धा भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रोजच चर्चा असते. आता भाजपकडे २०० आमदार, ३०० खासदार असूनही आमच्याकडचे लोक त्यांना हवे आहेत, याचा अर्थ आमच्यात टॅलेंट आहे. अटलजी, सुषमा स्वराजजी यांचा पक्ष आम्ही पाहिला होता, एकेकाळी सुसंस्कृत असलेल्या पक्षाला काय झाले आहे? असा टोला सुळे यांनी भाजपला मारला.
सुप्रिया सुळे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन
खासदार सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदार संघातील गेल्या पाच वर्षांतील कार्याचा ‘सेवा, सन्मान, स्वाभिमान’ हा कार्य अहवाल खासदार शरद पवार यांच्या हस्ते शिवजयंतीनिमित्त प्रकाशित करण्यात आला. शिवाजीनगर येथील एस. एस. पी. एम. एस. संस्थेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर या अहवालाचे प्रकाशन झाले. हा कार्य अहवाल लवकरच डिजिटल स्वरूपात संकेतस्थळ आणि सामजमाध्यमांवर उपलब्ध होणार असून नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात, असे आवाहन सुळे यांनी या वेळी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.