अहमदनगरः धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी नगरच्या चौंडी येथे मागच्या पंधरा दिवसांपासून उपोषण सुरु आहे. एका आंदोलनकर्त्याची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्याला हलवण्यात आलेलं आहे. सरकारने दिलेली मुदत संपल्याने आज बुधवारी राज्यभर रास्ता रोको आंदोलनाची हाक देण्यात आलीय.
धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी मागच्या कित्येक वर्षांपासून धनगर समाज आंदोलन करीत आहे. १ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाचा वाद पेटल्यानंतर राज्यात मराठा समाजाने आंदोलनाचं हत्यार उपसलं. त्यानंतर ओबीसी समाजानेदेखील अनेक ठिकाणी उपोषणं आणि मोर्चे काढले.
एसटी संवर्गात समावेश करावा, यासाठी धनगर समाजाच्या वतीने अहमदनगरच्या चौंडी येथे उपोषण सुरु आहे. यशवंत सेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. दोन आंदोलकर्त्यांची प्रकृती खालावली होती. दोघांनाही अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलेलं होतं. त्यातील अण्णासाहेब रुपनवर या उपोषणकर्त्याची प्रकृती जास्त बिघडल्याने त्यांना पुण्याला हलवण्यात आलेलं आहे. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.
मागच्या पंधरा दिवसांपासून चौंडीमध्ये हे उपोषण सुरु असून अकराव्या दिवशी मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती. दोन दिवसांमध्ये बैठक घेऊन धनगर आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र ही मुदत कालच संपलेली आहे.
आज बुधवारी खांबाटकी घाटामध्ये ११ वाजता रास्ता रोको आंदोलन होणार असून त्याबरोबरच राज्यात २५ ठिकाणी रास्ता रोको होणार आहे. धनगर आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. सरकार धनगर आरक्षणाच्या संदर्भाने काय भूमिका घेतं, हे बघावं लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.