शासकीय वाहनात बसवून सेवानिवृत्त होणा-या अधिकाऱ्यांना निरोप दिला जातो. असे प्रकार पोलीस दलाच्या प्रमाणित कार्यपध्दतीला अनुसरुन नाही.
बारामती : पोलिस अधिकाऱ्यांच्या (Police Officers) बदलीनंतर त्यांना दिले जाणारे निरोप समारंभ व फेटे बांधून जीपमधून त्यांची मिरवणूक काढणे या गोष्टी यापुढील काळात करता येणार नाहीत. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी याबाबत एक परिपत्रक प्रसिद्ध दिले असून अशा स्वरूपाचे कृत्य घडल्यास संबंधितांवर कारवाईचा इशारा यात देण्यात आला आहे.
याबाबत प्रसिद्ध पत्रकात रश्मी शुक्ला यांनी नमूद केलंय की, महाराष्ट्र राज्य पोलीस (Maharashtra Police) दलातील विविध दर्जाच्या पोलीस अधिकारी / अंमलदार यांच्या शासन नियमानुसार, तसेच प्रशासकीय कारणास्तव बदल्या होत असतात. बदली (Transfer) ही एक नित्याची बाब (Routine Procedure) आहे. अशा एका घटकातून / ठिकाणाहून दुस-या घटकांत / ठिकाणी बदली झालेल्या पोलीस अधिकारी यांच्या सन्मानार्थ विविध पोलीस ठाणे / शाखांमध्ये निरोप समारंभ आयोजित केले जातात.
अशा समारंभांमध्ये संबंधित पोलीस अधिकारी हे पोलीस गणवेश (Police Uniform) परिधान केलेला असतांना त्यावर रंगीत फेटे बांधणे, त्यांच्यावर फुलांचा अति प्रमाणात वर्षाव करणे, त्यांना वाहनात बसवून संबंधित पोलीस ठाणे / शाखेच्या अधिकारी / अंमलदार यांनी वाहनास दोरीने ओढत नेणे असे प्रकार निदर्शनास आले आहेत. तसेच त्यांना शासकीय वाहनात बसवून सेवानिवृत्त होणा-या अधिकाऱ्यांसारखा त्यांना निरोप दिला जातो. असे प्रकार पोलीस दलाच्या प्रमाणित कार्यपध्दतीला अनुसरुन नाही.
अशा प्रकारच्या गौरव सोहळ्याचा कार्यक्रम अधिकारी स्वतः किंवा त्यांच्या हस्तकामार्फत प्रसिध्दी मिळविण्यासाठी सोशल मीडियावर प्रसारित करतात. त्यामुळे उलट ते जनमाणसांत चेष्टेचा, उपहासाचा विषय बनतात. स्थानिक नागरिक हे अधिकाऱ्याने केलेल्या चांगल्या कामांचा, कर्तृत्वाचा नेहमी सन्मान करतात, न की अशा दिखाव्याचा. सर्व पोलीस घटक प्रमुखांनी त्यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये / शाखांमध्ये बदली झालेल्या पोलीस अधिकारी यांच्या बदलीचा निरोप समारंभ आयोजित करताना वरील प्रकार होणार नाहीत, याची कटाक्षाने दक्षता घेणे आवश्यक आहे.
तशा सूचना त्यांचे अधिनस्थ सर्व पोलीस ठाणे / शाखा प्रभारी अधिकारी, सर्व पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांना सक्त सूचना देणे आवश्यक आहे. उपरोक्त सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास / पालन करण्यात कसुरी केल्यास संबंधितांविरुध्द कडक कारवाई करण्याची जबाबदारी सर्व घटक प्रमुख व त्यांचे पर्यवेक्षीय अधिका-यांची असेल. तसेच अशी कुठलीही बाब पोलीस मुख्यालय यांच्या निदर्शनास आली, तर संबंधित घटक प्रमुखांना जबाबदार ठरविले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.