मला गुंडगिरी करायची असती, तर मी गोव्यापासून सावंतवाडी ते अगदी जिथं-जिथं उमेदवार होते तेथून उचललं असतं; पण..
सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत (Satara District Bank Election) ज्या दिवशी माझा पराभव झाला, त्याच दिवशी माझ्या विरोधात कट करस्थान करणारे नाचले, हे सर्वांनी पाहिलंय. मला गुंडगिरी करायची असती, तर मी गोव्यापासून सावंतवाडी ते अगदी जिथं-जिथं उमेदवार होते तेथून मी उचलले असते. परंतु, ते माझ्या रक्तातच नाही. शेवटपर्यंत माझ्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश का केलं नाही, कारण त्यांनी मनापासून केलंच नाही. माझ्या पराभवासाठी शिवेंद्रसिंहराजेच जबाबदार आहेत, हे त्यांचंच षडयंत्र आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी भाजप आमदार व सहकार पॅनलचे सहकारी शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांचे नाव न घेता केलाय.
जिल्हा बँकेतील पराभवानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी आज सातारा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकरांशी संवाद साधून आपली भूमिका जाहीर केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही टीका केली. एकाच दिवसांत सगळे अर्ज निघाले आणि हे बिनविरोध कसे झाले हे शोधलं पाहिजे, असे सांगून आमदार शिंदे म्हणाले, शिवेंद्रसिंहराजे विषयी पक्षाने भूमिका जाहीर करावी. मी सरळ पणाने निवडणूक केली, कोणतीही दादागिरी केली नाही. सातारा विधानसभा लढविणार का, या प्रश्नावर मी सध्या विधान परिषदेवर आहे. त्यामुळं या जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादीचे 9 आमदार कसे होतील यासाठी प्रयत्न करणार आहे.
येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकीत पक्षाचा बालेकिल्ला अभेद्य राहावा, यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निर्णय घ्यावा. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जे राजकारण झाले ते यापुढील निवडणुकीत होऊ नये याची काळजी घेतली जावी. जे लोक विरोधात काम करतात, ते सहकार पॅनेलमध्ये कसे आणि तेच बिनविरोध झाले; पण आम्ही प्रामाणिक काम करूनही ताकद असूनही पराभूत होतो, यामागे पक्षातील नेत्यांचे षडयंत्र आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सातारा जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीत जावळी तालुका सोसायटी मतदारसंघात संघातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणे यांचा एक मताने विजय झाला असून आमदार शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला होता. या निकालानं जिल्ह्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या निवडणुकीत 49 मतदानापैकी आमदार शिंदे यांना 24 मते मिळाली, तर विजयी उमेदवार रांजणे यांना 25 मते मिळाली होती.
खासदार शरद पवार (MP Sharad Pawar) माझी नेहमीच समजूत काढतात, कारण पवार साहेब आहेत म्हणून मी आहे. मी राष्ट्रवादीचा (NCP) सच्चा पाईक असून, मरेपर्यंत पवारसाहेबांची साथ सोडणार नाही. आता मी मोकळाच आहे. त्यामुळे सातारा, जावळीसह सर्व तालुक्यांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी फिरणार असल्याचे आमदार शिंदेंनी काल सांगितलं होतं. आज यावरती पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केलीय.
शिंदेंच्या पराभवावर शरद पवार काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांचा सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अवघ्या एका मतानं पराभव झाला. त्यांच्या या पराभवावरुन राज्याच्या राजकारणात खळबळ माजली होती. दरम्यान, शिंदे यांच्या या पराभवावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भाष्य केलं. सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. मात्र, मी अद्याप त्यांच्या पराभवाचं कारण काय असू शकेल याच्या खोलात गेलेलो नाही. पण, त्यांनी ही निवडणूक गांभीर्यानं घ्यायला हवी होती, असं त्यांनी काल म्हंटलं होतं. जिल्हा बॅंक निवडणुकीच्या (Satara District Bank Election) पार्श्वभूमीवर काल साताऱ्यातील कार्यालयावर दगडफेक झाली. ही घटना खूपच दुर्दैवी आहे, असंही पवार म्हणाले.
आमदार शिवेंद्रसिंहराजे काय म्हणाले होते?
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आज सर्वसामान्य कुटुंबातील ज्ञानदेव रांजणे (Dnyandev Ranjane) यांनी विजय मिळवून इतिहास निर्माण केला आहे. रांजणे यांचा हा विजय जावळी तालुक्यातील दहशत, गुंडगिरीवर मिळवलेला विजय असून रांजणे हे संचालक झाल्याने जावळी तालुक्याला हक्काचा संचालक जिल्हा बँकेत मिळाला आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये जावळी तालुक्यात विजय मिळवून दादागिरीचं राजकारण हद्दपार करू, असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.