राज्यात रक्तदाबाच्या १९ लाख ३८ हजार ४५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मुंबई - तंबाखूचे वाढते प्रमाण, दारूचे व्यसन, रोजच्या आहारात फळे आणि भाज्यांचा अभाव, आहारात मिठाचा अतिवापर, चुकीची जीवनशैली आणि शारीरिक कसरतींचा अभाव अशा कारणांमुळे मधुमेह व उच्च रक्तदाबासारख्या आजारांचे प्रमाण जगभरात वाढत आहे. राज्यातही मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची परिस्थिती बिकट आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१८ ते ३ एप्रिल २०२३ पर्यंत उच्च रक्तदाबासाठी एक कोटी ८८ लाख २१ हजार ४६७ नागरिकांची चाचणी करण्यात आली. त्यांपैकी १९ लाख ५९ हजार ४२९ नागरिकांना निदान झाले आहे.
राज्यात रक्तदाबाच्या १९ लाख ३८ हजार ४५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याच कालावधीत एक कोटी ८७ लाख ३८ हजार १४१ नागरिकांची मधुमेह चाचणी झाली आहे. त्यांपैकी नऊ लाख ३२ हजार १५३ नागरिकांचे निदान झाले असून आठ लाख ५० हजार ६१४ रुग्णांना मधुमेहाच्या उपचारांची गरज भासली आहे.
समस्यांवर मात शक्य!
दोन्ही आजार असंसर्गजन्य असले तरी त्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञ मांडतात. मधुमेह नियंत्रणात असल्यास ब्रेन स्ट्रोक, मूत्रपिंडे निकामी होणे, डोळ्यांच्या समस्या, हृदयविकार इत्यादींसारख्या समस्यांवर मात करणे शक्य आहे, असे मधुमेह आणि बॅरिॲट्रिक शल्यचिकित्सा विभागाचे संचालक डॉ. रमण गोयर यांनी सांगितले. आनुवंशिकता, स्वभाव आणि मानसिक तणावामुळे शरीरात कॅटेकोलामाईन, एड्रेनालाईन आणि नॉरएड्रेनालाईनचा स्राव वाढतो. त्यामुळे रक्तदाब वाढतो. लठ्ठपणा आणि जास्त वजन यांचा उच्च रक्तदाबाशी जवळचा संबंध आहे. वजन जितके जास्त तितका रक्तदाब वाढतो.
मुंबईतील स्थिती
मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारख्या दोन प्रमुख आजारांच्या नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेतर्फे वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र, प्रत्येक स्तरावर त्या अधिक सूक्ष्म पद्धतीने राबविण्याची गरज जागतिक आरोग्य दिनानिमित्त निर्माण झाली आहे. गेल्या दोन वर्षांत फक्त मधुमेहामुळे मुंबई शहरात ३० हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. पालिकेच्या ‘डब्ल्यूएचओ स्टेप्स’ सर्वेक्षण अहवालातूनही मुंबईकरांच्या रक्तातील साखर वाढल्याचे निदर्शनास आले होते. मधुमेहासह उच्च रक्तदाबालाही मुंबईकर बळी पडले आहेत. चार वर्षांत मधुमेहाच्या रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबाच्या तुलनेत सातत्याने वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबईत ३४ टक्के नागरिकांमध्ये रक्तदाब वाढल्याचे नोंदवले गेले आहे. ८.३ टक्के व्यक्तींमध्ये उच्च रक्तदाब आणि मधुमेह असे दोन्ही आजार आढळले आहेत.
उच्च रक्तदाब आणि मधुमेह आजार जोखीम वाढवणारे आहेत. हल्ली तरुणांमध्येही असे आजार दिसतात. दोन्ही आजारांची जोखीम मोठी असून स्ट्रोक येण्याचा धोका आहे.
- डॉ. नीरज जैन, प्राध्यापक, न्यूरोलॉजी विभाग, केईएम रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई
काय खबरदारी घ्याल?
वजन आणि रक्तदाब कमी करण्यासाठी आहारासोबत योगाभ्यास आवश्यक
उच्च रक्तदाब व्यायाम आणि योगासनांनी कमी करता येतो.
चालणे, पोहणे, सायकल चालवणे आणि धावणे असे व्यायाम प्रकार फायदेशीर
मुंबईत दोन वर्षांतील मधुमेहींचे मृत्यू
२०२० - १६,०२१
२०२१ - १५,५६६
एकूण - ३१,५८७
(पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.