महाराष्ट्र बातम्या

स्मृतीदिन: 'श्यामच्या आई'पलिकडचे 'हे' साने गुरुजी तुम्हाला माहिती आहेत का?

सुभाष वारे

महाराष्ट्राचे आधुनिक संत म्हणून ओळखले जाणारे साने गुरुजी यांचा 11 जूनला स्मृतीदिन आहे. साने गुरुजी यांनी लिहीलेल्या "शामची आई" या पुस्तकाने महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांना प्रभावित केले आहे. संस्कारगाथा अस या पुस्तकाच वर्णन करता येईल. कोवळ्या वयातील मुली-मुलांच्या मनात पालकांच्याबद्दल आदरभाव बाळगण्याचे, जातीआधारित अहंकार सोडून देण्याचे, श्रमाची प्रतिष्ठा राखण्याचे, निसर्गाविषयी कृतज्ञभाव जपण्याचे आवश्यक संस्कार या पुस्तकाने रुजवले आहे. एकुणातच समंजस आणि उदारमतवादी नागरिकत्व घडण्यास हे पुस्तक उपयोगी ठरलेले आहे. या पुस्तकाच्या लाखो प्रती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचल्या आहेत. या पुस्तकामुळेच साने गुरुजींची मातृह्रदयी साने गुरुजी ही प्रतिमा ठसठशीत बनली.

आंतरभारतीचे स्वप्न उपस्थितांना समजावून सांगताना साने गुरुजी एकदा म्हणाले होते, माणसाच्या पायात काटा टोचल्यानंतर त्याची वेदना मेंदुमधे जाणवते, डोळ्यातील अश्रुवाटे ती वेदना व्यक्त होते आणि पायातील काटा काढण्यासाठी हात पुढे सरसावतात. पाय, हात, डोळे, मेंदू हे अवयव वेगवेगळे असले तरी वेदनेच्या प्रसंगात ते सर्वजण एकत्र येऊन वेदना सुसह्य करण्यासाठी, वेदना दूर करण्यासाठी एकोप्याने कृती करतात. त्याचप्रमाणे आपण सर्व भारतीय वेगवेगळी भाषा बोलणारे असूत किंवा वेगवेगळी श्रद्धा बाळगणारे असूत आपण एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी झाले पाहिजे. एकमेकाच्या अडीअडचणीला उभे राहिले पाहिजे. साने गुरुजींच्या अशा भावनाशील बोलण्याने, लिखाणाने आणि कृतीने साने गुरुजींची मातृह्रदयी साने गुरुजी ही प्रतिमा आणखी ठसठशीत बनली. साने गुरुजींच्या मृत्युनंतर आपण त्यांची हीच मातृह्रदयी प्रतिमा सतत प्रसारित केली. अस म्हणतात की कोणत्याही महान व्यक्तीमत्वाचे अनुयायी त्या महान व्यक्तीच्या जीवन कार्यातील आपल्याला झेपेल आणि रुचेल तेवढाच भाग स्विकारतात आणि तेवढाच भाग सतत सांगत रहातात. साने गुरुजींच्याबद्दलही काहीस असच झाल आहे का? सामाजिक सलोखा आणि परस्पर आदरभाव रुजवण्यासाठी साने गुरुजींनी केलेले कार्य महान आहेच पण साने गुरुजींचं जिवितकार्य एवढ्यापुरतच मर्यादित नाही. अन्यायाविरुद्ध बोलायला, भूमिका घ्यायला आणि कृती करायला शिकवणं हा सुद्धा एक आवश्यक संस्कार असतो. अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची लढवय्या वृत्ती साने गुरुजींच्यामधे होती की नव्हती? असेल तर ती पुढे का येत नाही? आधी म्हटल्याप्रमाणे आपण आपल्याला पचतील, रुचतील तेवढेच साने गुरुजी स्विकारल्यामुळे असं झालं असेल का?

'चले जाव' आंदोलनातील साने गुरुजी :

ब्रिटीशांच्या साम्राज्यवादी जोखडातून भारताला मुक्त करण्यासाठी एकोणीसशे बेचाळीस साली म. गांधीजींच्या नेतृत्वाखाली निर्णायक आंदोलन छेडले गेले. या आंदोलनाच्या ठरावात ब्रिटीशांना "छोडो भारत" असे बजावण्यात आले होते तर हे घडवून आणण्यासाठी भारतीयांसाठी "करा अथवा मरा" चा आदेश होता. साने गुरुजींनी बेचाळीसच्या चले जाव आंदोलनात उडी घेतली. भूमिगत राहून ब्रिटीशांच्या विरोधात रान उठवण्याचे काम ते आणि त्यांचे सहकारी करत होते. आपल्या ओजस्वी वाणीने ब्रिटीश राजवटीविरोधात युवती-युवकांच्या मनात अंगार फुलविण्याचे काम साने गुरुजी करत होते. त्यांच्या प्रेरणेने अनेक युवती- युवकांनी चले जाव आंदोलनात स्वतःला झोकून दिले. या आंदोलनादरम्यान साने गुरुजींनी "क्रांतीच्या वाटेवर" ही पुस्तिका लिहीली. बरेच दिवस ही पुस्तिका अप्रकाशित होती. काही वर्षांपुर्वी साधना प्रकाशनाने विशेषांक स्वरुपात ही पुस्तिका प्रकाशित केली. हिंसा-अहिंसा याबद्दलचे आपल्या मनातील विचार साने गुरुजींनी या पुस्तिकेत शब्दबध्द केले आहेत. ब्रिटीश राजवटीविरोधात संघर्ष करण्याचे आवाहन तरुणी-तरुणांना करताना या पुस्तिकेत साने गुरुजींनी जे लिहीलय त्याचा थोडक्यात आशय असा आहे. काँग्रेस वर्कींग कमीटीच्या ८ आॕगस्ट १९४२ च्या ठरावाद्वारे भारतीयांनी आपले स्वातंत्र्य घोषित केले आहे. प्रत्येक भारतीयाने उद्यापासून स्वतःला स्वतंत्र नागरिक मानावे व तसा व्यवहार करावा असे मार्गदर्शन म. गांधीजींनी केले आहे. या ठरावानुसार आज भारत हे स्वतंत्र राष्ट्र आहे आणि त्यामुळे भारतीय भुमीवरील ब्रिटीश राजवट ही परकीय राजवट ठरते. परकीय राजवटीला भारतीय भूमीवरुन घालवून देण्यासाठी आपण जे करत आहोत ते एक प्रकारचे युद्धच ठरते. मानवी जीवन अनमोल आहे. या लढ्यात होता होईल तो जिवीतहानी टाळण्याचाच आपला प्रयत्न असायला हवा आणि तो राहीलच पण परकीय सत्तेविरुद्धच्या युद्धात हिंसा-अहिंसेची चर्चा अप्रस्तुत ठरते. साने गुरुजींच्या या भुमिकेबद्दल चर्चा होऊ शकते. पण बेचाळीसच्या चले जाव आंदोलनातील सहभागातून साने गुरुजींच्यामधील जो लढाऊ देशभक्त आपल्यासमोर येतो तो आपण समजून घेत आहोत का? इतरांना समजावून सांगतो का, हा खरा प्रश्न आहे. पुढे चले जाव आंदोलनात साने गुरुजींना अटक झाली. धुळे आणि नाशिक येथील कारागृहात त्यांना ठेवले होते. आंदोलनात सहभागी असलेल्या आपल्या सहकाऱ्यांची नावे सांगावीत म्हणून ब्रिटीश पोलीसांनी त्यांना अमानुष मारहाण केली. हा मार सहन करण्याची प्रेरणा शामच्या आईच्या आठवणीतूनच साने गुरुजींना मिळाली असणार. त्यांनी मारहाण सहन केली मात्र आपल्या एकाही सहकाऱ्याचे नाव त्यांनी स्वतःच्या तोंडातून बाहेर पडू दिले नाही. मातृह्रदयी साने गुरुजींचा अशा प्रसंगातला निर्धारही तितकाच कणखर होता.

शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण :

साने गुरुजींच्यामधील संघटन कौशल्य खऱ्या अर्थाने नजरेत भरले ते काँग्रेसच्या फैजपूर अधिवेशनाच्या वेळी. ग्रामीण भागात होत असलेल्या काँग्रेसच्या या अधिवेशनाच्या व्यवस्थेसाठी साने गुरुजींच्या मार्गदर्शनात स्वयंसेवक दल उभारले होते. यातूनच राष्ट्र सेवा दलाची संकल्पना पुढे आली. ग्रामीण भागात होत असलेल्या या अधिवेशनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांचे आणि ग्रामीण भारताचे विविध प्रश्न काँग्रेसच्या अजेंड्यावर आणण्यासाठी साने गुरुजींनी प्रयत्न केले. शेतकरी व कामकरी समुहांनी अधिवेशनाला मोठ्या प्रमाणावर उपस्थित रहावे याकरिता गुरुजींनी खानदेश आणि लगतचा नाशिकपर्यंतचा भाग पिंजून काढला.

आता उठवू सारे रान,

आता पेटवू सारे रान,

शेतकऱ्यांच्या राज्यासाठी,

कामकऱ्यांच्या राज्यासाठी,

लावू पणाला प्राण!

हे गाणं गुरुजींनी याच काळात आणि याच कारणासाठी लिहीलेलं आहे. भारतातला शेतकरी आज अडचणीत आहे. शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. शेतीउद्योग प्रचंड जोखमीचा बनलाय. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांना विरोध करत हजारो शेतकरी ऊन, पाऊस, थंडीत दिल्लीच्या सिमेवर तळ ठोकून आवाज उठवत आहेत. सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असुनही भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत नाही. सरकारची ही असंवेदनशीला निष्क्रीयता निषेधार्ह आहे. अशावेळी साने गुरुजींच्या या गाण्याने साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुली-मुलांनी प्रेरणा घ्यायला हवी. शासनाची शेती आणि शेतकरीविरोधी धोरणे बदलवण्यासाठी गुरुजींचे हे गाणे पुन्हा एकदा या देशातील तरुणी आणि तरुणांच्या ओठावर यायला हवे.

प्रताप मिलच्या कामगारांचा लढा :

अंमळनेर येथील प्रताप मिलच्या कामगारांचा संप साने गुरुजींच्या नेतृत्वाखाली झाला होता. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना म. गांधीजींचे शिष्य असणारे साने गुरुजी गांधीजींच्याच भाषेत म्हणाले, कारखानदारांनी, विश्वस्तवृत्तीने वागले पाहिजे. उत्पादनात कामगारांच्या घामाचाही हिस्सा असतोच. कामगाराला आणि कामगारांच्या घरच्यांना सुखाने जगता येईल एवढा त्यांच्या श्रमाचा मोबदला त्यांना मिळालाच पाहिजे. संपकरी कामगारांसमोर बोलताना साने गुरुजींनी कामगारांच्या घामाची चोरी आणि कारखाना मालकाची लोभी वृत्ती याबाबत टिकास्त्र सोडले होते. हा संप यशस्वी झाला आणि प्रताप मिलच्या कामगारांना न्याय मिळाला. आज कामगार कायदे कमकुवत केले जात आहेत. काॕन्ट्रॕक्ट लेबर नावाच्या राक्षसानं कामगारांच्या न्याय्य अधिकारांना सुरुंग लावलाय. इथेही भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने कामगार कायद्यात घातक बदल करुन कामगारांनी लढून मिळवलेले अधिकार हिरावून घेण्याचं काम चालवलय. कोरोनाच्या निमित्ताने आलेल्या लॉकडाऊनमुळे कष्टकरी मजुरांचे अतोनात हाल झाले. व्यवस्था म्हणून आपल्याला सर्वांनाच आपली लाज वाटावी इतकी मजूरशक्तीची झालेली परवड जगाने पाहिली. तळात दडपलेलं विषमतेचं भयाण वास्तव कोरोनाच्या निमीत्ताने पृष्ठभागावर आलं. अशावेळी कामगारांच्या घामाची चोरी होऊ न देण्यासाठी, त्यांना सन्मानाने व समाधानाने जगता यावं यासाठी संविधानाच्या, कायद्याच्या कक्षेत राहून आपापल्या परीने काहीना काही कृती करण्याचं बळ साने गुरुजींच्या स्मृतीतून आपल्याला मिळायला हवं.

पंढरपूर मंदीर प्रवेश सत्याग्रह :

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्व जाती-धर्माच्या स्त्री-पुरुषांना प्रवेश मिळावा यासाठी साने गुरुजींनी केलेले प्राणांतिक उपोषण हा त्यांच्या जिवीतकार्यातील महत्वाचा टप्पा आहे. जन्माधिष्ठीत उच्च-निचतेवर आधारलेल्या चातुर्वण्य व्यवस्थेतील अन्याय व शोषण हा कुठल्याही संवेदनशील व समताप्रेमी माणसाला अस्वस्थ करणारा विषय. साने गुरुजींसारख्या भावूक आणि प्रेमाच्या शक्तीवर विश्वास असणाऱ्या व्यक्तीने अशा मुद्द्यासाठी आपले प्राण पणाला लावायचा निर्धार करावा हे सुसंगतच मानले पाहिजे. एकेकाळी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात आधी राजकीय सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा हा वाद जोरात होता. म. गांधीजींनी स्वातंत्र्यलढ्यात या दोन्ही आघाड्यावरील कार्यक्रम व उपक्रमांची अशी काही सांगड घातली की तो वादच अप्रस्तुत ठरला. साने गुरुजी आणि त्यांचे समाजवादी सहकारी गांधीजींच्याच मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्यलढ्यात कार्यरत होते. बेचाळीसच्या लढ्याची धामधुम कमी होताच आणि भारताचे राजकीय स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात येताच गुरुजींनी सामाजिक समतेच्या लढ्याकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी हा महत्वाचा सत्याग्रह हातात घेतला. यासाठी राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकासह महाराष्ट्राच्या गावोगावी जावून त्यांनी महाराष्ट्राच्या समाजमनाला साद घातली. कलापथकाच्या प्रबोधनामुळे अनेकांची पारंपारिक भूमिका बदलली. काही थोडे जण मात्र अधिक कर्मठ बनले. साने गुरुजींनी पंढरपुरच्या वाळवंटात प्राणांतिक उपोषण सुरु केले.

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म,

भेदाभेद भ्रम अमंगळ!

या संत तुकारामांच्या भुमिकेची आठवण सर्वांना आणि विशेषतः विरोध करणाऱ्या बडव्यांना या सत्याग्रहाने करुन दिली. पंढरीचा विठ्ठल हे बहुजनांचे दैवत. समतेचा पुकारा करणाऱ्या बौद्ध परंपरेशी नाते सांगणारा हा देव. पूरोहितशाहीच्या पोटापाण्याचा आधार म्हणून रुजवलेल्या कुठल्याही निरर्थक कर्मकांडाला वारकरी परंपरेत थारा नाही. भक्तांच्याकडून केवळ नामस्मरणाची अपेक्षा सांगणाऱ्या परंपरेतील हा देव आहे. आपलं काम प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या भक्ताला आपल्या कामातच पांडुरंग भेटेल असं आश्वस्त करणाऱ्या परंपरेतील हा देव. अशा विठ्ठलाच्या गाभाऱ्यात केवळ जातीच्या आधारावर काही जणांना प्रवेश नाकारणे हे म्हणजे वारकरी परंपरेच्या विरोधातील भूमिका. साने गुरुजींची भूमिका महाराष्ट्राच्या समाजमनाने उचलून धरली. विठ्ठल मंदिराचे दरवाजे सर्व भावा-बहिणींसाठी खुले झाले. देशाचे स्वातंत्र्य वेशीवर आलेले असताना साने गुरुजींचे हे उपोषण नव्या भारतासाठी दिशा दिग्दर्शक होते. येऊ घातलेल्या भारतीय संविधानातील सामाजिक समतेच्या मुल्याचं जमीनीवरील ते प्रात्यक्षिक होतं. आज साने गुरुजींची आठवण काढताना मनात अनेक प्रश्न आहेत. एकविसाव्या शतकात मंदिरप्रवेशाचा मुद्दा अप्रस्तुत ठरलाय. पण अन्यायकारी व विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या जातीव्यवस्थेचा मुद्दा तर कायम आहे. सरकारे बदलली तरी जातीय अत्याचार सुरुच आहेत. जातीअंताची लढाई आज वेगळ्या टप्प्यावर नेण्याची गरज आहे. जातीय अत्याचार व महिला अत्याचाराच्या घटनातील गुन्हेगारांना वेळेत कठोर शासन करुन कायद्याच्या राज्याचा वचक निर्माण करण्याची गरज वाढलीय. समाजात सामाजिक सलोखा हवाय तो अशा अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी, त्यावर पांघरूण घालण्यासाठी नाही. सर्वांना चांगल्या शिक्षणाचा व सक्षम रोजगाराचा अधिकार मिळावा, उपजिवीकेच्या साधनांच्यापर्यंत सर्वांची पोहोच वाढावी या आघाड्यावर सामाजिक समतेची लढाई ताकदीने लढण्याची गरज आजही तितकीच तीव्र आहे.

साने गुरुजी मातृह्रदयी होते. भावनाशील होते. आणि त्याचबरोबर लढवय्ये सुद्धा होते. खरे तर ज्याच्या मनातील संवेदनशीलता जागी आहे आणि ज्याच्या काळजातील भावना अद्याप थिजलेल्या नसतात अशी माणसेच नवनिर्माणकारी संघर्षात स्वतःला झोकून देवू शकतात. आज ११ जूनला साने गुरुजींच्या स्मृतीदिनी

खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे

अस सांगत वैश्विक प्रेमाचा संदेश देणाऱ्या साने गुरुजींची आठवण तर काढुयाच आणि त्याचबरोबर शेतकरी, कामगार आणि शोषित जातीसमुहांच्या न्याय्य अधिकारांसाठी ठोस कृती करणाऱ्या, निर्धाराने संघर्ष करणाऱ्या लढवय्या साने गुरुजींनाही अभिवादन करुया....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाण्यात केदार दिघेंचे डिपोझिट जप्त

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT