सोलापूर : मुळेगाव तांड्यातील महिलांना शिवणकाम व फॅशन डिझायनचे मिटकॉन कंपनीतर्फे प्रशिक्षण घेऊन हस्तकलेने सजविलेल्या साड्या आता अपेक्स गारमेंट कंपनीच्या माध्यमातून जर्मनीला जाणार आहेत. त्या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे १८ जून रोजी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर प्रदर्शन भरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे.
सोलापूर ग्रामीण पोलिस दलातर्फे ‘ऑपरेशन परिवर्तन’ राबविताना बंजारा समाजातील पारंपारिक हस्तकलेच्या वस्तू बनविण्यास महिलांना प्रोत्साहन व अर्थसहाय देण्यात आले. परिस्थितीमुळे वर्षानुवर्षे हातभट्टी दारू गाळण्याचे अवैध काम करणाऱ्या महिलांच्या सुप्त कलागुणांना आता वाव मिळाला आहे. त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर १८ जून रोजी सुरु होणार आहे. सुरवातीला हातभट्टी दारूचे उत्पादन व विक्री पूर्णत: बंद करण्याच्या हेतूने सुरु केलेला हा उपक्रम आता सामाजिक बांधिलीकीतून जागतिक स्तरावर पोहचणार आहे. ऑपरेशन परिवर्तनातून बंजारा समाजाला रोजगार उपलब्ध करून देणे, बंजारा समाजाच्या ‘कशिदकरी’ कलाकृतीचे जतन करणे, या कलाकृतीचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत हस्तांतरित व्हावा, या हेतूने महिलांचे प्रबोधन केले असून या व्यवसायाकडे आता महिलांची गर्दी वाढू लागली आहे. त्या सर्वांना बॅंकांसह ‘उमेद’च्या माध्यमातून मदत मिळवून दिली जात आहे. पुढील टप्प्यात २० बचत गटांमधील २०० महिलादेखील शिवणकाम सुरु करतील. त्यांना पुण्यातील फॅशन डिझायनरतर्फे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
महिलांनी बनविला बंजारा ब्रॅण्ड
‘ऑपरेशन परिवर्तन’च्या माध्यमातून हातभट्टी दारूचे गाळप करणाऱ्या महिलांनी तो व्यवसाय सोडून पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत १०० हून अधिक साड्या, ५०० हून अधिक कुशन्स, वॉल हँगिंग फ्रेम्स, घड्याळ, ओढणी, शाल, भिंतीवरील घड्याळाच्या सर्व बाजूंनी आकर्षक डिझाईन, महिलांच्या गळ्यातील व हातातील सुबक ज्वेलरी, दरवाजाला लावण्याचे पुष्पाहार, बंजारा समाजाची संस्कृती टिपणारी सुंदर पेन्टिंग, अशा वस्तू बनविल्या जातात.
हातभट्टी व्यवसायिकांचे ‘असे’ करतात परिवर्तन
- सर्वप्रथम हातभट्टी दारूचे उत्पादन करणाऱ्या व विक्री होणाऱ्या गावांची निवड करणे
- प्रत्येक गाव स्वतंत्र अधिकाऱ्यांना दत्तक देऊन त्याठिकाणी सातत्याने वॉच ठेवणे
- हातभट्टी दारू तयार होणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन त्याठिकाणी आठवड्यात दोन-तीनवेळा कारवाया
- कारवायांमध्ये सातत्याने वाढ, समुपदेशन, जनजागृती व पुनर्वसन यावर अधिक भर देणे
- अवैध व्यवसाय सोडलेल्यांना किराणा दुकान, मटण-चिकन, कापड दुकान टाकण्यासाठी बॅंकांतर्फे अर्थसहाय मिळवून देणे
- हातभट्टी दारू व्यावसायिकांसह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कुटुंबातील मुलांना नोकरी मेळाव्यातून जॉब देणे
सर्वांनी भेट देऊन प्रोत्साहित करावे
ग्रामीण पोलिस दलातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मेहनतीतून हे ऑपरेशन परिवर्तन यशस्वी झाले आहे. आतापर्यंत सहाशेहून अधिक जणांनी हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीचा व्यवसाय सोडून समाजमान्य व्यवसाय निवडला आहे. १८ जूनला त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन होणार असून त्यावेळी सर्वांनी भेट देऊन त्यांना प्रोत्साहित करावे.
- तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.